कृषी निविष्ठा खरेदीत दक्षता घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी निविष्ठा खरेदीत दक्षता घ्या
कृषी निविष्ठा खरेदीत दक्षता घ्या

कृषी निविष्ठा खरेदीत दक्षता घ्या

sakal_logo
By

कृषी निविष्ठा खरेदीत दक्षता घ्या

विजयकुमार राऊत; परवानाधारक विक्रेत्यांनाच प्राधान्य द्या

सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः खरीप हंगाम ऐन तोंडावर असून त्यासाठी जिल्ह्यात बियाणे व खतांचा पुरवठा सुरू झाला आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम हाच मुख्य हंगाम असून कृषी निविष्ठा खरेदीचा कालावधी देखील अत्यल्प म्हणजे केवळ दोन-तीन महिन्यांचा असतो. या बाबीचा विचार करता निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. आगामी खरीप हंगामात खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
खरीप हंगाम २०२३ चा आढावा घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्ह्यातील सर्व बियाणे व खते उत्पादक कंपनी, कंपनीचे अधिकृत विक्रेत्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कृषी अधीक्षक राऊत म्हणाले, ‘‘बियाणे व किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी जागरूक राहिले पाहिजे. कृषी निविष्ठा अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी कराव्यात. या निविष्ठा खरेदी करताना त्यावर लिहिलेली पॅकिंग तारीख, अंतिम तारीख लेबल क्लेम आदी बाबी तपासून घ्याव्यात. याशिवाय परिपूर्ण असलेले खरेदीचे पक्के बिल संबंधित विक्रेत्याकडून न चुकता घेऊन ते जपून ठेवावे. बियाणे पेरणी करताना पाकिटावरील लेबल, पाकीट व थोडे बियाणे बाजूला काढून जपून ठेवावे. अनुदानित रासायनिक खते खरेदी करताना आधार कार्ड लिंक करूनच खरेदी करावी. जादा दराने खते, बियाणे खरेदी करू नयेत, जादा दराने तसेच बनावट खते, बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती कृषी विभागाच्या तक्रार कक्षाशी संपर्क करून द्यावी.’’
---
जिल्हा, तालुकास्तरावर भरारी पथके
श्री. राऊत म्हणाले, ‘‘चुकीच्या पद्धतीने कृषी निविष्ठा विक्री करणारे विक्रेते कृषी विभागाच्या रडारवर आहेत. कोणत्याही अवैध व्यवहाराला पाठीशी घातले जाणार नाहीत. अवैध पद्धतीने वागणाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. शेतकऱ्यांना बनावट बियाणे, बनावट खते अथवा बनावट किटकनाशके विकणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून परवाने निलंबित करू. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व निविष्ठा निरीक्षकांना कृषी विक्री केंद्रांची १०० टक्के तपासणी करण्याच्या आणि गुणवत्ता तपासणीसाठी तात्काळ निविष्ठा नमुने काढण्याच्या सूचना देखील सर्व गुणवत्ता निरीक्षकांना दिल्या आहेत. जिल्हा-तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन केली असून निविष्ठा तक्रारकल देखील कार्यान्वित केला आहे.’’