चिपळूण ः गॅस भरण्यासाठी चिपळुणात चालकांची कसरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः गॅस भरण्यासाठी चिपळुणात चालकांची कसरत
चिपळूण ः गॅस भरण्यासाठी चिपळुणात चालकांची कसरत

चिपळूण ः गॅस भरण्यासाठी चिपळुणात चालकांची कसरत

sakal_logo
By

- rat४p११.jpg ःKOP२३M००४७४
चिपळूण ः शिवाजीनगर येथील सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागत होत्या.

गॅस भरण्यासाठी चिपळुणात चालकांची कसरत
सुट्ट्यांमुळे पर्यटकांचीही गर्दी ः पहाटेपासून लांबच लांब रांगा
चिपळूण, ता. ४ ः पेट्रोल-डिझेलच्‍या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे सर्वसामान्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच अनेक वाहनचालकांकडून सीएनजीला प्राधान्‍य दिले जाते आहे; परंतु गॅस भरण्यासाठी सध्या शहरात चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. सलग सुट्ट्यांमुळे परजिल्ह्यातील पर्यटक दाखल झाल्यामुळे सीएनजीसाठी पहाटेपासून रांगा लागत आहेत. अवघ्या चार तासांत पंपांवरील साठा संपत असल्‍याची स्‍थिती आहे.

रिक्षा, चारचाकी, मालवाहू वाहनांपासून तर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसगाड्यादेखील आता सीएनजीवर धावू लागल्‍या आहेत. गेल्‍या काही दिवसांमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर सातत्‍याने वाढत असतांना पर्यायी व्‍यवस्‍था म्‍हणून गॅसवर वाहने चालवली जाऊ लागली आहेत. अनेक वाहनचालकांकडून सीएनजीसाठी विशेष असे कीट बसवले जात आहे. एकीकडे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना गॅसचा पुरवठा मात्र तुलनेत कमीच आहे. मुंबई-गोवा महामार्गावर लोटे येथे ३, वालोपे येथे १ आणि चिपळूण शहरात दोन असे सीएनजी पुरवठा करणारे पंप आहेत. अद्यापही मागणीच्‍या तुलनेत पुरवठ्याचे सूत्र जुळत नाही. चिपळूण शहरातील पंपावर पहाटेपासून लांबच लांब रांगा सध्या बघायला मिळत आहेत. यात रिक्षा, कारचा समावेश आहे. सलग तीन दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले होते. सिंधुदुर्ग आणि गोव्याला जाणारे पर्यटकदेखील याचमार्गे येत आहेत. सुट्टी संपल्यानंतर अनेक पर्यटक परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सीएनजी भरण्यासाठी येथील पंपावर वाहनचालकांची गर्दी दिसत होती. येथील पंपावर सकाळी ७ वाजता. सीएनजी वितरणाचे काम सुरू होते. अवघ्या चार तासांत संपूर्ण गॅसचा साठा संपत असल्‍याचे व्‍यवस्‍थापकांचे म्‍हणणे आहे. अशात साठा संपल्यानंतर रांगेत तासनतास उभ्या वाहनांना रिकाम्‍या हाती परतावे लागत असल्‍याचेही बघायला मिळते आहे. शहरातील अन्‍य सीएनजी पंपांवरही अशीच परिस्‍थिती असल्‍याचे सांगितले जाते आहे. सध्या साठा सुरळीत होत असला तरी मागणीत मोठी वाढ झाल्‍याने मुबलक प्रमाणात गॅस उपलब्‍ध होत नसल्‍याचे सांगितले जाते आहे.