
अवैध अर्ज ठरलेल्या जोशींचे अपिल मंजूर
४२ (पान ३ साठी)
निवडणुकीतील जोशींचे अपिल मंजूर
दापोली अर्बन बँक ; अवैध ठरला होता अर्ज ; प्रतिनिधी गटाची निवडणूक होण्याचे चिन्हे
गावतळे, ता. ४ : दापोली अर्बन कॉ ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत दापोली तालुका कार्यक्षेत्रातील सर्वसाधारण मतदारसंघातून निवडून दिलेले प्रतिनिधी गटातील ९ उमेदवारांच्या निवडीसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र त्यातील ३ अर्ज अवैध ठरले होते. अवैध उमेदवारी अर्ज ठरलेले उमेदवार चंद्रशेखर जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाला सहकार आयुक्तांकडे (पुणे) अपील दाखल केले होते. या अपिलावर सुनावणी घेण्यात आली व जोशी यांचे अपील मंजूर करण्यात आले असून आता या प्रतिनिधी गटाची निवडणूक होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दापोली अर्बन बँकेच्या निवडणुकीमध्ये चंद्रशेखर जोशी यांनी दापोली तालुका कार्यक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जाला बँकेच्या पोटनियम क्रमांक ४०(२) व ४०(८) ची पूर्तता केली नसल्याची हरकत घेण्यात आली होती. ही हरकत मान्य करून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चंद्रशेखर जोशी यांचा अर्ज फेटाळला होता.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाविरोधात जोशी यांनी सहकार आयुक्ताकडे अपील केले. त्यावर २ मे रोजी सुनावणी झाली. जोशी यांच्या वतीने पुणे येथील अॅड. प्रमोद बेंद्रे यांनी बाजू मांडली. या अपिलावर आज निकाल जाहीर करण्यात आला असून जोशी यांचे अपील मान्य करण्यात आले असून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला आदेश रद्द करण्यात आला आहे. यामुळे आता बँकेच्या दापोली तालुका कार्यक्षेत्रातील प्रतिनिधी गटाच्या ९ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.