
माडखोलवासियांचे उपोषण अखेर स्थगित
swt४३३.jpg
माडखोलः येथे उपोषणास बसलेले ग्रामस्थ.
माडखोलवासियांचे उपोषण अखेर स्थगित
अधिकाऱ्यांची मध्यस्थीः प्रलंबित कामास चार दिवसांत सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ः माडखोल धरणाच्या कालव्याचे प्रलंबित काम येत्या चार दिवसांत सोमवारपासुन सुरु करून लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी देण्याचे लेखी आश्वासन आंबडपालचे कनिष्ठ अभियंता मराठे यांनी दिल्यानंतर आणि सावंतवाडीचे तहसिलदार विलास उंडे यांच्या मध्यस्थीनंतर सोमवारपासुन गेले चार दिवस सुरु असलेले उपोषण माडखोल ग्रामस्थांनी आज दुपारी स्थगित केले. या उपोषणात शांताराम सावंत (वय ९०) आणि यशवंत गावडे (वय ७४) आदी ग्रामस्थ गेले चार दिवस उपोषणाला बसले होते. या उपोषणा दरम्यान सावंत यांची मंगळवारी (ता.२) प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आंबडपालचे कनिष्ठ अभियंता मराठे यांनी बुधवारी (ता.३) उपोषणकर्त्यांची भेट घेतली मात्र, ठोस आश्वासनाअभावी आणि माडखोल ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागले. आज सावंतवाडी तहसिलदार उंडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर पाठोपाठ आंबडपालचे कनिष्ठ अभियंता मराठे आले. यावेळी संतप्त उपोषणकर्त्यांनी त्यांना धारेवर धरले. त्यानंतर तहसिलदार उंडे यांच्या मध्यस्थीनंतर माडखोल धरणाच्या कालव्याचे प्रलंबित काम येत्या चार दिवसांत सोमवारपासुन सुरु करून लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी देण्याचे लेखी आश्वासन श्री. मराठे यांनी दिल्यानंतर माडखोल ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले.