रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

सूक्ष्म, लघु उद्योजकांना
जिल्हा उद्योग केंद्राचे पुरस्कार
रत्नागिरी ः शासनाने जिल्ह्यातील विकसनशील उद्योजकतेचा गौरव करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांचे कौतुक करण्याच्या हेतून जिल्हास्तरावर उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत प्रथम पुरस्कार विजेत्याला १५ हजार रोख व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला १० हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येते. या योजनेअंतर्गत २०२२ च्या पुरस्कारांसाठी उद्योजकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी उद्योजक हा रत्नागिरी जिल्ह्यातील स्थायी लघुद्योग नोंदणीकृत असावा. उद्योगात मागील दोन वर्षे सलग उत्पादन तो घेत असावा. कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. यापूर्वी अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा. निर्याताभिमुख उद्योजकांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. उद्योजकांनी आपले अर्ज जिल्हा उद्योगकेंद्राच्या रत्नागिरी कार्यालयात ३१ मे २०२३ पर्यंत सादर करावयाचे आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राकडून कळवण्यात आले आहे.

अजमेर- एर्नाकुलम रेल्वे
विद्युत इंजिनसह धावणार
रत्नागिरी ः कोकण रेल्वेमार्गे जाणारी अजमेर-एर्नाकुलम एक्स्प्रेस अजमेर येथील प्रस्थानापासून विद्युत इंजिनसह धावणार आहे. कोकणरेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण गेल्याच वर्षी पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या मालगाड्या सुरवातीला विद्युत इंजिनसह चालवण्यात आल्या आहेत. त्या पाठोपाठ प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यादेखील टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनला जोडून चालवल्या जात आहेत. कोकण रेल्वेमार्गे धावणारी अजमेर ते एर्नाकुलम ही गाडी शुक्रवारपासून (ता. ५) तर परतीच्या प्रवासातील एर्नाकुलम ते अजमेर अशी धावणारी गाडी ७ मे रोजीच्या फेरीपासून डिझेल इंजिनऐवजी विद्युत इंजिनसह धावेल.


नाथ पै विद्यालयाचे शिष्यवृत्तीत यश
लांजा ः तालुक्यातील हर्चे येथील बॅ. नाथ पै विद्यालयातील ७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवत एनएमएमएस परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे तर १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये आयुष वेद्रुक याचा जिल्ह्यात दुसरा, अनुश्री केळकर जिल्ह्यात आठवा क्रमांक तर प्रणय मयेकर, पार्थिव पेडणेकर, रोहन सकपाळ, प्रथम माळी आणि रिना महाकाळ या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिष्यवृत्तीधारकास सरकारकडून ६० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष भाई मयेकर, माजी मुख्याध्यापक आनंदकुमार जाधव, व्ही. डी.पाटील, मुख्याध्यापक जे. एम. पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.