रेल्वे महाव्यवस्थापक भेट

रेल्वे महाव्यवस्थापक भेट

फोटो एम००६२२
कोल्हापूर ः मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी येथील स्थानकाची शुक्रवारी पाहणी केली. त्यांच्यासोबत इंदुराणी दुबे, डॉ. रामदास भिसे, शिवनाथ बियाणी. (नितीन जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)

कोकण रेल्वेसाठी २८ किलोमीटरचा फेरसर्व्हे
मध्य रेल्वे महाव्यवस्थापक; मार्ग दुहेरीकरणानंतरच सह्याद्री एक्स्प्रेस धावणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः कोल्हापूर-कोकण जोडणाऱ्या रेल्वे मार्गासाठी २८ किलोमीटरचा स्वतंत्रपणे फेर सर्व्हे करावा लागेल. त्याचा प्रस्ताव तयार आहे. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण होताच कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील सह्याद्री एक्स्प्रेस लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी आज येथे दिले. ते, राजर्षी शाहू महाराज टर्मिनन्सची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘कोकण रेल्वेसाठी सर्व्हे झाला होता. १०७ किलोमीटरचे अंतर आहे; मात्र घाट डोंगर, चढ - उतारामुळे त्यात तांत्रिक अडथळे होते. हे अडथळे वगळून २८ किलोमीटरचा सर्व्हे पुन्हा करावा लागेल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच सर्व्हे सुरू होईल. कोल्हापूर- तिरुपती एक्स्प्रेस हैदराबाद मार्गे सुरू करण्यासाठी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा करू.’’
ते म्हणाले, ‘‘कोरोनामुळे देशातील अनेक मार्गांवरील अनेक रेल्वे गाड्या बंद झाल्या आहेत. त्या अद्याप सुरू नाहीत. देखभाल, दुरुस्ती, दुहेरीकरण अशी कामे सुरू आहेत. पुढील वर्षी बहुतांशी कामे पूर्ण होतील. त्यानंतर गाड्या किंवा डबे वाढवणे, वेळापत्रकात सुधारणे शक्य होईल.’’
ज्या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद आहे, अशा मार्गांवर रेल्वे सोडण्यावर आमचा भर राहील, असे सांगून ते म्हणाले, ‘‘काही विषय रेल्वे धोरणाशी निगडित आहेत. त्यासाठी निधीची तरतूद करावी लागते. संबंधित विभागांशी चर्चा करावी लागेल. मंजूर निधीतून स्थानक विकासाची कामे होतील. यातून फूड कोर्ट, पार्किंग, प्रवासी आसन व्यवस्था, शुद्ध पाणी, प्रवेशद्वार अशा पायाभूत सुविधा लवकर उभारण्यावर भर आहे.’’ यावेळी कृष्णराज महाडिक, अरिहंत फाउंडेशनचे जयेश ओसवाल यांनी रेल्वे प्रवाशांतर्फे निवेदन दिले.
उपमहाव्यस्थापक इंदुराणी दुबे, वाणिज्य महाव्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, रेल्वे सल्लागार समितीचे अध्यक्ष शिवनाथ बियाणी, सत्यजित कदम आदी उपस्थित होते.

कोल्हापूर स्थानकाचा विकास ‘अमृत’ योजनेतून
लालवाणी म्हणाले, ‘‘कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत विकास करू. या स्थानकाचे सुशोभीकरण करणार आहोत. फर्निचर, कोणते डबे कोणत्या ठिकाणी उभे करावेत, यासाठी जागा निश्चित होईल. त्याची माहिती प्रवाशांना सहजपणे समजेल, अशी सुसूत्रता आणली जाईल.

पादचारी पुलाचेही काम सुरू होणार
रेल्वे फाटकाजवळील भिंत बांधल्याने पादचाऱ्यांना परीख पुलाखालून धोकादायक स्थितीत जावे लागते. महापालिका व रेल्वे प्रशासनाचा समन्वय नसल्याने उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. या प्रश्नी लालवाणी म्हणाले, ‘‘पादचारी पुलाचे काम लवकर सुरू करण्यात येईल.’’ रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांसाठी सध्या सरकता जिन्याचे काम पूर्ण झाले. तोही लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागीय अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com