
कोलगाव ग्रामस्थांचा स्नेहमेळावा उत्साहात
swt512.jpg
M00746
मुंबईः श्री सातेरी कोलगांव ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या कुटुंब स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करताना ग्रामस्थ.
कोलगाव ग्रामस्थांचा स्नेहमेळावा उत्साहात
मुंबईत आयोजनः विविध विषयांवर विचार-विनिमय
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ः श्री देवी सातेरी कोलगाव ग्रामस्थ मंडळ, मुंबईचा स्नेहमेळावा उत्साहात पार पाडला. हा कुटुंब स्नेहमेळावा मुंबईतील काळाचौकी येथील अभ्युदय एज्युकेशन सोसायटीच्या बॅन्क्वेट हॉलमध्ये भरविण्यात आला होता. या मेळाव्यास कोलगांववासीयांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली.
श्री गणेश व श्री सातेरी देवीची पूजा व या समारंभास कोलगावहून आलेल्या गावकऱ्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीसच गावातील ज्ञात-अज्ञात दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या समारंभात बोलताना कोलगांवच्या मंडळाचे अध्यक्ष चंदन धुरी यांनी मंदिराच्या सभोवतालचे बरेच काम अजून शिल्लक आहे. याकरीता 50 लाखहून अधिक निधीची आवश्यकता आहे. मुंबईच्या कोलगांववासीयांनी आतापर्यंत अमाप सहकार्य केले आहे. अजून थोडे सहकार्य करावे. जेणेकरून मंदिराचे सगळेच काम पूर्णत्वास येईल, असे सांगितले. कोलगांव मंडळाचे मेघश्याम काजरेकर यांनी सर्वांना एकजुटीचे महत्त्व पटवून देत सर्वांनी एकदिलाने व एकजुटीने रहावे, असे आवाहन केले.
मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलास धुरी यांनी सर्व देणगीदारांचे आणि मोठया संख्येने जमलेल्या कोलगांववासीयांचे ॠण मान्य करीत असेच सहकार्य करत चला अशी विनंती केली. मंडळाचे सचिव सचिन धुरी यांनी गेल्या तीन वर्षाच्या मंडळाच्या कामाचा आलेख मांडला. मंडळाचे उपाध्यक्ष शिवाजी धुरी यांनी मंडळाच्या स्थापनेत सोबत असलेले व दुर्दैवाने आज या समारंभात आपल्यासोबत नसणाऱ्या सदस्यांचे स्मरण करत आपल्या गावचे मंडळ असण्याचे महत्त्व काय आहे, हे विषद केले.
या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंजुता आरोलकर-चव्हाण आणि अक्षय कुबल यांनी या कार्यक्रमाचे सुसुत्र नियोजन केले. या सांस्कृतिक कार्यक्रमात श्रावणी दाभोळकर, यश्वी सोम या बालकलाकारांनी आपली नृत्ये सादर केली. त्याचबरोबर असंख्य मुलांनी सामुहिक नृत्यात भाग घेतला. मंजुता आरोलकर-चव्हाण, अक्षय कुबल, मंडळाचे सदस्य शरद सावंत, विक्रम परब आणि पूजा साईल यांनी सुस्वर गायन करून समस्त कोलगांववासीयांची मने जिंकली. या निमित्ताने हळदी-कुंकू समारंभ देखील आयोजित केला होता. उत्तम गुणांनी परिक्षेत यश संपादन करणाऱ्या साक्षी धुरी, साक्षी परब या दोन विद्यार्थीनींचा गौरव करण्यात आला. मुंबईतील सदस्य विजय व विश्वनाथ म्हापसेकर या बंधुंच्या मातोश्री सुनंदा म्हापसेकर यांचा ज्येष्ठ नागरिक म्हणून याप्रसंगी सत्कार करण्यात आला. मनात जर श्री सातेरी देवीविषयी अपार श्रध्दा व स्वतःबद्दल प्रचंड आत्मविश्वास असेल तर आपण कुठल्याही दुर्धर आजाराशी झुंज देवून पुन्हा उभे राहू शकतो, हे सिध्द करणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका कोलगांवची सून मंजिरी परब यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. या समारंभास कोलगांवहून अनिल धुरी, चंदन धुरी, राजन म्हापसेकर, मेघश्याम काजरेकर, नंदा धुरी, सदाशिव धुरी, आनंद धुरी हे मुंबईच्या मंडळाला आशीर्वाद देण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आले होते. त्यांचाही मंडळाने यथोचित सत्कार केला. श्री सातेरी देवीचा प्रसाद म्हणून त्यांनी सर्व उपस्थितांना आंबा भेट दिला. यानिमित्ताने ''लकी ड्रॉ'' काढण्यात आला होता व पाच भाग्यवंत विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. श्री सातेरी कोलगांव मंडळ, मुंबई हे मंडळ स्थापण्याची मूळ कल्पना ज्यांनी मांडली ते मंगेश धुरी, शशिकांत ठाकूर, गुरुनाथ परब, दत्तात्रय साईल, सचिन धुरी, एकनाथ साईल, विजय म्हापसेकर, विश्वनाथ म्हापसेकर अशा मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी हा समारंभ यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॠतुजा धुरी-साखरकर यांनी केले. दिलीप आरोलकर सर्व उपस्थितांचे आभार मानले.