
चिपळूण पालिकेची घंटागाडी दोन दिवस राहणार बंद
३६ (पान ५ साठी)
चिपळूण पालिकेची घंटागाडी दोन दिवस राहणार बंद
चिपळूण, ता. ५ ः शिवाजीनगर येथील डोंगरमाथ्यावर असलेल्या कचरा प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू असल्याने येत्या ७ व ८ मे रोजी पुन्हा एकदा रस्ता बंद ठेवला जाणार आहे. परिणामी, शहरातील घंटागाडीदेखील बंद ठेवावी लागणार आहे. या कालावधीत शहरातील नागरिकांनी नगर पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे.
शहरातील शिवाजीनगर येथे चिपळूण नगर पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. या ठिकाणी घंटागाड्यांच्या माध्यमातून ओला व सुका कचरा संकलित करून डम्प केला जातो. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ शिवाजीनगर येथील अंतर्गत रस्त्यावर घंटागाड्या धावत असतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ते या कचरा प्रकल्प असा हा रस्ता असून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. प्रचंड उतार व वळणाचा हा रस्ता असल्याने येथे अपघात घडण्याचीही दाट शक्यता होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. संबंधित ठेकेदाराकडून गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू आहे. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, डांबरीकरण कामात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी नगर पालिकेने काम सुरू असताना प्रकल्पाकडे धावणाऱ्या घंटागाड्या बंद ठेवल्या होत्या. शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. बाजारपेठेतील रस्त्यांवरही कचऱ्याचे ढीग दिसून येत होते. घरी जमा होणारा कचरा टाकायचा कुठे असा पेच नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. अखेर गुरुवारी ३ दिवसांनंतर शहरात घंटागाड्या धावल्या आणि शहरवासियांनी सुटकेचा नि:श्वास टाकला; मात्र अजूनही या रस्त्याचे काम शिल्लक असल्याने दोन दिवस घंटागाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिवारी (ता. ७) घंटागाडी नेहमीप्रमाणे सुरू राहील तर रविवार व सोमवार अशी दोन दिवस रस्त्याच्या कामासाठी घंटागाडीची सेवा पुन्हा बंद ठेवली जाणार आहे. तरी या कालावधीत नागरिकांची गैरसोय होण्याची दाट शक्यता असून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासह आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांनी केले आहे.