
पुरवणी लेख- 14- करंजेश्वरीचे नवसाचे शेरणे
ratvardha14.txt
-----------
फोटो ओळी
1) ratvardha46-KOP23M00880 करंजेश्वरी देवीच्या उत्साहात सामील होणारे भक्तगण
2) ratvardha47-KOP23M00881 श्री करंजेश्वरी देवीची पालखी म्हणजे भक्तगणांसाठी पर्वणी
3) ratvardha48-KOP23M00882 शेरणेवेळी जमा होणारा भक्तांचा जनसागर
इन्ट्रो-
---
श्री देवी करंजेश्वरीबाबत अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. करंजेश्वरीचे कृपाछत्र असलेला भक्तगणही मोठा आहे. चिपळूण-गोवळकोट येथे वसलेली करंजेश्वरी आणि तिचे माहात्म्य याबाबत अनेक कथा सांगितल्या जातात तसेच या देवीची आगळी वैशिष्ट्ये आहेत. शिमगोत्सवातील नवसाचे शेरणे तसेच देवीचा किरका ही आगळीवेगळी आणि भक्तांना रोमांचित करणारी वैशिष्ट्ये. याचा परिचय येथे करून देण्यात आला आहे.
- दादा खातू
करंजेश्वरीचे नवसाचे शेरणे
रात्री इच्छुक नवसदार आपली मनोकामना देवीच्या कृपाशिर्वादाने पूर्ण होण्यासाठी पालखीजवळ विश्वस्तांकडे शेरणे ठेवण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी करतात. शेरणे ठेवणे म्हणजे पिवळ्या कापडात हळकूंड, पानसुपारीचा विडा, हळदकुंकू, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून देवीच्या पालखीमध्ये ठेवतात. देवीची मनोभावे श्रद्धेने प्रार्थना करून काम होण्याबद्दल विनंती करतात. देवीला आरज घालतात आणि पिवळ्या कपड्यात बांधलेला नारळ रात्री कोणी पाहणार नाही. याची काळजी घेऊन नदीपात्रातील कोरड्या भागात खड्डा काढून सुरक्षित लपवून ठेवतात, यालाच शेरणे ठेवणे म्हणतात. सहाणेवरून देवी गोवळकोट येथे सासरी जाण्यासाठी दुपारी 3 वाजता साधारण 100 बोल, ताशे, लेझिम, दांडपट्टा, अबदागिरी तुतारीच्या नादात वाजतगाजत, गर्जत परीट आळीतील भाविकांच्या भक्तीभावाने केलेल्या आरत्या स्वीकारत दोन्ही पालख्या वाशिष्ठी नदीकिनारी येतात. प्रथम देवीला आणि देव सोमेश्वराला नारळ ठेवून विनंती आरज घालतात. देवीचा साक्षात्कार म्हणा किंवा दैवी चमत्कार म्हणा, भोईराजांच्या खांद्यावरील दोन्ही पालख्या फुलासारख्या हलक्या होतात आणि भोईराजांच्या खांद्यावरील पालख्या वाऱ्याच्या वेगाने धावत जाऊन ज्या ज्या भाविकांची देवीच्या कृपाशिर्वादाने इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहे त्या त्या शेरण्याजवळ पालखी जड होऊन थांबते. पालखीसोबत निशाण म्हणजे ढाल काठी असते. ढालकाठीचा खालील टोकदार भाग निशाणधारक जोराने जमिनीवर मारतो. त्या भागातील जमिनीवरील माती बाजूला केल्यानंतर त्या नशिबवान शेरणे ठेवणाऱ्या भाविकाचे इच्छित मनोरथ पूर्ण होण्याचे संकेत मिळतात आणि त्याप्रमाणे देवीच्या कृपाशिर्वादाने मनोकामना पूर्ण होण्याची प्रचिती मिळते.
10 ते 12 वर्षापूर्वी पालखी शेरणे न काढता गरगर फिरत राहिली हा प्रकार सेक्रेटरी श्री. बांद्रेभाऊ साहेब आणि अध्यक्ष बुरटे साहेबांच्या लक्षात आला. शेरणे न काढता पालखी गरगर फिरते म्हणजे काहीतरी गडबड आहे. निरीक्षण करून पाहिले असता देवीच्या कानातील कुडी दिसत नव्हती. देवीला आर्जव घालून विनंती केली असता देवीची ओटी भरताना पालखीमध्ये जे तांदूळ जमले होते त्या पिशव्या श्री. होमकळस यांच्या घरात ठेवल्या होत्या. त्या तांदळामध्ये शोधले असता देवीच्या कानातील कुड्या सापडल्या. कुड्या देवीच्या कानात घालून चूकमाफीचा आर्जव घातल्याबरोबर देवीने ताबडतोब 12 ते 15 शेरणे काढली. ढोल काठी घेण्याचा मान वंशपरंपरेने प्रथम मान श्री. कांबळी घराण्याचा त्यानंतर श्री. कानापडे या घराण्याचा आहे. हा शेरणे काढण्याचा कार्यक्रम पहाण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून 12 ते 15 हजार भाविकांचा जनसागर लोटलेला असतो. शेरणे काढण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर पेठमापातील रहिवासी यांच्या आरत्या घेत पालखी श्री. सरेकर पाटील यांच्या घरी पूर्वापार असलेल्या मानाच्या प्रथेप्रमाणे बसते. माहेरवाशिणींनी देवीची खणा नारळाने ओटी भरल्यानंतर जड पावलांनी गोवळकोटकडे रवाना होते.
देवीची किरका
गावात रोगराई येऊ नये, सर्वांना सुखशांती लाभावी म्हणून, ईडापिडा टळावी यासाठी करंजेश्वरी देवीची बहीण श्री. देवी रेडजाई हिची 3 वर्षांनी किरका ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येपूर्वी मांसाहाराचा वार पाहून बळी देण्याची प्रथा आहे. इंग्रजांचे राजवटीमध्ये देवी रेडजाईला रेडा बळी देण्याची पद्धत होती. रेड्यांचे अंगावर गुलाल टाकून त्यांच्या गळ्यात हार घालून सुब्याजवळील होळीजवळ रेड्यांचा बळी देण्याची पद्धत होती. श्री रेडजाईच्या देवळापासून चरापर्यंतच्या भागाला पूर्वी सुबा या नावाने ओळखत असत. सुब्याजवळील होळीजवळ रेड्याचा बळी गावात देण्याची प्रथा होती. रेड्याचा बळी देण्याची तलवार ही श्री शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. एका घावात तलवारीने रेड्याचे शिर धडावेगळे करत असत. त्या रेड्यांच्या मांसाचा वाटा घेण्याचा मान चौऱ्यांऐशी मानकऱ्यांचा होता. त्यामध्ये बहुसंख्य ब्राह्मण व इतर हिंदू समाजातील मानकरी होते. हे मानकरी कोरे उपरणे नेसून बळी दिलेल्या रेड्याच्या मांसाचा वाटा घेत आणि तो रेड्याच्या मांसाचा वाटा कोऱ्या उपरण्यासहित इतर समाजातील लोकांना देत असत. इंग्रजांची राजवट संपल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देवीला रेडा देण्याची पद्धत बंद होऊन देवीला बोकड देण्याची प्रथा सुरू झाली. देवी श्री रेडजाईच्या देवळात किल्ल्यामध्ये बोकड मानवून श्री रेडजाई देवीला आरज घालून बोकडाला गुलाल हार घालून ढोल वाजवित करंजेश्वरीच्या देवळाजवळ आणतात. करंजेश्वरी मंदिराच्या पायरीजवळ राखणदार आहे. त्यांच्यासमोर सव्वा पायली पावट्यांच्या उकडलेल्या घुगऱ्या, सव्वा शेर भात परडीत ठेवून त्यावर पेटलेला काकडा ठेवून सव्वा शेर मडक्यांच्या जोगळीमध्ये गोडेतेलाचा काकडा करतात. हा काकडा घेण्याचा मान मापातील शेट्ये घराण्याचा तसेच घुगऱ्यांची टोपली घेण्याचा मान भैरवकर घराण्याचा आहे. अशी ही सर्व तयारी बोकड आणि दोन कोंबडे घेऊन वाजतगाजत राखण्या बुरूज या ठिकाणी जाते. राखण्या बुरूज येथे कोंबडा बळी देण्याची प्रथा आहे. कोंबड्याला बळी देण्याचा मान वंशपरंपरेने साळवी या घराण्याचा आहे. कोंबडा बळी दिल्यानंतर चर्मकार विहिरीजवळून बोकड आणि कोंबडा वाजतगाजत बोटीच्या धक्क्यावर गोवळकोट येथे आणतात. ही किरकेची मिरवणूक जात असता सर्व घरातून एक लहान भाकरी (पोपी) मध्ये तेलात भिजवलेला पेटका काकडा आणि घरातील उपद्रवी कीटक घेऊन ती पोपी झोळी घेणाऱ्यांच्या झोळीत टाकायची, भाविकांची अशी श्रद्धा आहे. घरातील ईडापिडा कीटकाच्या रूपाने बाहेर गेली. गोवळकोट धक्क्यावर बांबूच्या कामठ्यापासून तयार केलेल्या परडीत गवताचा पेंढा अंथरतात. त्यावर दुसरा जिवंत कोंबडा ठेवतात. तो कोंबडा आणि परडी ठेवण्याचा मान गोवळकोट येथील आग्रे घराण्याचा आहे. गोवळकोट, मजरेकाशी आणि पेठमाप भागातील रोगराई ईडापिडा जाण्यासाठी देवीला आर्जव घालून तो कोंबडा आणि परडीसह होडीतून नदीमध्ये सोडतात. या होडीचा मान गोवळकोट येथील भोई समाजाचा आहे.
कोंबडा परदी नदीत सोडल्यानंतर सर्व समाज बोकडाला वाजतगाजत भोईवाडीतून पेठमाप सिमेवर जातात. अघोरी शक्तीचा नाश व्हावा म्हणून देवीजवळ गाऱ्हाणे मांडून गुरव रस्त्यात घुगऱ्या फेकत चराजवळ येतात. चर बाबा हा पेठमाप गोवळकोटवासियांचा राखणदार आहे. चर बाबांजवळ बोकड आल्यानंतर चर बाबाला पेठमाप गोवळकोट गावात रोगराई ईडापिडा येऊ नये म्हणून चर बाबाला गाऱ्हाणे घालतात व मानाचा नारळ देऊन आर्जव घालतात. बोकडाला घेऊन वाजतगाजत जाडे आळी, बुरटे आळी, तांबट आळी, बुरूड आळी, जिनगर आळी, साळी आळीमधून पेठमाप सिमेवर बोकडाला वाजतगाजत घेऊन जातात. पेठमाप सिमेवर दोन्ही गावाच्या रक्षणासाठी श्री. गोविंद भैरवकर आर्जव घालतात आणि तलवारीचे एकाच घावात बोकडाचे शिर धडावेगळे करतात. बोकडाचे शिर आणि पाय सिमेवर खड्डा काढून पुरतात व बोकडाचे वाटे मानकरी घेऊन जातात, अशी ही गावातील रोगराई ईडापिडा टाळण्यासाठी तीन वर्षांनी एकदा देवीची किरका परंपरा येते.