
पुरवणी लेख-कोकणातील देवांच्या कथा
ratvardha2.txt
-----------
1) ratvardha20.jpg -KOP23M00902 श्री देव मार्लेश्वर
2) ratvardha21.jpg -KOP23M00903 मार्लेश्वर गुंफेचे प्रवेशद्वार
3) ratvardha22.jpg - KOP23M00904 श्री कर्णेश्वर मूर्ती
4) ratvardha23.jpg -KOP23M00905 कर्णेश्वर मंदिर, कसबा
5) ratvardha24.jpg -KOP23M00906 श्रीदेव कनकादित्य
6) ratvardha25.jpg -3M00907 कनकादित्य मंदिर, कशेळी
7) ratvardha26.jpg -M00908 किरांबा येथील क्षेत्रपाल मंदिर
इंट्रो
निसर्गाचं लेणं ल्यायलेल्या कोकणाला साथ मिळाली आहे ती सुंदर देवालयांची आणि त्यामध्ये वसलेल्या देखण्या देवतांची. समुद्र, गर्द झाडी, सह्याद्रीच्या डोंगररांगा यांनी नटलेल्या या प्रांती निरनिराळी दैवते गावोगावी वसलेली दिसतात. काही लहान, काही मोठी, काही ग्रामदैवते तर काही कुलदैवते अशी निरनिराळी दैवते या कोकणप्रांती विराजमान झाली आहेत. या दैवतांच्या काहींना काही कथा प्रसिद्ध आहेत. कुणी रागीट, कुणी कृपाळू, कुणी नवसाला पावणारा तर कुणी कौल देणारा. या कथांना अंत नाही. जशी देवावरची गाढ श्रद्धा तशाच या निरनिराळ्या कथा आणि त्यावर लोकांचा असलेला विश्वाससुद्धा तितकाच गाढ असतो. या कथा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या असतात. या कथेतल्या प्रसंगांबद्दल कधी शंका घेतली जात नाही, कधी प्रश्न विचारले जात नाहीत. याचं कारण म्हणजे त्यावर असलेली श्रद्धा हे होय. या विविध कथा अगदी कान देऊन ऐकल्या जातात आणि त्या तशाच पुढच्या पिढीला सांगितल्या जातात. या कथा म्हणजे निव्वळ त्या देवाची स्तुती नसून एक खूप मोठा वारसा आहे, जो पिढ्यानपिढ्या जपला जातो आणि आजही त्या त्या ठिकाणचा इतिहास समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हा अमूर्त वारसा असाच जपला गेला पाहिजे. काय सांगतात या कथा याचा हा धांडोळा.
- आशुतोष बापट, पुणे- मो. 8605018020
कोकणातील देवांच्या कथा
मुळात कोकण प्रांताच्या निर्मितीचीच एक सुंदर कथा आहे आणि ती सर्वज्ञात आहे. परशुरामाने बाण मारून समुद्र हटवला आणि ही निसर्गरम्य भूमी निर्माण केली. त्यामध्ये मग लोकांनी वस्ती केली आणि हा प्रदेश नांदता झाला. लोकांनी घरं बांधली, शेती केली, गावं वसू लागली. गावं आल्यावर विविध देवता आल्या. गावाचं रक्षण करणाऱ्या, भक्तांवर कृपादृष्टी ठेवणाऱ्या, त्यांचं कल्याण करणाऱ्या त्या देवतांबरोबर त्यांच्या विविध कथा आल्या. कोकणात अनेक शिवालये वसली आहेत. ती बऱ्याच मंडळींची कुलदैवतेही आहेत. या शिवालयांचा मागोवा घेताना एक कथा कायम आढळते ती म्हणजे कुण्या एका व्यक्तीची, कधी गुराख्याची गाय एका ठराविक ठिकाणी जाऊन पान्हा सोडते. गाय कमी दूध का देते म्हणून शोध घेत ती व्यक्ती गाईच्या मागोमाग जाते. ती गाय एका दगडावर पान्हा सोडत असते. मग ती व्यक्ती चिडून त्या दगडावर हातातल्या कुऱ्हाडीचा घाव घालते. ते एक शिवलिंग असते. त्या शिवलिंगाचा कळपा उडतो आणि रक्त वाहू लागते. मग ती व्यक्ती घाबरून शरण जाते आणि ते शिवलिंग तिथे प्रस्थापित होते. मग ते कधी व्याडेश्वर होते, कधी कळपेश्वर होते, कधी आमनायेश्वर होते तर कधी अजून कुठले. शिवस्थानाबद्दल प्रचंड लोकप्रिय असलेली ही कथा अनेक ठिकाणी आढळते; पण यापेक्षा निराळी मार्लेश्वराची कथा आहे. परशुरामानेच वसवलेल्या वाडेश्वर, कर्णेश्वर आणि मार्लेश्वर यापैकी हा एक देव. शिलाहार राजवंश संपत आल्याच्या काळात लोकांची अधोगती सुरू झाली. जहांगिरी, धनदौलत मिळवण्यासाठी लोकं नातीगोती विसरून एकमेकांच्या ऊरावर बसू लागले. या सगळ्याला इथला देवच कंटाळला आणि देऊळ सोडून एका पांथस्थाचे रूप घेऊन दऱ्याखोऱ्यात हिंडू लागला. कुणी योग्य भक्त मिळतो आहे का, याची वाट बघू लागला. गावाबाहेर एका झोपडीत आपले काम करणारा एक चर्मकार भक्त त्याला दिसला. तो परमेश्वराचे नामचिंतन करत आपले काम मनोभावे करत असे. या भक्ताने आपली दिवटी घेऊन अंधारात जाणाऱ्या या पांथस्थाला वाट दाखवली आणि त्याला मार्लेश्वराच्या गुहेत आणून सोडले. देव देवळातून गायब झाल्याची वार्ता सर्वत्र पसरली. गावावर अनेक संकटे येऊ लागली. परकीय आक्रमण आले. लोकांना आपली चूक उमगली. ते आता सगळे वैर विसरून एकत्र आले आणि परकीय आक्रमण उधळून लावले. आता देवाचा शोध सुरू झाला. डोंगरदऱ्या हिंडताना एका गुहेपाशी आल्यावर बरेच दगड गुहेच्या दाराशी कोसळले. ते बाजूला करून आत जातात तो त्यांचा मार्लेश्वर इथे वसलेला दिसला. तो दिवस होता संक्रांतीचा. देवाच्या पुनर्भेटीचा हा सोहळा या प्रांतीचे लोक आजही संक्रांतीला साजरा करतात.
एक कथा आहे कशेळी इथल्या कनकादित्याची. 1293 ला अल्लाउद्दीन खलजी सौराष्ट्रावर चालून आला. तिथे असलेल्या प्रभासपट्टण इथल्या सूर्यमंदिरावर त्याचा घाला आला. पुजाऱ्याने आधीच तिथल्या मूर्ती हलवल्या आणि त्या एका व्यापाऱ्याच्या जहाजावर लादून पाठवून दिल्या. ते जहाज कशेळीजवळ आल्यावर व्यापाऱ्याला झालेल्या दृष्टांतानुसार त्याने एक मूर्ती समुद्रात सोडली ती किनाऱ्याजवळच्या गुहेत अडकली. कशेळीला कनका नावाची सूर्याची उपासक राहात होती. तिला झालेल्या दृष्टांतानुसार, तिने ही मूर्ती गावकऱ्यांच्या मदतीने देवळात आणून वसवली. ही गुहा आजही बघता येते. कनका या भक्तिणीने आणलेला देव तो झाला ‘कनकादित्य’.
चिपळूणच्या करंजेश्वरी देवीची अशीच एक कथा. या ठिकाणी करंज्याची झुडुपं होती. त्यातच ही देवी प्रकट झाली. ही देवी जिथे प्रकट झाली तिथे तिने एका कुमारीकेजवळ हळदीकुंकू मागितले. ती कुमारिका हळदीकुंकू आणायला गेल्यावर देवी गुप्त झाली आणि सध्या ज्या जागी आहे तिथे प्रकटली. नंतर एका भक्ताच्या स्वप्नात येऊन करंजीच्या झुडुपात माझ्या नथीमधला मोती अडकला आहे तो घेऊन ये, असे सांगितले. त्याप्रमाणे त्या भक्ताला तो मोती तिथे सापडला. करंजीच्या झुडुपात प्रकट झाली म्हणून ‘करंजेश्वरी’ असे नाव पडले.
देवांसोबत राखणदार, महापुरूष, क्षेत्रपाल यांनाही कोकणात मोठे महत्व असते.
कणकवलीजवळ असलेल्या श्रावणगावच्या तळेवाडीत सत्ता आहे क्षेत्रपालाची. त्या क्षेत्रपालाचा आदेश आहे की, गावात संध्याकाळनंतर कुणालाही रडायला बंदी आहे. कुणाच्या घरात काही दुर्घटना घडली तरीही सूर्योदयापर्यंत शांतता राखायची तसेच गावात रक्ताचा थेंब सांडू द्यायचा नाही, असाही क्षेत्रपालाचा आदेश आहे. असा हा आगळावेगळा देव आणि त्याची निराळीच कथा. आचरा, चिंदर या गावात देवासाठी सगळा गाव मोकळा केला जातो. मग देव गावातल्या वाईट शक्तींचा नायनाट करतो, अशी श्रद्धा. गावकरी गावाच्या बाहेर पाले टाकून राहतात, याला गावपळण म्हणतात. दर तीन वर्षांनी येणारा हा प्रकार देवावरच्या श्रद्धेमुळे तितकाच मनोभावे पाळला जातो.
देव किंवा देवी कुठेतरी सापडणे, मग तो भक्त त्या देवतेला गावात घेऊन येणे, मागे वळून बघायचे नाही, असे असूनही त्या भक्ताचे मागे वळून बघणे आणि त्यामुळे तो देव तिथेच वसती करून राहाणे ही कथासुद्धा निरनिराळ्या गावांतून ऐकायला मिळते. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या कथा आपले नुसते मनोरंजन करत नाहीत तर देवाप्रती असलेल्या श्रद्धांची जाणीव करून देतात. देवाचे सोवळेओवळे, त्याला लावलेला कौल आणि त्याच्या उत्तरावरून पुढची मार्गक्रमणा करणे. गावापासून कितीही दूर असले तरी देवाच्या कथा आठवून देवाचे स्मरण करून काम करत राहाणे, या परंपरा मनोमन जोपासल्या जातात.
देवाच्या कथा इथेच संपत नाहीत. अगदी आधुनिक युगातसुद्धा काही चमत्कारिक कथा आपल्याला दिसून येतात. त्यातलीच एक आहे दापोलीजवळच्या बुरोंडी इथल्या गणपतीची कथा. घटना आहे सन 2006 सालची. दापोलीजवळच्या बुरोंडी या गावात कोळी आणि खारवी समाजाचे लोक राहतात. मासेमारी हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावातले नंदकुमार आणि दुर्वास साखरकर हे दोघे त्यांच्या एकवीरा नावाच्या होडीतून मासेमारी करण्यासाठी हर्णैच्या जवळ खोल समुद्रात गेले असताना त्यांच्या होडीपाशी काही एक लाकडी वस्तू तरंगताना त्यांना आढळली. उत्सुकतेने त्यांनी ती काय आहे म्हणून बघितले तर एक लाकडाची श्रीगणेशाची मूर्ती होती ती. कोणीतरी ती विसर्जित केली असावी, असे समजून या दोघांनी तिची पूजा केली आणि परत समुद्रात सोडून दिली. काही वेळाने अजून आत समुद्रात गेल्यावर त्यांना तीच मूर्ती परत बोटीजवळ आलेली दिसली. त्यांनी परत ती सोडून दिली. बरेच अंतर समुद्रात गेल्यावर त्यांना पुन्हा ती मूर्ती त्यांच्या होडीच्या जवळ आलेली दिसली. आता मात्र ते चक्रावून गेले. हा काहीतरी चमत्कार असावा आणि गजाननाला आपल्याकडे यायचे असावे, असे समजून त्यांनी ती मूर्ती परत किनाऱ्यावर आणली. सगळा प्रसंग गावातल्या मंडळींना सांगितला. ग्रामस्थांनी एकमताने असे ठरवले की, या गणेशमूर्तीला आता आपल्या गावामध्येच स्थापित करायचे. गावात तर मूर्ती ठेवण्याजोगे मंदिर नव्हते मग शेवटी या मंडळींनी गावातल्याच श्रीसावरदेवाच्या मंदिरात एका भागात माघी गणेश जयंतीच्या दिवशी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.
देवाची इच्छा असली की, तो हरतऱ्हेने आपला मार्ग सुकर करून घेतो आणि त्या विशिष्ट ठिकाणी येऊन वस्ती करतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. वर उल्लेख केलेल्या देवांच्या कथा या अगदी प्रातिनिधिक आहेत. अशा अनेक कथा गावोगावी आपल्याला ऐकायला मिळतील. त्यांचे खरंतर संकलन व्हायला हवे. त्याचा एक ‘कथाकोश’ करायला हवा. या कथा आपल्या परंपरेच्या, वारशाच्या खुणा आहेत. इतिहासाचे धागेदोरे या कथांमधून आपल्याला मिळत असतात. त्या कपोलकल्पित आहेत, टाकाऊ आहेत असे म्हणून नाही चालणार. देवांच्या कथा, त्यांचे संदर्भ, तिथली गावे या सगळ्या गोष्टी इतिहासाचे धागे गुंफताना खूप उपयोगी ठरतात. त्यामुळे या कथा सांगितल्या आणि ऐकल्या जायला हव्यात. आपल्या परंपरांचा हा अमूर्त वारसा आपणच जपायला हवा.
(लेखक मूर्तीकलेचे अभ्यासक आहेत)