पुरवणी लेख 3 -सहजी पुसल्या न जाणार्‍या लोकसंस्कृतीच्या खुणा

पुरवणी लेख 3 -सहजी पुसल्या न जाणार्‍या लोकसंस्कृतीच्या खुणा

ratvardha3.txt

फोटो-
1) ratvardha39.jpg -KOP23M00917 संकासूर हा देवच मानला जातो
2) ratvardha40.jpg -KOP23M00919 संगमेश्वर येथील शिंपण्यात लाल रंगाला महत्व असते

इंट्रो

सांस्कृतिक वारसा हे कोणत्याही संस्कृतीच्या जिवंतपणाचे महत्वाचे लक्षण मानले पाहिजे. संस्कृती, असे म्हणताना तिच्या पोटात असणाऱ्या रूढी, परंपरा, प्रथा, लोकगीते, लोककथा, मिथक कथा, दंतकथा, बोली इत्यादी अनेक घटकांचा विचार करावा लागतो. प्रत्येक परिसराला जसा भूगोल असतो, तसाच त्या त्या परिसराला एक सांस्कृतिक इतिहास असतो. लिपीचा शोध लागण्याआधीपासून घडलेल्या अनेक घटना प्रसंगातून काही रूढी, परंपरा, प्रथा, साकारत गेल्या. काही काळाच्या ओघात लुप्त झाल्या, काही अवशेषरूपाने उरल्या, काही केवळ दंतकथांच्या रूपाने उरल्या. अशा लोकसंस्कृतीच्या अनेक खुणा त्या त्या परिसरात अजूनही परंपरांच्या रूपाने नांदल्या आहेत. आज विज्ञानयुगात सुद्धा हा सांस्कृतिक वारसा श्रद्धेने जपला जातो. अनेक प्रथा, परंपरा सुरू असण्यामागे नेमके कारण काय यावर मतभिन्नता दिसेल. अनेक प्रवाद आणि लोकोपवाद ऐकायला मिळतील. यातील काही परस्परविरोधी सुद्धा असतात; मात्र त्यामागची श्रद्धा आणि टवटवीतपणा अद्यापही टिकून आहे, ही गोष्ट आश्‍चर्याचा सुखद धक्का देणारी आहे.

- अरूण इंगवले, ;चिपळूण मोबाइल -9422395668


सहजी पुसल्या न जाणाऱ्या लोकसंस्कृतीच्या खुणा

सावर्डे (ता. चिपळूण) येथील जळती लाकडे एकमेकांवर फेकून मारण्याची परंपरा असणारा ‘होलटा होम’, संगमेश्‍वरचे शिंपणे, काही गावांमध्ये दर तीन किंवा पाच वर्षांनी होणारी गावपळण आजही त्याच उत्साहाने साजरी होते. अशा प्रथा सुरू होण्यामागे फार मोठ्या सामाजिक उलथापालथ करणाऱ्या घटितांचा तत्कालीन समाजावर प्रभाव असावा. काळाच्या ओघात मूळ घटनेमागचा इतिहास किंवा कारणमिमांसा संपली असली तरीही त्या घटनेला प्रतिसाद म्हणून निर्माण झालेल्या प्रथा आजही अस्तित्वात आहेत. ग्रामसंस्कृती झपाट्याने नागरी रूप घेत असली तरीही आपले हे सांस्कृतिक अंग शक्य तितक्या प्रामाणिकपणे जपत आहेत. आधीच्या पिढ्यांना मुबलक वेळ होता. त्यांच्या जीवनाला आजच्यासारखी गती आलेली नव्हती; मात्र आज माणसाला टंचाई भासते ती वेळेची. त्यामुळे काही ‘शॉर्टकट्स’ रूढ होत चालले आहेत. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात शिमग्यामध्ये बाहेर पडणारे खेळे असतील किंवा संकासूर असेल, आजूबाजूच्या आठ-दहा गावांमध्ये भोवरीसाठी बाहेर पडायचे. साधारणपणे आठ-दहा दिवसांनंतर पुन्हा गावात परतायचे. त्या त्या गावात पोहोचल्यावर तिथेच स्वयंपाक करायचा, तिथेच झोपायचे आणि सकाळी उठून नव्या गावात जायचे. कोणत्या गावात कोणाकडून काय शिधा घ्यायचा, हे ठरलेले असायचे. पीठ, तांदूळ, डाळ, भाजी, तेल कोणाकडून घ्यायचे ते परंपरेने ठरलेले असायचे. किंबहुना त्या वस्तू खेळ्यांना किंवा संकासुराला देणे हा त्या त्या घराण्याचा मान असायचा. आज या प्रथा अशाच्या अशा उरल्या नसल्या तरी अवशेष रूपाने शिल्लक आहेत. संकासूर आणि खेळे एका दिवसात का होईना प्रथेचे पालन करून मुक्कामाला स्वतःच्या गावात परततात.
संकासूर हा इथला राजा होता. शंकूसारखी टोपी हा त्याचा वेश होता. त्याने आर्य संस्कृतीला विरोध केला, वेद मानायला नकार दिला. इथली अनार्य संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला ही यामागची प्रेरणा अनेकांना माहितसुद्धा नसेल; मात्र संकासूर घरोघरी जाणे, त्याला श्रद्धेने नमस्कार करणे, नवस बोलणे, लहान मूल त्याच्या पायावर घालणे, त्याच्या वेठीचा मार प्रसाद म्हणून खाणे अशा श्रद्धा काळाच्या रेट्यातही टिकून आहेत आणि टिकून राहतीलही. कोकणात आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात साम्य असणाऱ्या अनेक दंतकथा अनेक गावांमध्ये ऐकवल्या जातात. शेतकऱ्याला गाय दूध न देता विशिष्ट दगडावर जाऊन पान्हा सोडणे, एखाद्या विहिरीवर किंवा जंगलातील विशिष्ट ठिकाणी समारंभासाठी भांडी, दागिने मिळणे समारंभ झाल्यावर नारळ, अक्षतांसह ती भांडी किंवा दागिने परत करणे. पुढे केव्हातरी कोणी फसवणूक केली, त्या वस्तू परत केल्या नाहीत. तेव्हापासून तिथे वस्तू मिळायच्या बंद झाल्या. अर्धवट बांधलेल्या किंवा पडझड झालेल्या वास्तू या पांडवांनी बांधलेल्या असतात. कोंबडा आरवल्याने ते काम अर्धवट ठेवून पांडवांना निघावे लागले, अशी कारणमिमांसा सुद्धा केली जाते.
अमावस्येला निघणारा भूतांचा छबिना किंवा बावाला पाहिले म्हणणारा आढळत नाही; मात्र छबिन्याच्या किंवा बावाच्या फेऱ्‍याचा अचूक मार्ग दाखवणारे अनेकजण गावोगावी भेटतात. कदाचित पुढच्या पिढीत हे मार्ग सांगणारे लोक सापडणारही नाहीत. वैजी (ता. चिपळूण) येथे गणेशखिंड वैजी मुख्य रस्त्यावर वेताळाची जाळ होती. दोन-तीन भल्यामोठ्या वृक्षांना वेढून असणारी प्रचंड दाट असणारी बगवेलीची वेल. आत नजर टाकली तर काहीही दिसणार नाही, अशी गच्च काळोखी जाळी. गावाच्या ग्रामदेवता सुकाईचा तो भाऊ समजला जायचा. येणारे-जाणारे वऱ्‍हाड, मिरवणूक, माहेरवाशिण तिथे नारळ, अक्षता वाहिल्याशिवाय पुढे जात नसे. अगदी आजुबाजूच्या पाच-दहा गावात वेताळाची दहशत होती. वेताळाने गाडी अडवल्याच्या, बंद पडल्याच्या अनेक कथा दर आठ-दहा दिवसांनी ऐकायला मिळत.
वेताळाशी कुस्ती केल्याचे सांगणारे दोन-तीनजण गावात होते; मात्र गेल्या 35-40 वर्षांपासून वेताळाची दहशत कमी झाली. गेल्या 20-25 वर्षात वेताळाने केलेला कोणताही प्रताप कानावर आलेला नाही. ती जाळीही अतिशय विरळ झाली आहे. अजूनही वेताळाच्या कथा सांगितल्या जात असल्या तरीही पुढच्या पिढीपर्यंत यातल्या किती कथा उरतील, याबाबत मी सुद्धा साशंक आहे.
कोकण निर्मितीमागची परशुराम कथा. भूमी निर्माण करण्यासाठी परशुरामाने मारलेला बाण, तो बाण दूरवर जाऊ नये म्हणून वाळवीने पोखरलेले धनुष्य आणि त्यामुळे संतापून परशुरामाने वाळवीला दिलेला शाप दंतकथेच्या रूपाने कोकणात सर्वत्र ऐकायला मिळतो. या भूमीत काहीच उगवणार नाही, या शापाला जळू दे आणि रूजू दे असा परशुरामाने दिलेला उःशाप आणि त्यामुळे कोकणात आढळणारी भाजावळ करण्याची पद्धत.
शासनाने किंवा कृषी विद्यापीठाने कितीही सांगितले तरीही इथला शेतकरी भाजावळ केल्या जागेशिवाय इतर जागेवर पेरा करायला तयार होत नाही. परशुरामाच्या या दंतकथेचा प्रचंड पगडा अद्यापही शेती परंपरेवर आहे. कष्टाशी बांधलेला इथला माणूस आजही या प्रथा, परंपरा, दंतकथा जपतो आहे. यापुढेही जपत राहणार आहे. यातील अनेक दंतकथांचा मुळापासून विचार करून त्यावर संशोधन होण्याची गरज आहे.
( लेखक प्रसिद्ध कवि आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत )
------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com