पुरवणी लेख- 9- येथे मुचकुंदी होते वाकी तर केदारलिंग वाकोबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरवणी लेख- 9- येथे मुचकुंदी होते वाकी तर केदारलिंग वाकोबा
पुरवणी लेख- 9- येथे मुचकुंदी होते वाकी तर केदारलिंग वाकोबा

पुरवणी लेख- 9- येथे मुचकुंदी होते वाकी तर केदारलिंग वाकोबा

sakal_logo
By

ratvardha9.txt

--------------
फोटो-
1) ratvardha29.jpg -KOP23M00911 केदारलिंग मंदिर,वाकेड
2) ratvardha30.jpg -KOP23M00913 श्रीदेव केदारलिंग अर्थात वाकेडचा वाकोबा

इंट्रो

लोकसाहित्यातील लोकवाङ्मयाचे दालन अनेक बाबींनी संपन्न आहेत. या दालनातील दंतकथांना भारतीय लोकजीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेला स्वर्गीय सुंदर कोकणप्रांतही त्याला अपवाद नाही. श्रद्धाळू व निसर्गपूजक कोकणातील गावागावात अनेक वैशिष्ट्यपूर्ण कथा-दंतकथा आढळतात. खरंतर, दंतकथेत विविधता, वेगळेपण असते. दंतकथेचा हेतू परंपरेने कल्पना व संचित स्वरूपात चालत आलेली लोकस्मृती जागृत करण्याचा असतो. जेव्हा ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत त्या वेळी इतिहास संशोधकाला अभ्यास करण्यासाठी दंतकथाच उपयोगी पडतात. त्या द्वारे इतिहासाचे आकलन होत असते. कोकणातील देवभोळ्या श्रद्धाळू, निसर्गपूजक मानवाने इथल्या हजारो वर्षापासून कथा-दंतकथेच्या माध्यमातून परंपरागत चालत आलेल्या प्रथा परंपरा आजवर श्रद्धापूर्वक जपलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. लांजा तालुक्यातील अशा वैशिष्ट्यपूर्ण दंतकथांचा हा धांडोळा ..........

- विजय हटकर
लांजा ः 8806635017


येथे मुचकुंदी होते वाकी तर केदारलिंग वाकोबा

लांजा शहरातून गोव्याकडे जाताना 8 कि. मी. अंतरावर वळणावळणाचा वाकेड घाट लागतो. हा घाट संपताच वाकेड गावचा थांबा लागतो. या थांब्यावरून आत गेल्यास वाकेड गावातील एकेक वैशिष्ट्ये आपल्या दृष्टिपथात येतात व आपण इतिहासाच्या एका अनोख्या पानात हरवून जातो. मुंबईच्या तंबाखू मार्केटवर वर्चस्व राखणाऱ्या शेट्येंचे गाव म्हणून इतिहासाच्या पानावर नोंदल्या गेलेल्या या गावात ग्रामदैवत धनी केदारलिंगाचे भव्य व लक्षवेधक मंदिर आहे; मात्र या गावात श्री देव केदारलिंगाला वाकोबा म्हणून संबोधले जाते तर गावाबाहेरून जाणाऱ्या मुचकुंदी नदीला वाकी नदी संबोधले जाते. यामागे एक रंजक कथा आहे. ही कथा गावकरी अभिमानाने सांगतात.

वाकेडग्रामची स्थापना झाल्यानंतर अर्धा गाव मुचकुंदी नदीच्या प्रवाहात बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तेव्हा गावकऱ्यांनी श्री देव केदारलिंगाचा धावा केला. ग्रामदैवत केदारलिंगाने भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या लत्ताप्रहाराने गावाच्या मधून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीला गावाबाहेरून वळवले व वाकेड गावावरील संकटाचे निवारण केले. या वेळी केलेल्या जोरदार लत्ताप्रहारामुळे धनी केदारलिंगाचा डावा पाय वाकडा झाला त्या क्षणापासून श्री केदरलिंगाला श्री वाकोबा हे नाव पडले. केदारलिंगाचा पाय वाकडा झाला ते स्थान वाकी म्हणून ओळखले जाते. या आख्यायिकेवरूनच या गावाला वाकेड हे नामाभिदान प्राप्त झाले तर मुचकंदी नदीला या गावाबाहेरून केदारलिंगाने वळवले म्हणून या नदीला वाकेडात वाकी नदी म्हटले जाते.
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या देखण्या सुंदर एकमजली लाकडी सभामंडप असलेल्या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली श्री देव वाकोबाची दोन फूट उंचीची काळ्या पाषाणातील उभी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती असून, तिच्या पाठीमागे सूर्यदेव आहे. या मूर्तीचे निरीक्षण केल्यास श्री देव वाकोबाचा डावा पाय वाकडा असल्याचे दिसते. तसे पाहता लांजा तालुक्यातील लांजा, पन्हळे व वाकेड या गावातील वैश्य शेट्ये घराणे एकाच कुळातील आहे. या कुळातील कर्तृत्ववान पुरुषांनी या तीनही गावात गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री केदारलिंगाची मंदिरे उभारली. ती लांजातील थोरला केदारलिंग, पन्हळ्यातील मधला केदारलिंग व वाकेडमधील धाकटा केदारलिंग या नावाने ओळखली जातात. या वाकोबा देवस्थानाचा आडिवऱ्यातील महाकाली देवस्थानाशी संबंध आहे. कारण, शेट्यांचे मुळपुरुष आडिवऱ्यातून येथे आले आहेत, अशी आख्यायिका सांगितली जाते. आडिवऱ्याच्या श्री देवी महाकालीने श्री वाकोबाची सत्त्वपरीक्षा घेण्यासाठी आपल्या वाघाच्या गळ्यात घाट बांधून त्याला श्री देव वाकोबाकडे पाठवले. हा घाट श्री वाकोबाने सोडवला व वाघाला परत पाठवले. सोबत आपल्या नंदीच्या गळ्यात घाट बांधून त्यास महाकालीकडे पाठवले; पण तो घाट महाकालीस सोडवता न आल्यामुळे तो नंदी आडिवऱ्यातील महादेवाच्या मंदिरात आजही या कथेची साक्ष देत स्थानापन्न आहे. या नंदीचे एक शिंग मोडलेले आहे. एकूणच या श्री वाकोबा मंदिरात कार्तिक वद्य दशमी तर अमावस्येपर्यंत श्रींचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने ग्रामस्थ साजरा करतात.

गोळवशीतील नागादेवी

गोळवशी गावाची ग्रामदेवता नागादेवीची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे. या मंदिरातील बायंगीदेव खूप प्रसिद्ध असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक श्रद्धाळू स्वतःच्या प्रगतीसाठी, व्यावसायिक भरभराटीसाठी या गावात येतात व बायंगीदेवाचे प्रतीक म्हणून इथून श्रीफळ किंवा बाहुली घेऊन जातात. बायंगी देवाचे प्रतीक म्हणून नेलेल्या श्रीफळ व बाहुलीची योग्य पद्धतीने चालणूक केल्यास व्यवसायात थक्क करणारी भरभराट होते तसेच या देवतेच्या तामसिक शक्तीची चालणूक योग्य पद्धतीने न केल्यास संपूर्ण घराची अधोगती होते, अशी आख्यायिका (दंतकथा) इथे गोळवशी गावात पाहावयास मिळते. खरंतर, या मागील सत्य-असत्यतेच्या वादात पडण्यापेक्षा आपले दारिद्र्य निर्मूलन होऊन कमी वेळेत प्रगती होईल, या भावनेने अनेकांची पावले या गावात वळतात. नागादेवीच्या मंदिराजवळ असणारी देवराई समृद्ध आहे तर जवळच असलेल्या 105 सतीशिळा शिल्पेही अभ्यासण्यासारखीच आहेत.

भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा
भडे गावामध्ये धगधगत्या निखाऱ्यावर चालण्याची परंपरा शेकडो वर्षे सुरू आहे. गुढीपाडव्याच्या मध्यरात्री आगीवर चालण्याचं अग्निदिव्य सहजतेनं केले जाते. अंगावर काटा आणणाऱ्या प्रथेत निखाऱ्यावर चालणारे कधी जखमी झालेत किंवा भाजलेत असं नाही. गावातील सती गेलेल्या महिलेची आठवण म्हणून सतीचा खेळ या नावाने ओळखली जाते. साधारण सायंकाळी 5 वा. होम पेटवला जातो. होमातून निखारे आणि जळकी लाकडे वेगळी केली जातात. पेटणारी लाकडे बाहेर काढली जातात. हे काम ग्रामस्थ सहजतेने करतात. सर्वात मोठा ओंडका कोण उचलून आगीत टाकतो, याचीही चढाओढ सुरू असते. नमन आटोपल्यानंतर होमाला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. मानकरी सर्वात प्रथम निखाऱ्यावरून चालतात. त्यानंतर सर्वचजणं बिनधास्तपणे हे अग्निदिव्य करतात. या गावात पहिला आलेला मूळ पुरूष मयत झाल्यावर त्याची पत्नी सती गेली. त्या सती गेलेल्या महिलेची आठवण ठेवण्यासाठी गावात शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे, असे ग्रामस्थ सांगतात. सती गेलेल्या महिलेचा गावावर कृपा आशीर्वाद राहतो, अशी गावाची श्रद्धा आहे. लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वच बिनधास्तपणे या पेटत्या निखाऱ्यारून अनवाणी धावतात. हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथ लोकं येतात. गोवा, कर्नाटक, बिहार राज्यातूनसुद्धा ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी हजेरी लावत असतात. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने काही वर्षापूर्वी या प्रकाराचा छडा लावण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थांच्या मनात हा सोहळा एक परंपरा म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलिकडे जाऊन या जळत्या निखाऱ्यावरून चालत जाण्याचं धाडस इथले शेकडो ग्रामस्थ स्वतःहून करतात. ना कोणावर सक्‍ती असते ना कोणाला गळ घातली जाते.
आज पर्यटन लोकांच्या गरजेनुसार आकार घेत आहे. निसर्गाशी नाते जोडणारे शाश्वत पर्यटन लोकांना हवे आहे. भेसळमुक्त नैसर्गिक अन्न, शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि त्याचबरोबरच शुद्ध विचारांना साथ घालणारे पोषक वातावरण लोकांना हवे आहे. आजचा पर्यटक सतत नवनवीन स्थळांच्या शोधात असतो. जिथे गेल्यावर सर्व कोलाहलापासून दूर केवळ निसर्गाचे संगीत ऐकण्यात मन रमून जाईल अशा ठिकाणी रिमझिमणाऱ्या श्रावणसरी अंगावर घेत ऊन-पावसाचा लपंडावाचा खेळ खेळत डोंगर-कपाऱ्यातून ढगांच्या-धुक्याचा पाठशिवणीच्या खेळात सहभागी व्हायला तो आतूर असतो. आधुनिक पर्यटक खूप निराळा आहे. तो पर्यावरण दक्ष आहे. मानवी जीवनातील निसर्गाचे महत्व तो जाणतो. चैन, सुख व सोयीस्कर पर्यटनाबरोबर आज शाश्वत अर्थात् इको टुरिझमला जागतिक पर्यटनात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या दृष्टिने कोकणातील लांजा तालुक्यात येणाऱ्या पर्यटकाला थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळ दाखवताना माचाळची सापड लोककला दाखवायला हवी. जावडे गावातील पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात जुना ब्राह्मणी लेणीसमूह दाखवताना जवळच्याच गोळवशी गावातील नागदेवता मंदिर इथल्या 105 सतीशीळाही दाखवायला हव्यात. मुंबईतील तंबाखू मार्केटचे वर्चस्व गाजवणाऱ्या शेट्येंच्या वाकेड गावातील वाकोबाचे भव्य मंदिर दाखवताना इथल्या रंजक कथा त्यांना सांगायला हव्यात. भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याचे अग्निदिव्य सहजतेने पूर्ण करणारी इथली ही वैशिष्ट्यपूर्ण प्रथा, कुवे व लांजा शहरातील जाकादेवीतील लोटांगण, प्रभानवल्लीतील पाच पालखींची भेट व पालखीनृत्य परंपरा दाखवायला शिमगोत्सवात इथे जाणीवपूर्वक पर्यटक आणावे लागतील. या छोट्या-छोट्या गोष्टींतून लांजा तालुक्यातील या प्रथा परंपरा देशभरात पोहोचतील. या अगम्य गूढ तितक्याच रंजक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा पाहायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून त्यातून तालुक्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळेल.