
‘सिंधुदुर्गा’वर शिवरायांचे स्मारक व्हावे
00964
मुंबई ः विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली.
‘सिंधुदुर्गा’वर शिवरायांचे स्मारक व्हावे
विशाल परब; विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्गातील मालवण येथे शिवरायांचे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’प्रमाणे भव्य स्मारक व्हावे, यांसह सिंधुदुर्गातील विविध मागण्यांचे निवेदन विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन दिले. या भेटीत विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड. संतोष सूर्यराव आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्गातील विविध खेळाडू, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्गातील मालवण येथे शिवरायांचे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’प्रमाणे भव्य स्मारक व्हावे, ही मराठा समाज तसेच शिवप्रेमींची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनामार्फत मांडली. क्रीडाप्रेमींसाठी कुडाळ येथे भव्य असे क्रीडा संकुल उभारावे, अशी मागणी केली. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय सूक्ष्म अवजड मंत्री नारायण राणे यांनी जाहीर केला होता. तळकोकणातील या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वर्षभरात पर्यटक येत असतात. यामुळे जिल्ह्यातील मंजूर झालेला ‘सी-वर्ल्ड’ प्रकल्प तातडीने व्हावा, अशी मागणीही परब यांनी केली. कोकणातील काजू बोंडू मोठ्या प्रमाणात गोव्यात जातो. या बोंडूवर प्रकिया करून वाईन निर्माण करणारी वायनरी आरोंदा-शिरोडासारख्या भागात व्हावी. यावर्षी आंब्याचे पीक केवळ २० टक्के असल्याने शेतकरी व बागायतदार चिंतेत आहे. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी परब यांनी केली आहे.
--
मुख्यमंत्र्यांकडून मागण्यांची दखल
जिल्ह्यातून घाटमाथ्यावर जाणारा एकमेव जवळचा मार्ग असलेला आंजिवडा घाट लवकर फोडून झाराप-माणगाव दुकानवाड आंजिवडे पाट या मार्गे कोल्हापूर मार्ग सुरू करण्याची मागणीही त्यांनी निवेदनातून केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन यावर सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनीही सर्व निवेदन वाचून संबंधित विभागांना तातडीने सूचना दिल्या आहेत. तर लवकरच कोकणचा दौरा करण्याची विनंती विशाल परब यांनी यावेळी केली.