किल्ले रायगडवर अडीच तासांत ''सायकलस्वारी''

किल्ले रायगडवर अडीच तासांत ''सायकलस्वारी''

00966
रायगड : आदित्य जगदीश बटावले या युवकाने रायगड किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत सायकल सफर केली.


किल्ले रायगडवर अडीच तासांत ‘सायकलस्वारी’

शिवरायांना अनोखा मुजरा; कुडाळच्या आदित्य बटावलेंचे विक्रमी धाडस

कुडाळ, ता. ६ ः जिल्ह्याचा सुपुत्र कुडाळ-एमआयडीसी ओंकारनगर येथील आदित्य बटावले या युवकाने १५ किलोच्या सायकलने रायगड किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत जाऊन तब्बल १,५०० खडतर पायऱ्या चढत अवघ्या २ तास २३ मिनिटे २१ सेकंद या वेळेत चित्त दरवाजा गाठून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. ही विक्रमी कामगिरी त्याने २९ एप्रिलला केली. किल्ले रायगडावर सायकलस्वारी करीत त्याने एक अनोखा विक्रम नोंदवला आहे.
‘राईड फॉर मावळे, डर के आगे मावळे’, ही ‘सायकल अॅडव्हेंचर राइड जर्नी सीरिज’ आदित्यने सुरू केली आहे. याद्वारे राज्यातील शक्य तेवढ्या गड-किल्ल्यांवर जाऊन पूर्ण तट सायकलने फिरून छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करणे, हे आपले ध्येय असल्याचे आदित्यने सांगितले. आदित्य बटावले येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून तो राष्ट्रीय छात्र सेनेचा माजी कॅडेट आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजांवर आणि संपूर्ण तटावर सायकल सफर केली. ८ जानेवारीला त्याने रांगणागडावर नारुर मार्गे जाऊन गडाची खडतर आणि धोकादायक वाट पार करून गड सर केला. पायी जाण्यासही भय वाटेल, अशा एका बाजूला खोल दरी, अवघड वाट पार करीत बुरुज, हत्ती सोंड माची (चिलखती बुरुज), केरवडा दरवाजा, उत्तर दरवाजा, पूर्व प्रवेशद्वार या खडतर ठिकाणी जाऊन एक नवीन विक्रम केला. येतानाही नारुरच्या दिशेने येणाऱ्या खडकाळ वाटेनेच तो उतरला. रांगणा गडावर खडतर वाटेने जाऊन संपूर्ण धोकादायक तट सायकलने फिरणारा जिल्ह्यातील तो पहिलाच युवक ठरला आहे. इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो, हे आदित्यने दाखवून दिले आहे. या संपूर्ण प्रवासासाठी आदित्यला ‘अवधूत प्रोजेक्ट’चे जाधव आणि सायकलिंग क्षेत्रात इन्स्पायर सायकल क्लब, कुडाळचे रुपेश तेली, आई-वडिलांचे सहकार्य मिळाले.
----
चौकट
मावळ्याच्या वेशात मुजरा
विशेष म्हणचे मावळ्याचा वेश परिधान करून किल्ले रायगडवर त्याने छत्रपती शिवरायांना अनोखा मुजरा केला. गडावर जाताना आपल्यात तीच ऊर्जा होती, जी शेवटपर्यंत कायम होती, असे तो म्हणाला. सायकलला आजच्या काळातील घोडा मानल्यास आपल्या खूप गोष्टी सोयीस्कर होतील. याच भावनेने सायकलरूपी घोड्यावरून महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांवर फेरफटका मारावा, हा या मागचा हेतू असल्याचे तो आवर्जून सांगतो.
--
कोट
छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्य उभे केले आणि त्यांच्या या इच्छाशक्तीची उदाहरणे म्हणजे आपले गड-किल्ले. छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन अनेक कामे करत असतो. शिवरायांच्या सहवासाने पुनित सर्व गड किल्ले सायकलस्वारीने फिरून सर करणे हे स्वप्न आहे.
- आदित्य बटावले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com