उपक्रमशील शिक्षक शाळेचे आधारस्तंभ

उपक्रमशील शिक्षक शाळेचे आधारस्तंभ

00986
कट्टा ः जिल्हा खरेदी-विक्री संघ अध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांचा सत्कार करताना संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर. शेजारी इतर.


उपक्रमशील शिक्षक शाळेचे आधारस्तंभ

व्हिक्टर डान्टस; कट्टा महाविद्यालयात गुणवंतांचा गौरव

ओरोस, ता. ६ ः उपक्रमशील शिक्षक व गुणवंत विद्यार्थी हे शाळेचे आधारस्तंभ आहेत. ज्या शाळेत उपक्रमशील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी असतील, ती शाळा नक्कीच यशोशिखरावर पोहोचेल. वराडकर हायस्कूलचा मी माजी विद्यार्थी व संस्थेचा सल्लागार मंडळातील सदस्य आहे, याचा अभिमान आहे. शाळेच्या यशस्वीतेसाठी निश्चितच योगदान देईन, असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालक तथा नवनिर्वाचित खरेदी-विक्री संघाचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनी केले.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमशील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहून आपापल्या विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविलेल्या उपक्रमशील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. वार्षिक परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी, एनएमएमएस परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, शासकीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, एसटीएस परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थी, एनसीसी विभागामार्फत आयोजित रायफल शूटिंग स्पर्धेतमध्ये जिल्हास्तरावर निवड झालेली विद्यार्थिनी, भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, क्रीडा, कला आदी विभागांमार्फत आयोजित विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी उपक्रमशील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. २०२६ चा शाळेचा शतक महोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी राबवित असलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे मत व्यक्त केले. संस्था सचिव सुनील नाईक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी तथा उद्योजक प्रमोद पेडणेकर व मिठबावकर, असोसिएटचे प्रवीण मिठबावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. खरेदी-विक्री संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने संस्थाध्यक्ष वराडकर यांच्या हस्ते व्हिक्टर डॉन्टस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समिती अध्यक्ष बापू वराडकर, संचालक महेश वाईरकर, मुख्याध्यापक संजय नाईक, वराडकर इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. विनायक जमदाडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक नाईक यांनी प्रास्ताविक केले. संजय पेंडूरकर, वीणा शिरोडकर, किसन हडलगेकर यांनी सूत्रसंचालन केले. रामकृष्ण सावंत यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com