
रेडीत १३ पासून विविध कार्यक्रम
रेडीत १३ पासून विविध कार्यक्रम
सावंतवाडी ः श्री देवी माऊली ट्रक चालक-मालक कल्याणकारी संस्था, रेडी या संस्थेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त १३ व १४ मे रोजी विविध सांस्कृतिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १३ ला रेडकर रिसर्च सेंटर व श्री देवी माऊली टक चालक-मालक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. यात कार्डिओग्राम, इसीजी, मधुमेह, पीएफटी व फुप्फुसाची तपासणी रेडकर हॉस्पिटल, रेडी येथे केली जाणार आहे. यासाठी नंदकुमार मांजरेकर व रेडकर हॉस्पिटल येथे १२ पर्यंत नोंदणी करावी. १४ ला माऊली मंदिर, रेडी येथे सकाळी दहाला श्रींची महापूजा, दुपारी बाराला महाआरती, साडेबाराला महाप्रसाद, सायंकाळी पाचला भजन, रात्री नऊला सांस्कृतिक कार्यक्रम, दहाला ‘स्टार मेलोडिक’ आर्केस्ट्रा होणार आहे.
---
डेगवेतील गतिरोधक ठरताहेत धोकादायक
बांदा ः बांदा-दोडामार्ग मार्गावर असलेल्या डेगवे श्री स्थापेश्वर मंदिराकडील गतिरोधकांच्या ठिकाणी फलक व पांढरे पट्टे नसल्याने वाहन चालक भरघाव वेगाने येणाऱ्या वाहनांचे सातत्याने अपघात घडत आहेत. दोन दिवसांत दुचाकी, एसटी व डंपरचा अपघात झाला. याबाबत डेगवे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उपविभागप्रमुख विजय देसाई व माजी सरपंच वैदेही देसाई यांनी लक्ष वेधले. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने व डंपरची वाहतूक सातत्याने होत असते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देसाई यांनी केली.
....................
सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर
कणकवली ः एसएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवलीतर्फे दरवर्षी ‘लक्ष्यवेध’ ही एमएचटी-सीईटीची सराव परीक्षा घेतली जाते. यावर्षी अनुक्रमे पीसीएम व पीसीबी ग्रुपमध्ये ही परीक्षा घेतली गेली. ४०० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मुख्य परीक्षेसाठी फायदा होईल, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या रजिस्टर ईमेलवर ‘लक्ष्यवेध २०२३’चा निकाल उपलब्ध करून दिला आहे. गुणवत्ता यादीत पीसीएम ग्रुप- श्याम पटेल, दुर्वा बांदेकर, साक्षी पोईपकर, प्रांजल सावंत (१५०), आसरा सिद्दीकी व अमोघ खेडेकर, पीसीबी ग्रुप १ मध्ये श्याम पटेल, सानिका परब, मनस्वी कोकाटे, सिद्धी मोरे, पांडुरंग काळे यांनी प्रथम पाच क्रमांक मिळविले. या विद्यार्थ्यांचे प्रा. डॉ. अनिश गांगल, शांतेश रावराणे, डॉ. शुभांगी माने व प्रा. सुयोग सावंत आदींनी अभिनंदन केले.