
शब्दसखा समूह-वाचनालयाचा न्हावेलीत वर्धापनदिन उत्साहात
01034
न्हावेली ः शब्दसखा समूह, वाचनालयाच्या वर्धापन कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.
शब्दसखा समूह-वाचनालयाचा
न्हावेलीत वर्धापनदिन उत्साहात
सावंतवाडी, ता. ६ ः न्हावेली (ता.सावंतवाडी) येथील मुख्याध्यापक श्री. मोर्ये यांच्या निवासस्थानी शब्दसखा समूह न्हावेली -निरवडे व शब्दसखा वाचनालयाच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त ‘ऋणानुबंध-भेट एका लेखिकेची’, हा विशेष कार्यक्रम झाला. यावेळी लेखिका वैशाली पंडित यांच्या साहित्यावर विशेष चर्चा, प्रकट मुलाखत व रसिकांचे खास आकर्षण असलेला ‘बालबगीचा’ हा कथाकथन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका पंडित होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, कवी दीपक पटेकर, शब्दसखा वाचनालयाचे अध्यक्ष श्री. मोर्ये, मुख्याध्यापक त्रिंबक आजगावकर, देवयानी आजगावकर, नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था शाखा सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रदीप सावंत, महिला अध्यक्ष पूजा गावडे, सौ. मोर्ये, राजेंद्र गोसावी, अदिती मसूरकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक त्रिंबक आजगावकर यांनी प्रास्ताविक केले. आपल्या शब्दसखा समुहाच्यावतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या व साहित्यप्रेमी नागरिकांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या जडणघडणीसाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद करत बालकांच्या मनावर संस्कार करणाऱ्या ‘बालबगीचा’ या विशेष कथाकथनाचे आयोजन केल्याचे सांगितले.