केंद्र सरकारला पत्र का लिहिले याचा खुलासा आवश्यक

केंद्र सरकारला पत्र का लिहिले याचा खुलासा आवश्यक

ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता
केंद्र सरकारला पत्र का लिहिले?

ठाकरेंनी खुलासा करावा ः उद्योगमंत्री सामंत; पत्रानुसारच माती परीक्षण सुरू

रत्नागिरी, ता. ६ ः माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यांनीच १२ जानेवारी २०२२ ला मुख्यमंत्री म्हणून केंद्र सरकारला पत्र दिले होते. त्यामुळे त्यांनीच ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता केंद्र सरकारला पत्र का लिहिले याचा खुलासा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सामंत यानी सांगितले.
ठाकरे यांच्या बारसू दौऱ्‍याच्या अनुषंगाने ऊहापोह श्री. सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ठाकरे यांच्या पत्रामध्ये बारसू येथील जमीन ओसाड आहे, कातळ आहे, त्यावर काहीच उगवत नाही असा उल्लेख होता. येथे होणारा रिफायनरी प्रकल्प जगातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याने तो बारसूला यावा असेही त्यात नमूद आहे. ग्रीन रिफायनरीमुळे पर्यावरणाचा ऱ्‍हास होणार नाही आणि यामधून महाराष्ट्राला आर्थिक ताकद मिळणार आहे असेही नमूद होते. या पत्रानुसारच सध्या बारसू येथे माती परीक्षण सुरु केले आहे. आतापर्यंत ९१ पैकी ३५ बोअर पूर्ण झाल्या आहेत. ५ हजार एकरपैकी २५०० एकरची संमतीपत्रे मिळालेली आहेत, असे त्यांनी सांगितले.
स्थानिकांना भेटण्यासाठी नेत्यांनी जाण्यास विरोध नाही, मात्र बाहेरून माणसे नेण्याची गरज नाही. ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जे सांगितले त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. स्थानिकांना विश्‍वासात घेतल्याशिवाय हा प्रकल्प आणला जाणार नाही. महाराष्ट्र शासन या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. लोकांवर पोलिसांचा दबाव येणार नाही. सध्या फक्त माती परीक्षण सुरु आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच कंपनी निर्णय घेणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्‍यांच्या शंका दूर केल्या जातील. त्यामुळे ग्रामस्थांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता प्रामाणिकपणाने शासनाशी चर्चा करावी, असे आवाहनही त्यानी केले.
-----------------------------
चौकट
आकडेवारीच सादर केली
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्‍याला ग्रामस्थ किती होते याबाबतचा अहवाल प्रशासनाने सादर केला आहे. ठाकरे यांनी गिरमादेवी कोंड येथे विरोधकांशी चर्चा केली. त्यावेळी सुमारे ३०० ते ३५० लोक उपस्थित होते. त्यांच्यापैकी ग्रामस्थांची संख्या १५० ते १७० होती. उर्वरित लोक बाहेरील होते. पत्रकार व इतर मीडियाची संख्या साधारण २० ते २५ होती. बारसूतील ग्रामस्थ उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. ठाकरेंनी सोलगाव फाटा येथे रिफायनरी विरोधकांशी चर्चा केली. तेथे २०० ते २२५ लोक उपस्थित होते. त्यापैकी १०० ते ११० ग्रामस्थ तर उर्वरित बाहेरील लोक होते, असे श्री. सामंत यांनी सांगितले.
---------------------------

चौकट
पवार यांच्याशी चर्चा
ठाकरे यांनी दौऱ्‍यामध्ये कातळ शिल्पाची पाहणी केली; परंतु प्रकल्पासाठी जमीन घेताना कातळ शिल्पांची जागा वगळली जाणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. तसेच दौरा पाहिला तर ग्रामस्थांबाबत बोलण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्यावरच अधिक टीका केली. प्रकल्पाविषयी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे, असे सामंत यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com