
दुर्धर आजाराने त्रस्त महिलांना मिळणार आर्थिक मदत
दुर्धर आजाराने त्रस्त महिलांना आर्थिक मदत
चिपळूण नगर पालिका ; महिला व बालकल्याण समितीची योजना
चिपळूण, ता. ६ ः नगर पालिका हद्दीतील दुर्धर आजाराने त्रस्त महिलांना आर्थिक मदतीचा हात देण्याची योजना पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे राबवली जात आहे. शहरातील कॅन्सर, हृदयरोग, किडनी, अर्धांगवायू आदींसारख्या आजाराची लागण झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून, त्यासाठी १५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
दुर्धर आजार असणाऱ्या महिलांना ४ ते १५ मे पर्यंत चिपळूण नगर पालिकेच्या नागरी सुविधा केंद्र येथे अर्ज करता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल तसेच विहित मुदतीत दाखल केलेल्या परिपूर्ण अर्जांचा विचार केला जाईल. या संदर्भातील अधिक माहिती महिला व बालकल्याण विभागप्रमुख प्रसाद साडविलकर यांच्याकडे मिळेल. नगर पालिकेच्या महिला व बालकल्याण समिती विभागामध्ये सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत अर्ज मिळू शकेल. या अर्जासोबत रहिवासी पुरावा, रेशनकार्ड, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स (नाव, खाते क्रमांक, आयएफसीकोड क्रमांक आदी माहिती), मतदान ओळखपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
रुग्ण भूमिहीन, अल्प भूधारक, दारिद्र्य रेषेखालील अथवा स्वातंत्र्यसैनिक असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. रुग्ण दुर्धर रोगाने पीडित असल्यास प्राधिकृत वैद्यकीय संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे अथवा जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तरी या योजनेचा लाभ इच्छुक महिलांनी घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे व महिला व बालकल्याण समिती प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर यांनी केले आहे.