आंदोलक न फिरकल्याने बारसू सड्यावर ''रविवार''

आंदोलक न फिरकल्याने बारसू सड्यावर ''रविवार''

पान 1 )

01278

आंदोलक न फिरकल्याने सड्यावर ‘रविवार’
पोलिस, प्रशासनाला मिळाली उसंत; अडथळ्यांविना सुरू आहे माती परीक्षण
राजापूर, ता. ७ ः तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप - प्रत्यारोप रंगले. नेते आल्यामुळे आरोपांची राळ उठली. त्यातून वातावरण तापल्याने आंदोलन कसे सुरू राहणार याचीच चर्चा सुरू आहे. मात्र, सडा परिसराकडे रविवारी फारसे आंदोलक फिरकलेले नसल्याने बारसू परिसराचा सडा शांत होता. दरम्यान, गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेले माती परीक्षण आजही सुरू होते.
तालुक्यातील बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरीसाठी माती परीक्षणाचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याला ग्रामस्थांकडून विरोध करण्यात येत आहे. या माती परीक्षणाच्या कामावरून पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये संघर्षही झाला होता. मात्र, त्यानंतरही माती परीक्षणाचे काम सुरू होते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने रिफायनरीच्या अनुषंगाने ग्रामस्थांशी विशेष बैठक घेऊन संवादही साधला होता. या साऱ्या घडामोडी घडत असताना काल राजापूरच्या विकासासाठी रिफायनरीचे आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत रिफायनरी झालीच पाहिजे, या मागणीसाठी प्रकल्प समर्थकांनी काल मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या माध्यमातून प्रकल्प समर्थकांनी शक्तिप्रदर्शनही केले होते. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही काल बारसू परिसराला भेट देऊन प्रकल्प विरोधक ग्रामस्थांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी शिवसेना लोकांसोबत असून लोकांना प्रकल्प नको असेल तर शिवसेनेचा विरोध अशी भूमिकाही स्पष्ट केली होती.
या साऱ्या घडामोडीमध्ये आज आंदोलक अधिक आक्रमक होणार की शांत राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, बारसू परिसराच्या सडा परिसराकडे फारसे आंदोलक फिरकलेले नाहीत. त्यामुळे कालच्या दिवसभरातील तणावपूर्ण वातावरणानंतर आज बारसू सडा परिसर शांत होता. माती परीक्षण सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस फौजफाटा कायम तैनात ठेवण्यात आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com