सदर ः पाणी शोधताय

सदर ः पाणी शोधताय

२५ (टुडे पान ३ साठी, सदर)
३ मे टुडे तीन
टेक्नोवर्ल्ड ....................लोगो


-rat८p१२.jpg
ः २३M०१३८६
संतोष गोणबरे
--
पाणी शोधताय..?

उन्हाळा जसजसा तीव्र होऊ लागतो तसतसा आपल्या आजूबाजूचा उपलब्ध पाणीसाठा आटायला लागतो. आपल्या विहिरीचे किंवा बोरवेलचे पाणी खोल जायला लागते. पाणीपुरवठा करणारी सरकारी यंत्रणा म्हणते की, धरणातील पाणीपातळी घसरली आहे. आता पाणीकपात होणार..!
मित्रहो, एका वेळ अशी येते की, पिण्यासाठीदेखील पाणी कपात उरत नाही. सरकारने टँकरमुक्तीच्या कितीही घोषणा केल्या तरी वेळेला पैसे मोजून पाणी ओतणारा टॅंकरवालाही सापडत नाही. मग आपण नवीन पाणीसाठा शोधण्याचा खटाटोप सुरू करतो. जमिनीत अगदी खोल खोल घुसतो; पण भूजलाची पातळी सापडते का हो? कुठे बरं दडून बसलेली असते ती? खडकाच्या आड दडणाऱ्या त्याच पाण्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करू या.
-----

पाणी हा हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांच्यापासून बनलेला एक रेणू द्रव पदार्थ आहे. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. पाणी रंगहीन, गंधहीन असून त्याला स्वतःची चव नसते. तरीही ते प्राणी- वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. पाणी एका जागी स्थिर झाल्यास गुरूत्वाकर्षणामुळे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७२ टक्के इतके असूनही ते पिण्यासारखे नाही. समुद्रात पाणी सुमारे ९६.५ टक्के आहे. पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३ टक्के आहे. जमिनीवर पडलेले पाणी प्रथम जमिनीत जिरते. मातीच्या मगदूर व जमिनीच्या उताराप्रमाणे पाण्याला पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणामुळे गती मिळते. जमिनीची धूप, ओहोळ, नाले, नदी यांच्या निर्मितीचे मूळ कारण पाण्याला मिळालेली गती हेच आहे. भूगर्भातील खडकाला जर खड्डा असेल आणि तिथे पठारावस्था तयार झालेली असेल तर तिथे पाणी साठून राहते. पाचव्या शतकात वराहमिहीर नावाचा प्रकांड ज्योतिषी व पर्यावरणशास्त्रज्ञ होऊन गेला. भूगर्भातील पाण्याच्या लक्षणांविषयी त्याने आपल्या बृहत्संहिता या ग्रंथात ‘दकार्गल’ या ५३व्या अध्यायात लिहून ठेवले आहे. आकाशातून पडणाऱ्या पाण्याची चव, रंग प्रथमतः एकाच स्वरूपाची असते; परंतु जसजसे ते पाणी जमिनीत जिरू लागते तसतशी त्याची चव, रंग आदी गुणधर्म भूमीच्या किंवा मातीच्या प्रकाराप्रमाणे भिन्न भिन्न होत जातात.
डोंगराळ, उंच-सखल भाग, पाण्याने माती वाहून गेलेले खडक, दगड-रेती उघडी पडलेली ओसाड जमीन तसेच जिथे मातीची साठवण होते ती सुपीक जमीन पाण्याची गती किंवा पाण्याच्या अडवणुकीप्रमाणे तयार होते. इथे औदुंबर, ताड, मंदार, शमी, दुर्वा, लव्हाळ, जांभूळ इत्यादी झाडे जर उगवलेली असतील तर अशा झाडांजवळ पाणी निश्चित असते. मुंग्यांची वारूळेसुद्धा पाण्याच्या जवळपास असतात. माळरानात सहसा झिरोफाइट्स म्हणजे निवडुंग, काटेरी झुडपे, कोरफड, खुरटे गवत अशा प्रकारच्या कमी पाण्याची गरज असणाऱ्या वनस्पती जर उगवल्या असतील तर या भागात पाण्याचा साठा नसेल, हे लक्षात घ्यावे. पेन्सिलएवढ्या जाडीची लवचिक ताजी ‘वाय’ आकाराची उंबर, जांभूळ किंवा मेंदी या झाडाची फांदी छातीजवळ धरून जमिनीवरून चालले तर पाण्याच्या गुरूत्वीय बलाने विशिष्ट ठिकाणी फांदी हलकासा धक्का देते. त्यातून त्या ठिकाणचा जलस्तर ठरवता येतो. याच गुरूत्वीय तत्त्वाने लोलक गोल गोल फिरतो. दोऱ्याची लांबी व लोलकाची फिरण्याची गती यावरून पाण्याची खोली व पाण्याचे प्रमाण निश्चित करता येते. तळहातावर जर नारळ घेऊन शेतात जर वर्तुळाकार फिरले तर नारळ जिथे उभा राहतो तिथे पाण्याचा प्रवाह खळाळता आहे, असे बेशक समजावे. खेकडे आणि बेडूक पाणी असलेल्या ठिकाणी जमीन कोरण्यास सुरवात करतात. कोरड्या विहिरीत भरपूर खेकडे सोडल्यास ते या विहिरी सजल करतात, असाही काहीसा अनुभव आहे.
पण या झाल्या काहीशा पारंपरिक आणि उपशास्त्रीय पाणी शोधण्याच्या पद्धती. कारण, इथे पृथ्वीच्या भूगर्भीय गुरूत्वीय बलाचे गुणधर्म माहित असणे गरजेचे आहे. मित्रहो, जसजसे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खोल जाऊ तसे गुरूत्वाकर्षण कमी होत जाते. या गुरूत्वीय रेषेत जर पाण्याचा प्रवाह आला तर ते कोणत्या प्रकारे बदलेल, याची नक्की माहिती असणे म्हणजे शुद्ध शास्त्रीय पद्धती. पाण्याचा अंत:प्रवाह शास्त्रीय परिमाणात शोधण्यासाठी स्ट्रेटा रेजिस्टिविटी हे विजेच्या बॅटरीवर चालणारे उपकरण तयार करण्यात आले आहे. या यंत्रात चार धातूचे इलेक्ट्रोड, बॅटरी, मायक्रो व्होल्टमिटर, मायक्रोॲमिटर व इलेक्ट्रोड जोडणारी इन्सुलेटेड वायर असे भाग असतात. इलेक्ट्रोड जमिनीत खोचून त्यांना पाणी घालून ते विद्युतभारीत केले जातात. शुद्ध पाण्यातून (डीस्टील वॉटर) विद्युतप्रवाह संक्रमित होत नाही; मात्र क्षार धारण करणाऱ्या पाण्यातून असा प्रवाह सहज निर्गमित होतो. इथे अॅमिटर इलेक्ट्रोडच्या अगदी मध्यभागी १५ ते २० फुटांवर आणखी दोन इलेक्ट्रोड जमिनीत खोचून पाण्याचा दाब मोजता येतो. नंतर अॅमिटर इलेक्ट्रोडमधील अंतर बदलून अॅमिटर व व्होल्टमिटरच्या अंतराप्रमाणे अनेक नोंदी कराव्या लागतात. ज्या ठिकाणी भरपूर पाणी असते तेथे वीजप्रवाह जास्त असतो तर जेथे वीजप्रवाह खंडित होतो तेथे विनापाण्याचा अभेद्य खडक आहे, असे मानण्यात येते. मित्रहो, जर तुम्हाला सरकारी अनुदान प्राप्त करायचे आहे तर प्रशिक्षित इंजिनिअरकडून तुम्हाला जमिनीतून अशाच शास्त्रीय पद्धतीने पाणी मोजून त्याचा रिपोर्ट पाणीयोजनेच्या अनुदान फाईलसोबत जोडावा लागतो. याशिवाय, जिओफोन हे चुंबकीय लहरींची गती मोजणारे यंत्रसुद्धा वापरले जाते. सिस्मिक लहरींच्या आधारे भूगर्भातील हालचाली नोंदवून त्या वेगाला व्होल्टेजमध्ये परावर्तित करण्याचे तत्व या यंत्रात वापरले जाते.
भूजलाची गुणवत्ता तपासण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे येथे रासायनिक प्रयोगशाळेची स्थापना १९८६ ला करण्यात आली आहे. त्या आधी म्हणजे १९७२ ला स्वतंत्र संचालनालयदेखील स्थापन करण्यात आले आहे. १९८८ मध्ये प्रयोगशाळेचे विकेंद्रीकरण करून पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे विभागीय प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या. जिल्ह्यातील लघुपाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी व प्रदुषणाचा उगम शोधणे तसेच राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल अभियानांतर्गत भूजल गुणवत्ता नकाशे तयार करणे अशी महत्वाची कामे शासकीय पातळीवर सुरू आहेत. सध्या एकूण १८३ प्रयोगशाळा असून, त्यापैकी ६ विभागीय, २८ जिल्हा व १४३ उपविभागीय अशा एकूण १७७ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मित्रहो, मोबाईलवर वॉटर डिटेक्टर नावाचं अॅप उपलब्ध असून, त्यावर किती विश्वास ठेवावा हे तुमचं तुम्हीच ठरवा. एक मात्र नक्की, पाण्याची निकड उन्हाळ्यात जेवढी भासते तेवढीच ती गरज आपण पावसाळा सुरू झाला की, विसरून जातो. जेवढे पाणी आपण पावसाळ्यात साठवण करू तेवढेच पाणी आपल्याला पाऊस संपला की, वापरता येणार आहे. हवेतून पाणी निर्माण करण्याचे प्रयोग बर्कले विद्यापीठ, एक्स मूनशॉट लॅबोरॅटरी येथे सुरू आहेत; पण फुकटच्या पाण्याला भविष्यात पैसे देण्यापेक्षा वर्तमानात ते आपण जमा करून ठेवले तर..? नाहीतर आपल्याला संपत्ती जमा करण्याचा सोस आहेच..!

(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com