
चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
चिपळुणात शनिवारी जलपरिषद
चिपळूण ः येथील हेल्प फाउंडेशनच्या वतीने शनिवारी (ता.13) जलपरिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला सिंचन विभागाचे माजी सचिव व सिंचनतज्ज्ञ दि. म. मोरे, पर्यावरणवादी अॅड. असीम सरोदे, आर्किटेक्ट सारंग यादवाडकर मार्गदर्शन करणार आहेत. येथील डीबीजे कॉलेजच्या सभागृहात 13 मे रोजी सकाळी 10 वाजता ही परिषद होणार आहे. आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रांताधिकारी प्रवीण पवार, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आदी उपस्थित राहणार आहेत. दि. म. मोरे यांनी 1972 ला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पुणे विद्यापिठात सुवर्णपदक मिळवले. पारंपरिक जल नियोजन या विषयात डॉक्टरेट मिळवली. चिपळूण शहराच्या भविष्यातील नियोजनबाबत महत्वाच्या ठरणाऱ्या या परिषदेला नागरिकांनी व अभ्यासकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश कदम आणि सहयोगी आशिष जोगळेकर यांनी केले आहे.
देवरूख महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
साडवली ः आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात 11 वीतील विविध वर्गात गुणानुक्रमे प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना संस्था व महाविद्यालयाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ॲड. वेदा प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. यामध्ये गौरी सागवेकर, श्रुती सागवेकर, सुचिता गित्ते (11वी कला), निधीता वेलवणकर, आर्या राजवाडे, साक्षी चाळके (11वी वाणिज्य). गायत्री रामाणे, साहिल पाकतेकर, प्रीती माईन (11 वी संयुक्त कला व वाणिज्य). करिष्मा गुरव, अनेश झेपले, श्रावणी शिवगण (11 वी वाणिज्य-ब). मयुरी साळवी, धनश्री जुवळे, विभागून समृद्धी नार्वेकर आणि ऐश्वर्या गुरव (11वी बँकिंग व ऑफिस मॅनेजमेंट). प्राचार्य डॉ. तेंडोलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सापुचेतळे-खानवली रस्ता
दुरुस्तीसाठी 8 लाख मंजूर
लांजा ः तालुक्यातील सापुचेतळे ते खानवली फाटा या रस्ता दुरुस्तीसाठी येथील युवा कार्यकर्ते प्रतीक खरात आणि प्रथमेश गोरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 30 मे अखेरपर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येणार आहेत. त्यासाठी 8 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खरात यांनी दिली. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वारंवार करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने 15 वर्ष अधिक काळ रस्त्याची दुरवस्था झाली होती. पावसाळा हंगाम जवळ आल्याने रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे एसटी वाहतूक व अन्य खासगी वाहतूक ठप्प होऊन त्याचा फटका प्रवासीवर्ग, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना बसणार होता. म्हणूनच या रस्त्यासाठी खरात, प्रथमेश गोरे यांनी आंदोलनाचा इशारा देत 1 मे रोजी उपोषणदेखील त्यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला असून पावसाळ्यानंतर लगेचच कामाला सुरवात होईल. रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी 8 लाख रुपये देऊन हे काम 30 मे पूर्वी केले जाणार आहे.