
हस्ताक्षर कार्यशाळेस मालवणात प्रतिसाद
हस्ताक्षर कार्यशाळेस
मालवणात प्रतिसाद
मालवण ः बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे तीन दिवसीय हस्ताक्षर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावंतवाडी येथील विकास गोवेकर यांनी मार्गदर्शन केले. अक्षर कसे वळणदार काढावे, अक्षराची उंची, वेलांटी, उकार याची ठेवण याचे मार्गदर्शन गोवेकर यांनी केले. सोहम गवाणकर, हेरंभ गावकर, उत्कर्ष भिसे, रोशन साळुंके, अथर्व वालावलकर, शांभवी मोटे, मृण्मयी वालावलकर आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. ज्योती तोरसकर आणि शिवराज सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलांच्या उत्तम यशासाठी सुंदर अक्षर असणे किती आवश्यक आहे, याचे महत्व पटवून दिले. या समारोप कार्यक्रमास लक्ष्मीकांत खोबरेकर, विद्या गोवेकर, स्वप्ना गोवेकर, वैष्णवी आचरेकर, रुचिरा चिंदरकर आदी उपस्थित होते. व्यवस्थापक संजय आचरेकर यांनी सूत्रसंचालनकेले. या कार्यशाळेचा दीडशे मुलांनी लाभ घेतला.
--
कुडाळात २८ ला
वक्तृत्व स्पर्धा
कुडाळ ः महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ कुडाळ शाखा साहित्य समितीतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त २८ मे रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यान येथील बॅ. नाथ पै विद्यालय येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा तालुका मर्यादित असून सर्व ज्ञातींसाठी आहे. ही स्पर्धा शालेय गट व खुला गट अशा दोन गटांत होणार आहे. शालेय गटासाठी (नववी ते बारावी) मला समजलेले सावरकर, सावरकरांचे मराठी भाषेसाठी योगदान, सावरकरांची अंदमानातील कारकीर्द, तर खुल्या गटासाठी (१८ वर्षांवरील) ‘माझी जन्मठेप’ पुस्तकाचे रसग्रहण, हिंदुत्ववादी सावरकर, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’, हे विषय आहेत. विजेत्यांना अनुक्रमे २५०१, २००१ व १५०१ रुपये, उत्तेजनार्थ १ हजार रुपयांची दोन बक्षिसे व सहभागी प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी २५ मेपर्यंत अमोल करंदीकर यांच्याशी संपर्क साधावा. शालेय गटासाठी शाळेचे ओळखपत्र आवश्यक आहे.
...............
कथाकथन कार्यक्रम
मालवणात उत्साहात
मालवण ः येथील श्री शिवाजी वाचन मंदिरतर्फे आयोजित कथाकथन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैदिका तुडवे हिने गौतम बुद्धांच्या जीवनातील दोन गोष्टी रंजक पद्धतीने सांगितल्या. दाक्षायणी जुवाटकर या बाल वाचकाने बुद्धांचे जीवन चरित्र गोष्टी रुपात सांगितले. तसेच श्रीधर काळे यांनी गौतम बुद्धांच्या जीवनातील घडलेल्या घटना गोष्टी रुपात सांगितल्या. जातक कथाही सांगितल्या. मुलांना पुस्तके भेट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. सौ. शेवडे यांनी श्रीधर काळे यांना पुस्तक भेट देऊन आभार मानले. इतर उपस्थित मुलांना पुस्तके भेट देऊन त्यांना वाचनासाठी प्रेरणा देण्यात आली. यावेळी वाचन महोत्सवात सहभागी बालवाचक, पालक व श्रोते उपस्थित होते.
---
कोचरेत शुक्रवारी
भवानीचा गोंधळ
कुडाळ ः कोचरा-चव्हाटा येथे तेली कुटुंबीयांतर्फे भवानी देवीचा गोंधळ उत्सव शुक्रवारी (ता. १२) साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासून देवीचे धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद व रात्री गोंधळ उत्सव होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन तेली कुटुंबीयांनी केले आहे.