
विरोधकांनी कार्यपद्धती तपासावी
01499
सिंधुदुर्गनगरी : येथे पत्रकार परिषदेत बोलताना राजन कोरगावकर. शेजारी नारायण नाईक, अनंत राणे, चंद्रसेन पाताडे आदी.
विरोधकांनी आपली कार्यपद्धती तपासावी
राजन कोरगावकर; आरोपांची दखल घेत नाही
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः विरोधी पॅनलच्या व्यक्ती बिनबुडाचे आरोप करून पतसंस्था निवडणुकीच्या प्रचारात पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु गेल्या २२ वर्षात आम्ही कधीच आर्थिक गैरव्यवहार केलेले नाहीत; मात्र आरोप करणाऱ्यांनी आपली कार्यपद्धती तपासावी. विरोधक भयभीत झाले आहेत. ते पूर्ण पॅनलसाठी मत न मागता एक मत मागत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांची दखल आम्ही घेत नसून आरोप आम्हाला मान्य नाहीत, असा पलटवार सत्ताधारी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे प्रमुख राजन कोरगावकर यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी पंचवार्षिक निवडणूक रविवारी (ता.१४) होत आहे. यासाठी सत्ताधारी भाग्यलक्ष्मी सहकार विरुद्ध परिवर्तन सहकार अशी दोन पॅनल निवडणूक रिंगणात आहेत. या अनुषंगाने परिवर्तन पॅनलने पत्रकार परिषद घेत भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलवर अनेक आरोप केले होते. त्याला आज कोरगावकर यांनी उत्तर दिले आहे. यावेळी शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, सचिव सचिन मदने, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, पतपेढी अध्यक्ष नामदेव जांभवडेकर, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे राज्य प्रतिनिधी अनंत राणे, श्रीकृष्ण कांबळी, प्रशांत दळवी, किशोर गोसावी, निलेश ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी कोरगावकर पुढे म्हणाले, "आमचे पॅनल शिक्षकांशी बांधील आहोत. त्यांचे प्रश्न घेवून आम्ही काम करतो. त्यामुळे आमच्यावर शिक्षक मतदारांचा विश्वास आहे. जर आमच्यावर विश्वास नसता तर २२ वर्षे सत्ता दिली नसती. गतवर्षी सहा कोटींच्यावर नफा संस्थेला झाला आहे. विद्यमान संचालकांत तीन संचालक विरोधी होते. मात्र, त्यांनी कधीच विरोध केलेला नाही. विरोध केला असेल तर लेखी पुरावा दाखवावा. आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षक आमच्यामुळे कार्यमुक्त होवू शकले. पण, विरोधक चुकीची अफवा पसरवीत आहेत. त्यांचे पॅनल एकसंघ नाही. दोडामार्ग आणि वेंगुर्ले येथे बंडखोरी झाली आहे. वेंगुर्ले येथील मुख्य उमेदवाराला माघार घ्यावी लागली आहे. आमचा जाहीरनामा, पत्रके त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळे त्यांना आपण पराभूत होणार याची खात्री झाली आहे. विरोधकांचा पंधराही जागांवर पराभव होण्याचे या निवडणुकीत परिवर्तन होणार आहे."
----------------
चौकट
भ्रष्टाचाराची री पुन्हा ओढली जाईल
शिक्षक संघाच्या तत्कालीन संचालकांने व शाखा अधिकाऱ्याने ५४ लाखांचा भ्रष्टाचार केला आहे. ते सिद्ध झाले असून त्याची वसुली सुद्धा सुरू झाली आहे. त्यांची काही प्रॉपर्टी सिल होणार आहेत. पतसंस्थेची आर्थिक स्थिती पाहून जाहीरनाम्यात घोषणा करणे आवश्यक आहे. पण, विरोधकांनी केलेल्या घोषणा पाहता दोडामार्ग तालुक्यातील भ्रष्टाचाराची री पुन्हा ओढली जाण्याची शक्यता आहे, असाही आरोप यावेळी कोरगावकर यांनी केला.
------------------
चौकट
...म्हणून निवडणूक
ही निवडणूक बिनविरोध व्हावी व संस्थेचा खर्च वाचवा, यासाठी आम्ही प्रयत्न केला. तीन महिन्यांपासून हा प्रयत्न सुरू होता. आम्ही त्यांना १५ पैकी तीन स्टँडिंग संचालक व एक स्वीकृत संचालक देण्यास तयार होता. त्यांची पाच स्टँडिंग संचालकांची मागणी होती. अखेर आम्ही चार स्टँडिंग संचालक व एक स्वीकृत संचालक देण्यास तयार झालो. परंतु, त्यांना ते मान्य न झाल्याने ही निवडणूक होत असल्याचा आरोप यावेळी कोरगावकर यांनी केला.