
ःघरासाठी रुद्र चव्हणचे प्रांत कार्यालयासमोर उपोषण
२६ (पान २ साठीमेन)
- ratchl८५.jpg ः
२३M०१४१८
चिपळूण ः घरासाठी प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसलेला रूद्र चव्हाण सोबत आत्या व नातेवाईक.
---
घरासाठी रुद्र चव्हणचे प्रांत कार्यालयासमोर उपोषण
तिवरे दुर्घटनेत कुटुंब गमावले ; घराची मागणी केली नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या तिवरे धरण दुर्घटनेत धरणाच्या पायथ्याशी असलेल्या भेंदवाडीतील २२ जणांचा हकनाक बळी गेला होता. या घटनेत आपले आई-वडील आणि बहीण गमावलेला रूद्र चव्हाण याला अद्याप घर मिळालेले नाही. त्याच्या हक्काचे घर मिळण्यासाठी सात वर्षीय रूद्रसह त्यांच्या नातेवाइकांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले. रूद्रच्या पालकत्वाचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने तसेच घरांची सोडत काढताना त्यांच्या नातेवाइकांनी रूद्रसाठी घराची मागणी केली नसल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.
२ जुलै २०१९ च्या रात्री तिवरे धरण फुटल्याने भेंदवाडीतील २२ जणांचा बळी गेला होता. या घटनेत रूद्रचे आई-वडील तसेच बहिणीचा मृत्यू झाला होता. पुनर्वसनअंतर्गत अलोरे येथे २४ घरे बांधण्यात आली. दीड वर्षापूर्वी या घरांची सोडत काढून त्याचे वाटप करण्यात आले; मात्र त्यामध्ये रूद्रला घर मिळाले नाही. सोडत लागलेल्यापैकी सीताराम रामाने यांनी तिवरे गावी पुनर्वसन करण्याची मागणी केल्याने घर नं. २१ रिकामे होते. हे घर रूद्रला देण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी येथील प्रांताधिकाऱ्यांना याबाबतची योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे रूद्रचे काका अजित चव्हाण यांच्याकडे या घराची चावी सुपूर्द केली आहे; परंतु रूद्रची आत्या मनाली संतोष माने हिने त्यावर आक्षेप घेतला आहे. अजित चव्हाण यांनी स्वतःला घर घेताना आधी रूद्रचा विचार करायला हवा होता, असा मुद्दा उपस्थित करून घराच्या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे.
या विषयी माहिती देताना प्रांताधिकारी प्रवीण पवार म्हणाले, धरण फुटल्यानंतर संपूर्ण भेंदवाडीच उद्ध्वस्त झाल्याने त्यांचे अलोरे येथे कायमचे पुनर्वसन करण्याचे ठरले. यामध्ये एकूण ५६ लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २४ घरांचे वाटप करण्यात आले. उर्वरित ३२ कुटुंबांचे पुनर्वसन झालेले नाही. या यादीत रूद्रच्या नावाचा समावेश आहे. घरांची सोडत काढण्यापूर्वी तिवरे येथील गावमंदिरात बाधित कुटुंबांची बैठक घेतली होती. ज्यांना स्वतःचे एकही घर नाही अशांना प्राधान्याने घर देण्याचे ठरले. सोडत काढताना १० घरांसाठी ११ नावे निघाली. यात १० घरांचे वाटप झाल्यावर अजित चव्हाण हे शिल्लक राहिले होते; मात्र महादेव रामाने यांनी अलोरेऐवजी तिवरे येथे घराची मागणी केल्यानंतर अजित चव्हाण यांना त्या घराचा ताबा देण्यात आला. त्या वेळी या प्रक्रियेवर कोणीच आक्षेप घेतला नव्हता; मात्र दोन महिन्यापासून रूद्रला घराची मागणी पुढे आली. मनाली माने यांनी अजित चव्हाण यांच्या घराविषयी आक्षेप घेतला आहे, तर पुनर्वसनातील २४ घरांपैकी केवळ १० लोक राहतात. प्रामुख्याने रूद्रच्या पालकत्वाचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने घराचे वाटप रखडले आहे.