रानमेव्याने फुलली बाजारपेठ

रानमेव्याने फुलली बाजारपेठ

४२ (पान ५ साठी, संक्षिप्त)

रानमेव्याने फुलली बाजारपेठ

चिपळूण ः आंबा, फणस या मोठ्या फळांबरोबरच मे महिन्यात म्हणजेच वसंत ऋतूत रानटी फळेही बाजारपेठांमध्ये दाखल झाली आहेत. बाजारपेठेत जांभूळ, करवंद, तोरणे, अळू आदी रानमेवा दाखल झाला आहे. वर्षांतून एकदाच आस्वाद घ्यायला मिळणारी ही फळे चिपळूणच्या बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. शहरातील चिंचनाका, पानगल्ली भागात ग्रामीण भागातून आलेल्या महिला टोपल्यातून बाजारात ही फळे विकायला बसलेल्या दिसत आहेत. १० रुपये एक वाटा या दराने करवंदे, जांभूळ आणि राजन वसईच्या बाजारात विकली जातात. ५० ते ६० वाटे एका टोपलीत साधारणपणे असतात. ४५० ते ५०० रुपये विक्रेत्यांना दिवसभरात मिळतात. तोरणे, जांभूळही दहा रुपये वाटीप्रमाणे विकले जात आहेत. फणसाचे दर शंभर रुपयापासून पुढे आहेत.
---
कृषी विद्यापीठात भरड धान्यांच्या प्रदर्शन

दाभोळ ः दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचा कृषिविद्या विभाग व दापोली तालुका भरारी बचतगट महासंघ यांच्यातर्फे भरड धान्यापासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांचे प्रशिक्षण नुकतेच विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते. या निमित्त अभिनय सावंत, पी. जे. देसाई, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, पर्यावरणप्रेमी प्रशांत परांजपे, अजिंक्य गुरू, तुकाराम खोत, सारिका मेहता, प्रमोद चिखलीकर, दर्शना वरवडेकर, वैदेही गुहागरकर, प्रदीप रजपूत यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. प्रमोद सावंत, निरंजन उपासनी, अभिनय सावंत, भरारी महासंघाच्या अध्यक्षा शैला अमृते, रेश्मा झगडे, सचिव अस्मिता परांजपे आदी उपस्थित होते.
--
नॅशनल हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

दाभोळ ः मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल दापोलीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. प्रशालेतील आठवीचा विद्यार्थी अब्दुल अनस अब्दुल कय्युम याने जिल्हा गुणवत्ता यादीत खुल्या गटातून तिसावे स्थान पटकावले आहे. तत्पूर्वी पूर्व प्रथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतही जिल्हा गुणवत्ता यादीत त्याने १३वे स्थान पटकावले होते. परिस्थिती प्रतिकूल असूनदेखील अनसमध्ये तिच्यावर मात करून शिकण्याची जिद्द दिसून येते. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतदेखील जिल्हा गुणवत्ता यादीत येईन, असा ठाम विश्वास त्याने या वेळी व्यक्त केला. उत्तम अभ्यासाचे नियोजन व प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव, शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन यामुळेच गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकलो, असे मत त्याने व्यक्त केले.
--

कबड्डी स्पर्धेत सीमामाता संघ विजेता

दाभोळ ः मुरूड येथील दुर्गादेवी कबड्डी संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सालदुरे येथील सीमामाता कबड्डी संघ विजेता तर श्रीराम कर्दे उपविजेता ठरला. या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते. यात सालदुरे सीमा माता कबड्डी संघाने श्रीराम कर्दे संघावर विजय मिळवला तसेच उत्कृष्ट चढाईपटू म्हणून ओजस खेडेकर, उत्कृष्ट खेळाडू विपुल सुर्वे, उत्कृष्ट पकड म्हणून जितेंद्र माने यांना गौरवण्यात आले. या वेळी सरपंच सानिका नागवेकर, उपसरपंच सुरेश तुपे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विराज खोत, ग्रामपंचायत सदस्य रंजन पुसाळकर, विवेक भावे आदी उपस्थित होते.
--
आसूद, ओणनवसेतून टॅंकरची मागणी

दाभोळ ः दापोली तालुक्यातील आसूद व ओणनवसे येथे पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले. दापोलीत सध्या चार गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे, बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट होत आहे. त्यामुळे गावोगावी आता पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरवात झाली आहे. यात पहिली पाण्याच्या टँकरची मागणी तामसतीर्थ गावाकडून करण्यात आली होती. तामसतीर्थ येथे पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे तर त्यानंतर गव्हे येथे तर ओणनवसे, आसूद येथे टँकरची मागणी करण्यात आली आहे. आसूद येथे पाणीपुरवठा करण्यास सुरवात होणार आहे तर ओणनवसे येथे स्थळ पाहणी करण्यात आल्यानंतर टँकर सुरू करण्यात येणार आहे.
--

अनारी ग्रामदेवतेच्या मंदिराचे शनिवारी उद्घाटन

चिपळूण ः अनारी येथील ग्रामदेवतेच्या मंदिराचे १३ मे रोजी उद्घाटन आणि जीर्णोद्धार होणार आहे. या सोहळ्याची ग्रामस्थांतर्फे जोरदार तयारी सुरू आहे. १० ते १३ मे या कालावधीत होणाऱ्या या सोहळ्याच्या निमित्ताने विविध स्वरूपाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, या निमित्ताने मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गावामध्ये स्वागताचे फलक, कमानी उभारण्यात आल्या आहेत. या निमित्ताने वास्तुशांती, धानशयन, होमहवन, कळशाचे मिरवणुकीने आगमन, काकडा आरती, देवीच्या मूर्तीची स्थापना, हरिपाठ, कीर्तन, गुरूवर्य हभप भारती महाराज शिगवण यांच्या हस्ते कलशारोहण, हळदीकुंकू आणि माहेरवाशिणी सत्कार, सत्यनारायणाची महापूजा, मुख्य उद्घाटन सोहळा, सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत. मर्यादित षटकांच्या अंडरआर्म नाईट क्रिकेटच्या स्पर्धेचे लीग पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. १३ मे रोजी देवरूख (पाटगाव) येथील सह्याद्री नमन नाट्य मंडळ यांच्या नमनाचा कार्यक्रम आणि याच कालावधीत स्थानिक आणि मुंबई-पुणे स्थित कलाकारांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरणदेखील याच कालावधीत होणार आहे. ग्रामदेवता मंदिर उद्घाटन आणि जीर्णोद्धाराच्या या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू, माजी आमदार सदानंद चव्हाण, रमेश कदम आदी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com