आठवडा बाजाराची जागा अखेर ठरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठवडा बाजाराची जागा अखेर ठरली
आठवडा बाजाराची जागा अखेर ठरली

आठवडा बाजाराची जागा अखेर ठरली

sakal_logo
By

01527
01526
सावंतवाडी ः येथील आठवडा बाजारासाठी न्यायालयाच्या मोकळ्या जागेची सफाई करताना पालिकेचे कर्मचारी. दुसऱ्या छायाचित्रात व्यापाऱ्यांना बसण्यासाठी मार्किंग केलेली जागा.


आठवडा बाजाराची जागा ठरली

सावंतवाडीतील वाद; आजपासून ‘जुन्या न्यायालय’ आवारात भरणार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः गेली कित्येक महिने शहरातील मंगळवारच्या आठवडा बाजारावरून वातावरण तापलेले असताना आता मोती तलावाकाठी भरवला जाणारा आठवडा बाजार जुन्या शासकीय गोदामाच्या ठिकाणी तसेच जुन्या न्यायालयाच्या आवारात भरवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात सर्व कार्यवाही पूर्ण झाली असून आज त्या भागाची संपूर्ण साफसफाई पालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.
येथील मोती तलावाकाठी भरवण्यात येणारा मंगळवारचा आठवडा बाजार वादात सापडला होता. येथील आमदार तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हरकत घेतल्यामुळे चांगलेच राजकीय वातावरण तापले. आठवडा बाजार आहे तिथेच ठेवावा, अशी भूमिका घेत माजी नगराध्यक्ष संजू परब व हॉकर्स असोसिएशनने जोरदार मागणी लावून धरली होती. मात्र, मंत्री केसरकर यांनी तलावाच्या ठिकाणी भरवला जाणारा बाजार हलवावा. संस्थानकालीन मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे, असे सांगत मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना पर्यायी जागा शोधण्याच्या सूचना केल्या होत्या. जागेमुळे गेली अनेक महिने वादातीत राहिलेल्या सावंतवाडीच्या आठवडा बाजाराला अखेर जागा मिळाली. मुख्याधिकारी जावडेकर यांनी शासकीय विश्रामगृहच्या बाजूलाच असलेल्या जुन्या शासकीय धान्य गोदाम शेजारी तसेच मोडकळीस आलेल्या जुन्या न्यायालय इमारतीच्या मोकळ्या जागेत उद्यापासून (ता.९) आठवडा बाजार भरणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून त्या ठिकाणी युध्द पातळीवर साफसफाईचे काम हाती घेण्यात आले. उद्या भरणारा आठवडा बाजार त्या जागेत भरावा, अशा सूचना मुख्याधिकारी जावडेकर यांनी दिल्या आहेत, असे पालिका प्रशासनाकडुन सांगण्यात आले.
मंत्री केसरकर यांच्या सूचनेनुसार हा बाजार वसंत प्लाझा शांती निकेतन शाळेच्या पाठीमागे बसविण्याच्या सुचना दिल्या होता. मात्र, त्या जागेला हॉकर्स संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी विरोध केला होता. तसेच तलावा काठी बाजार बसविण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र, त्यानंतर जिमखाना मैदानाच्या जागेचा पर्याय सुचविण्यात आला होता. तो सुध्दा पावसात होणारा त्रास लक्षात घेवून नाकारण्यात आला होता. त्यानंतर आता पालिकेच्या पुढाकाराने ही जागा सुचविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात पुढे हा बाजार येथील जुन्या न्यायालयाच्या परिसरासह गोदामाच्या ठिकाणी भरविण्यात येणार आहे. त्यासाठी जागेची साफसफाई पूर्ण करण्यात आली.
---------
चौकट
जागा परवानगीबाबत बोलणी ः प्रशासन
संबंधित जागा न्यायालयाची असल्याने त्यांची परवानगी घेण्यात आली का? असा सवाल पालिका अधिकार्‍यांना केला असता ती जागा सद्यस्थितीत वापरात नाही. त्यामुळे परवानगीबाबत बोलणी सुरू आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याबाबत मुख्याधिकारी जावडेकर यांची बाजू घेण्यासाठी त्यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.