पहाटे अवकाळी पावसाचा तडाखा

पहाटे अवकाळी पावसाचा तडाखा

पान १ साठी


०१५१०

चिपळूणला पावसाचा तडाखा
वादळाचा परिणाम; वीट व्यावसायिकांसह बागायतदारांची तारांबळ
चिपळूण, ता. ८ ः तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात सोमवारी (ता. ८) अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकटासह अचानक आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदार, वीटभट्टी व्यावसायिक आणि अन्य शेतकऱ्‍यांची तारांबळ उडाली होती. चिपळूण वगळता अन्य तालुक्यांत दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी गार वारेही वाहत होते.
बंगालच्या उपसागरात मोचा वादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामानात बदल झाले असून, मध्य महाराष्ट्र, कोकण भागात पावसाचा इशारा दिला आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. मार्चनंतर, एप्रिल आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी पाऊस पडला. गेले काही दिवस उष्म्याने नागरिक त्रस्त झाले होते. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून, सोमवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास वादळी पाऊस सुरू झाला. चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर होता. या पावसामुळे कोठेही नुकसान झालेले नाही. काही ठिकाणी गारा पडल्या. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. चिपळूण तालुक्यातील अलोरे, शिरगाव, पोफळी, पेढांबे, कोंडफसवणे, कुंभार्ली, कोळकेवाडी आदी भागांत जोरदार पाऊस झाला. अर्ध्या तासाहून अधिक काळ पाऊस पडत होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. खडपोली, अनारी, वेहळे, अडरे या भागांत वीट व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहेत. विटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली होती. वादळी पावसानंतर शेतकऱ्‍यांसह वीटभट्टी व्यावसायिकांची धावपळ उडाली. विटा खराब होऊ नयेत म्हणून त्यावर प्लास्टिक कापड व अन्य बचावाचे साहित्य ठेवले जात होते. वादळी पावसामुळे शेतकऱ्‍यांसह वीट व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत.
वादळी पावसाचा परिणाम अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा आणि काजूवर होणार आहे. काही बागांमध्ये आंबे पडून वाया गेले आहेत. सरकारकडून याची दखल घेतली जात नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. सातत्याने वादळी पाऊस पडत असल्यामुळे उरलासुरला आंबा धोक्यात आला आहे. गेले काही दिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. उष्म्याने त्रस्त नागरिकांना अवकाळीमुळे दिलासा मिळाला आहे.


पावसात भिजत बैलगाडी स्पर्धेचा आनंद
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पेढांबे येथे राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेवरही पावसाचा परिणाम झाला. स्पर्धा अंतिम टप्प्यात असतानाच अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे बैलगाडी स्पर्धेसाठी आलेल्या रसिकांच्या उत्साहावर विरजण पडले. स्पर्धेचा अंतिम थरार पावसातच पाहावा लागला. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातील लोकांची गर्दी झाली होती. बैलगाडी स्पर्धेसाठी आलेल्या क्रीडा रसिकांनी पावसात भिजतच या स्पर्धेचा आनंद घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com