
प्रकल्पग्रस्तांचे उपोषण
५० ( पान ५)
rat८p४१.jpg ः
२३M०१५३७
राजापूर ः उपोषणाला बसलेले ग्रामस्थ.
कारवाईविरोधी गोवळमध्ये उपोषण
श्री नवलादेवी मंदिराचा आसरा ; नाहक गुन्हे दाखल केल्याचा दावा
राजापूर, ता. ८ ः प्रस्तावित बारसू प्रकल्पाच्या सुरू असलेल्या माती परीक्षणावरून वातावरण तापलेले असून अनेक आंदोलकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईवरून प्रकल्पविरोधी आंदोलक ग्रामस्थांनी आज गोवळ येथील श्री नवलादेवी मंदिराच्या परिसरामध्ये उपोषण छेडले. या वेळी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. हे आंदोलन सायंकाळी थांबवण्यात आले.
तालुक्यातील बारसू-धोपेश्वर परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून माती परीक्षणाचे काम सुरू आहे. या कामाला प्रकल्पविरोधी ग्रामस्थांकडून विरोध केला जात असून, त्यावरून आंदोलक ग्रामस्थ आणि पोलिस यांच्यामध्ये संघर्षही झाला. त्यावरून वातावरण तापलेले असताना गत आठवड्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू परिसर दौरा करून प्रकल्पविरोधी ग्रामस्थांची भेट घेतली होती. या भेटीच्यावेळी त्यांनी प्रकल्पविरोधी ग्रामस्थांशी संवाद साधताना लोकांना प्रकल्प नको असेल तर आमचा त्याला विरोध असून आम्ही आपल्यासोबत असल्याचे आश्वासित केले होते. वेळप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरवण्याचेही त्यांनी या वेळी सूचित केले होते. याच दिवशी माजी खासदार नीलेश राणे, कणकवलीचे आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली आदींच्या नेतृत्वाखाली प्रकल्प समर्थकांनीही प्रकल्प समर्थनार्थ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेगाने घडलेल्या घडामोडींनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. अशा स्थितीमध्ये प्रकल्पविरोधी आंदोलकांनी आज गोवळ येथे उपोषण छेडले.
माती परीक्षणाच्या कामाला विरोध केला म्हणून ज्या आंदोलकांवर नाहक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी आंदोलक ग्रामस्थांनी आज उपोषण छेडले. यासाठी नवलादेवी मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येने प्रकल्पविरोधी ग्रामस्थ उपोषणाला बसले होते.