
ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने आडाळीत रोलर ऑपरेटरचा मृत्यू
ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने
आडाळीत रोलर ऑपरेटरचा मृत्यू
दोडामार्ग, ता. ८ : आडाळी एमआयडीसीच्या रस्त्यावर झोपलेल्या रोलर ऑपरेटरच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक जाऊन मृत्यू झाला. माणिक रोहिदास चव्हाण (वय २४ रा. आंबेतांडा, तालुका कन्नड, जि. संभाजीनगर), असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता.७) रात्री घडली असली तरी चालू ट्रॅक्टरला लाईट असतानाही रस्त्यावर झोपलेला तो युवक चालकाच्या नजरेस कसा पडला नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
मिळालेली माहिती अशी की ः मृत माणिक चव्हाण हा आडाळी एमआयडीसीत एका ठेकेदाराकडे रोलर ऑपरेटर म्हणून काम करीत होता. काल रात्री साडेआठच्या सुमारास एमआयडीसीतील एका रस्त्यावर तो झोपला होता. शेखर बोराडे हे ट्रॅक्टर घेऊन एमआयडीसीतून जात होते; मात्र, रस्त्यावर झोपलेल्या माणिकचा त्यांना अंदाज आला नाही. दुर्दैवाने ट्रॅक्टरचे चाक त्याच्या अंगावरून गेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर जखमी अवस्थेत असलेल्या त्या युवकाला मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे पाठविले; मात्र, सावंतवाडी येथे रुग्णालयात नेत असताना त्याचे वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना देताच घटनास्थळी जात पोलिसांनी पंचनामा केला. बेपर्वाईने ट्रॅक्टर चालवून माणिकच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक शेखर बोराडेवर गुन्हा दाखल झाला.