
''नळपाणी''साठी उंबर्डेवासीयांचे उपोषण
01569
उंबर्डे ः उपोषणकर्त्यांशी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली.
‘नळपाणी’साठी उंबर्डेवासीयांचे उपोषण
वैभववाडीत आंदोलन; लेखी आश्वासनाअंती माघार
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ८ ः उंबर्डे नळपाणी पुरवठा योजना आणि इतर कामांचा कार्यारंभ आदेश मिळूनही ठेकेदाराने काम न सुरू केल्यामुळे आज सकाळपासून उंबर्डेवासीयांनी येथील पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी उशिरा उपोषण स्थगित करण्यात आले.
उंबर्डे गावात नायदेवाडी येथे पाण्याची टाकी बांधणे आणि मेहबुबनगर बोबडेवाडी येथे विहीर व नळपाणी पुरवठा योजना सुरू करणे ही कामे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर होती. या कामांना शुभारंभ केल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. तरीही ठेकेदाराने कामांना सुरुवात न केल्यामुळे सध्या गावात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज सकाळपासून येथील पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. सरपंच वैभवी दळवी, माजी सरपंच एस. एम. बोबडे, उपसरपंच आजीम बोबडे, मिताली जाधव, सतीश तुळसणकर, सुरेश जाधव, मंगेश कदम, मोहन जाधव, किशोर दळवी यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपोषणाला बसले. दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता अजय गुरसाळे हे उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आले. यावेळी ग्रामस्थांनी पाण्याची कामे सुरू न केल्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून याला जबाबदार कोण?, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी गुरसाळे यांनी तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. काम वेळेत पूर्ण केले न झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. आठ दिवसांत प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी उपस्थित होते.