
योजनेस पात्र शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्या
१७०३
योजनेस पात्र शेतकऱ्यांना
तातडीने कर्जमाफी द्या
संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेमधील पात्र व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील दोन लाखांवरील पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील आंबा, भात, काजू व इतर सर्व उत्पादक शेतकरी संघटनेने केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निवेदनही दिले.
निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या कर्जमाफी योजनेतील ३६७७ शेतकरी लाभास पात्र असताना त्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. महात्मा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ या कर्जमुक्ती योजनेसाठी दोन लाखांवरील ७९० शेतकरी पात्र आहेत; मात्र त्यांनाही लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना विनाविलंब कर्जमुक्तीचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर विशारबा बांदिवडेकर, उदय गावडे, विष्णू गावडे, विश्राम गावडे, हरिश्चंद्र गावडे, रामकृष्ण चिपकर, सुनील परब, शीला गावडे, शामसुंदर राय, प्रकाश वारंग, जगन्नाथ गावकर, आग्नेल फर्नांडिस, अर्जुन नाईक आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.