
चिपळूण ः रूद्र चव्हाणच्या कुटुंबीयांचे उपोषण स्थगित
३२ घरांच्या सोडतीत रुद्र चव्हाणचा प्राधान्याने विचार
तहसीलदारांचे आश्वासन ; कुटुंबीयांचे उपोषण स्थगित
चिपळूण, ता. ९ ः तिवरे धरणफुटीत आई-वडील गमावलेल्या रूद्र चव्हाण या सात वर्षीय मुलाने आपल्याला हक्काचे घर मिळण्यासाठी सोमवारपासून उपोषण सुरू केले होते. दुर्घटनाग्रस्त ५६ कुटुंबीयापैकी २४ कुटुबांना घरे दिली आहेत. उर्वरित ३२ घरांच्या सोडतीवेळी रूद्रचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.
तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत भेंदवाडीतील २२ जणांचा हकनाक बळी गेला होता. या घटनेत आपले आई-वडील आणि बहीण गमावलेला रूद्र चव्हाण याला अद्याप घर मिळालेले नाही. त्याच्या हक्काचे घर मिळण्यासाठी सात वर्षीय रूद्रसह त्यांच्या नातेवाइकांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले. या वेळी रूद्रसोबत त्याची आत्या मनाली संतोष माने, वैष्णवी विनोद सकपाळ, सुधाकर हरिभाऊ चव्हाण, मधुकर रामभाऊ साळुंखे (आजोबा), मिनल अमित साळसकर (मावशी) असे कुटुंबीय उपोषणाला बसले होते; मात्र सायंकाळी ५ वाजता तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी त्यांची भेट घेऊन लेखी स्वरूपात आश्वासन दिले.
अलोरे येथील शासकीय जागेत २४ कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. हे पुनर्वसन दोन टप्प्यात होणार असून पुढील टप्प्यात रूद्रच्या घराचा विचार प्राधान्याने केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मनाली माने यांनी प्रांताधिकाऱ्यांना पत्र देत जोवर रूद्रच्या घराचा ताबा मिळत नाही, तोपर्यंत अजित चव्हाण यांना बेकायदेशीररित्या दिलेल्या घराच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.