
पान पाच मेन-स्वतःच्या विकासासाठी केसरकरांचे दौरे
01733
सावंतवाडी ः येथील पत्रकार परिषदेत बोलताना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ. बाजूला शब्बीर मणियार, अशोक परब, प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)
स्वतःच्या विकासासाठी
मंत्री केसरकरांचे दौरे
रुपेश राऊळ यांची टीका; निदान एड, बीएड प्रश्न तरी सोडवावेत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः येथील मतदारसंघाच्या विकासासाठी नाही तर मंत्री केसरकर स्वतःच्या घराचा विकास करण्यासाठी मतदारसंघात फिरत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी (कै.) भाईसाहेब सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्याप्रमाणे ठोस असा विकास करुन दाखवावा, असे आव्हान ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केले.
वेळोवेळी विकासाचे गाजर दाखविणाऱ्या केसरकर यांनी स्वतःच्या खात्याचा साधा डिएड, बीएडचा तरी प्रश्न सोडवून दाखवावा, असा असा चिमटाही श्री. राऊळ यांनी काढला.
श्री. राऊळ यांनी आज येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, अशोक परब, प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, आबा सावंत आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, "मंत्री केसरकर आणि भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली आज विकास कामांवरून भांडत आहेत. मात्र, ज्या विकासकामांवरून ते आरोप-प्रत्यारोप करत आहेत, ती विकास कामे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेली आहेत. आज दोघेही सत्तेत असताना एकमेकांची हिंमत काढत आहेत. मात्र, या भांडणात त्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. आज केसरकर यांची परिस्थिती किती केविलवाणी झाली आहे, हे त्यांच्या पत्रकार परिषदेतून दिसून येते. आज दोघेही सत्तेत असताना आमदारकीसाठी लाचार झालेले आहात. हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनता योग्य निर्णय घेईल. तेली यांनीही आजपर्यंत अनेक आश्वासने येथील जनतेला दिली. कबुलातदार गावकर तसेच रोजगार संदर्भात त्यांनी वेळोवेळी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे जी विकासकामे केसरकर करू शकले नाहीत, ती तेली यांनी तरी करून दाखवावी. आणि केसरकर यांनी रडगाणे सोडून जनतेच्या विकासाकडे पहावे."
श्री. राऊळ पुढे म्हणाले, "आज केसरकर मतदार संघामध्ये फिरत आहेत. अलीकडेच त्यांनी हवाई पाहणी केली. मात्र, ते जनतेच्या विकासासाठी नाही तर स्वतःच्या घराचा विकास करण्यासाठी फिरत आहेत, अशी जनताच बोलत आहे. विकासाची भाषा करणाऱ्या केसरकारांनी आता विकासाच्या मोठमोठ्या बाता करण्यापेक्षा स्वतःच्या खात्याचा साधा डिएड, बीएडचा प्रश्न तरी सोडवावा. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी (कै.) भाईसाहेब सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी या ठिकाणी केलेल्या ठोस विकासासारखा विकास करावा."
-----------
चौकट
हा केसरकरांचा छुपा दहशतवाद
घराच्या आठवडा बाजाराची जागा दुसरीकडे हलवली गेली हा केसरकरांचा छुपा दहशतवादच आहे. मात्र, जागा बदलली तरी चालेल. परंतु, त्या जागेवर १०० वर्ष बाजार चालेल, अशी ती जागा असणे गरजेचे आहे. आज ज्या ठिकाणी बाजार नेला, त्या ठिकाणी वर्षानुवर्षं बाजार टिकेल याची खात्री केसरकर देणार का? असेही राऊळ म्हणाले.