काम करण्यास कर्मचारी निरुत्‍साही

काम करण्यास कर्मचारी निरुत्‍साही

काम करण्यास कर्मचारी निरुत्‍साही
अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. ग्रामीण भागात काम करण्यासाठी कोणीही सहजासहजी इच्छुक नसल्‍याने बहुतांश कर्मचारी पनवेल, उरण, अलिबागसारख्या ठिकाणी बदलीची मागणी करीत आहेत. यामुळे बदली प्रक्रियामधील होणाऱ्या शिफारसी, गैरप्रकार आणि होणारे वाद टाळण्यासाठी समुपदेशन प्रक्रियेनुसार बदल्या होत आहेत. सोमवार बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांना बोलावून समुपदेशन करण्यात आले. जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात येत असून १२५ हून अधिक कर्मचारी इच्छुक आहेत. दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या, तर चार वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात येणार आहे.
---
ऑनलाईन खरेदीत गंडा
पनवेल : ऑनलाईन खुर्च्या व टेबल मागवणाच्या प्रयत्नात असलेल्या कामोठेतील एका महिलेला सायबर चोरांनी तब्बल १ लाख १६ हजारांना गंडा घातला. कामोठे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ग्रेसी लुंकोस (६१) यांनी आठवडाभरापूर्वी अॅमेझॉनवरून १० खुर्च्या व ५ टेबल खरेदी केल्या होत्या. ३ मे रोजी त्यांना खुर्च्या मिळणार होत्या. मात्र, पार्सल न आल्‍याने तयांनी दुसऱ्या दिवशी गुगलवरून अॅमेझॉन शॉपिंग हेल्पलाईनचा नंबर शोधून संपर्क केला. हा क्रमांक सायबर गुन्हेगारांचा असल्याने त्यांनी ग्रेसी यांना रस्ट डेक्स व पेटीएम हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे ग्रेसी यांनी अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून १ लाख १६ हजार रुपये काढून घेतले होते. हा प्रकार दुसऱ्या दिवशी ग्रेसी यांच्या लक्षात आल्‍यावर त्‍यांनी फसवणूक प्रकरणी तक्रार दाखल केली.
--
लवकरच नव्या ईव्हीएम मशीन
अलिबाग ः २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्‍याअनुषंगाने राजकीय पक्षांबरोबरच प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे. निवडणुकीसाठी ईव्हीएम, व्हीव्ही पॅट, बॅलेट व कंट्रोल युनिट मशीन बंगळूरहून मागवल्‍या आहेत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन पंधरा दिवसात तर बॅलेट कंट्रोल मशीन जुलैमध्ये येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
रायगड लोकसभा मतदार संघामध्ये रायगड जिल्ह्यातील चार व रत्नागिरीमधील दोन अशा सहा विधानसभा मतदार संघ आहेत. निवडणुकीसाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हीव्हीपॅट मशीन आणण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. बंगळूरमधून एकूण चार हजार ९० ईव्हीएम व व्हीव्ही पॅट मशीन मागवल्‍या आहेत. बॅलेट सहा हजार ७०० व कंट्रोल युनिटच्या तीन हजार ७५० मशीन जुलैपर्यंत जिल्ह्यात येतील.
-----
महावितरणने फांद्या छाटल्‍या
रेवदंडा : महावितरण कंपनीने मंगळवारी रेवदंडामधील काही भागात वीज पुरवठा खंडित केला आणि वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम केले. पावसाळ्यात झाडांच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्‍याला आळा घालण्यासाठी आणि वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्‍या तसेच विजेचे खांब, वाहिन्यांची दुरुस्‍तीची कामे हाती घेण्यात आल्‍याची माहिती कनिष्ठ अभियंता जयेंद्र सकपाळ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com