
पाऊस
वादळी पावसामुळे
वऱ्हाडींची तारांबळ
गुहागर तालुक्यात वीज पडून दोन घराचे नुकसान
गुहागर, ता. ९ : वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह गुहागर तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. वेळणेश्र्वर येथे दोन घरांना विजेचा तडाखा बसला. मुळातच कमी असलेला आणि उशिरा हाताशी आलेले आंबा पीकाचेही मोठे नुकसान झाले आहे. मच्छीमारी व्यवसायालाही फटका बसला आहे. पावसाने जनजीवनही विस्कळीत झाले.
गुहागर तालुक्यात सोमवारी (ता. ८) सायंकाळपासून मंगळवारी (ता. ९) पर्यंत वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. रात्रीच्या वेळी वेगवान वारे, विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसाने काही भागातील जनतेची झोपही हिरावून नेली. ९ मे रोजी अनेक ठिकाणी लग्नाचे मुहूर्त होते. पावसाळामुळे लग्नघरातील मंडळीची धावपळ उडाली. ठिकठिणाचे मंडप भिजले. घराबाहेर लग्नाच्या तयारीसाठी ठेवलेल्या वस्तू आयत्यावेळी धावपळ करून उचलाव्या लागल्या. मंडपात झोपलेल्या मंडळींची आयत्यावेळी अन्यत्र व्यवस्था करावी लागली. पाऊस भरपूर पडल्याने ९ मे रोजी सकाळी ओल्या जमिनींवर प्लास्टिक अंथरावे लागले.
मंगळवारी (ता. ९) रात्री वेळणेश्र्वर येथील हायस्कूलसमोरील दिलीप पालशेतकर यांच्या घराजवळ वीज कोसळली. एका ठिकाणाहून दुसरीकडे विजेचा लोळ गेला. वेळणेश्र्वर बाजारपेठेतील किशोर पावस्कर यांच्या घरावर वीज कोसळली. दोन्ही घटनांमध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही घरातील विजेची उपकरणे खाक झाली. दिलीप पालशेतकर यांनी याच वर्षी आपल्या घराशेजारी बोअरवेल खणून त्यामध्ये पंप बसवला होता. विजेमुळे हा पंप देखील नादुरुस्त झाला आहे. या दोन्ही घटनांमध्ये किती नुकसान झाले हे कळू शकलेले नाही.
यावर्षी गुहागर तालुक्यात मुळात आंब्याचे पीक कमी आले आहे. अनेक ठिकाणी मे महिन्यात आंबा काढणी सुरू झाली. त्यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने आंबा गळून पडला. पावसामुळे आंब्याचा भावही घसरला. त्यामुळे आंबा बागायदारांचेही मोठे नुकसान झाले आहे.