
‘कोकण समर फेस्टिवल’ कुडाळमध्ये उद्यापासून
‘कोकण समर फेस्टिवल’
कुडाळमध्ये उद्यापासून
मनोरंजनासह खाद्यपदार्थांची पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः छोट्या व्यावसायिकांना आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कोकण समर फेस्टिवल’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील नगरपंचायत पटांगणावर १२ ते १४ मे या कालावधीत सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव होत आहे. लघु उद्योग, गृहउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना व युवा कलाकारांना यामध्ये प्राधान्य दिले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती संयोजक मोनाली वर्दम, गौरी धडाम, हर्षदा पडते, अपर्णा शिरसाट यांनी दिली.
प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. जिल्ह्यातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, दागिने, कपडे, कोकणी मेवा, घरगुती पदार्थ अशा विविध प्रकारच्या वस्तू, सेवा यांचे स्टॉल येथे असतील. युवा कलाकारांना संधी व प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवामध्ये होणार आहे. पहिल्या दिवशी इंस्टास्टर कोकणहार्टेड गर्ल अंकिता प्रभुवालावलकर यांची उपस्थिती खास आकर्षण असेल. खास गोव्यातील प्रसिद्ध सिंगिंग शो आयोजित केला आहे. दुसऱ्या दिवशी कुडाळ येथील प्रसिध्द ठाकरवाडीचा पारंपरिक कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम, बालगोपालांचे दशावतार नाटक सादर करण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी मोरया कला ग्रुप प्रस्तुत ‘जल्लोष कलागुणांचा’, हा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे. या महोत्सवात लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना एकाच ठिकाणी मनोरंजन, खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. सर्वांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन ‘कोकणची चेडवा’ यांनी केले आहे.