कोकणातील गणेशोत्सवातील प्रथा परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणातील गणेशोत्सवातील प्रथा परंपरा
कोकणातील गणेशोत्सवातील प्रथा परंपरा

कोकणातील गणेशोत्सवातील प्रथा परंपरा

sakal_logo
By

१२ (टुडे पान ४ साठी, सदर)

(४ मे टुडे चार फोटोही घ्यावा)


जनरिती- भाती लोगो


-rat१०p८.jpg ः

डॉ. विकास शंकर पाटील
----

कोकणातील गणेशोत्सवातील प्रथा परंपरा

कोकणात गणपती मंदिरांची संख्या जशी मोठी आहे तशीच येथील गणपती भक्तांची संख्या खूपच मोठी आहे. फक्त मुंबईतीलच नाही तर साता समुद्रापार असणारा चाकरमानी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येतो. गणेशोत्सवाच्या काळात येथील वातावरण चैतन्यदायी होऊन जाते. आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकजण मुक्त हस्ते गणेशावर खर्च करत राहतो. कोकणातील प्रत्येक गावातील प्रत्येक वाडीतील गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण आणि भक्तीभावनेने नटलेला दिसतो. या कालखंडात भजन, कीर्तन आणि लोककलांना ऊत येतो. गणेशोत्सव हा येथील मोठा सण असला तरी येथील काही गावातील असणाऱ्या गणेशोत्सवातील प्रथा-परंपरा मात्र आजही जीवापाड जपल्या जातात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या प्रथा परंपरांचे वहन होताना दिसते. विज्ञान-तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या रेट्यातही येथील गणेशोत्सवातील पारंपरिकता आजही टिकून आहे. अशीच ३१३ वर्षाची परंपरा लाभलेला तालुक्यामधील तारामुंबरीचा महागणपती २१ दिवस राहतो आणि २१ रूपे दाखवतो.
या गणपती संदर्भात अशी आख्यायिका ऐकायला मिळते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील गुराब जातीच्या जहाजांचा प्रमुख शिव तांडेल याचा वंश वाढत नव्हता. मालवण येथील मालडी गावातील नारायण मंदिरात तो दररोज पूजा करत असे. अनेक वर्षे त्यांना संतान नव्हते. या चिंतेत तो सदैव असे. एक दिवस त्याला स्वप्न पडले. स्वप्नात नारायण मंदिरातील गणराया त्याच्याशी बोलू लागले. त्यांनी दृष्टांत दिला की, ‘ माझा मोठा उत्सव कर. तुला पुत्ररत्न होईल.’ त्यांनी स्वप्नाप्रमाणे आपल्या लौकिकाला साजेल असा उत्सव १७०१ मध्ये सुरू केला. त्यांना पुत्ररत्न झाले. त्यांनी त्याचे नाव गणोजी असे ठेवले. पुढे १७५६ ला गणोजी विजयदुर्ग किल्ल्यावर इंग्रजांशी लढताना पकडला गेला. त्याला शिक्षा झाली. त्याच गणोजीची नवी दहावी पिढी हा उत्सव आजही जल्लोषात करते. या उत्सवातील गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी ठरलेल्या शेतातली दीड टन माती आणली जाते. याच घराण्यातील पुरूष ही मूर्ती बनवतो. गणेश चतुर्थी दिवशी फक्त अंगाला सफेद चुना लावून ही गणेशाची मूर्ती पूजेला बसवली जाते. दुसऱ्या दिवशी उंदीर बनवून लावला जातो. तिसऱ्या दिवशी या गणपतीचे रंगकाम सुरू होते. पाचव्या दिवशी ही मूर्ती रंगवून पूर्ण होते. सातव्या, अकराव्या, पंधराव्या, सतराव्या व विसाव्या अशा प्रत्येक दिवशी हे रंगकाम सुरू असते. शेवटच्या विसर्जनाच्या दिवशी लाल रंगावर पिवळे ठिपके देऊन गणेशाच्या उग्रतेत आणखीच भर घातली जाते. या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारे पूजाही होते. विसर्जनाचा सोहळा लक्षवेधी असतो. या वेळी खवळे कुटुंबातील कैलासवासी झालेल्या सर्वांना पिंडदान केले जाते आणि पंचक्रोशीला महाप्रसाद जेवू घातला जातो. प्रत्येक वर्षी हा दिनक्रम सुरू राहतो. वंशवृद्धीसाठी या गणरायाला नवस बोलला जातो. अशा या कोकणच्या वेगळ्या गणेशोत्सवाची नोंद लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदली गेल्याचे सांगितले जाते. असाच नवसाला पावणारा गणपती म्हणून नाडणचा सार्वजनिक गणपती ओळखला जातो.
या गणपतीवर येथील नागरिकांची अपार श्रद्धा असून, मूर्तीसाठी माती पाटावर ठेवल्यानंतर अगरबत्ती, धुपारतीने पूजा होणारा हा तालुक्यातील एकमेव गणपती आहे. गेल्या तीन पिढ्या मोठ्या श्रद्धेने गणपती चित्रशाळेत असेपर्यंत आनंदाने सहभागी झालेले असतात. चित्रशाळेतून गणपती नाडणच्या पुजारी मंडळींच्या घरी चतुर्थीला घेऊन जाण्यासाठी येतात तेव्हा चित्रशाळेतील मूर्तिकार गहिवरून जातात. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळते. नवसाला पावणारा पुजारी मंडळींचा सार्वजनिक गणपतीच या शाळेतील सर्वात मोठा म्हणजे साडेपाच ते सहा फूट उंचीचा गणपती असतो. या मूर्तीपेक्षा मोठा गणपती बनवला जात नाही. मातीकामापासून मदत करण्यास भाविक या ठिकाणी येतात व गणपतीचे मातीकाम, रंगकाम करायला हातभार लावून आपला नवस फेडतात, असे पाहायला मिळते.
मालवण तालुक्यातील कोईलचा गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. ''एक गाव एक गणपती'' ही प्राचीन काळापासून सुरू असलेली संकल्पना ग्रामवाशियांनी आजही जपली आहे. विशेष म्हणजे मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्ती इथे कोणाच्याही घरात आढळत नाहीत. कुठच्याही भागातील मातीच्या मूर्तीला हात लावून ही मंडळी नमस्कार करत नाहीत. देवळातील पाषाणी गणेशालाच ही ग्रामस्थ मंडळी वंदन करतात. या गणेशाचे रूप मनात साठवून ठेवतात. त्या रूपाचीच मनोभावे पूजा करतात. कोणाच्याही घरात गणपतीचे चित्र व मूर्ती आढळत नाही. तशी ती बाळगणे निषद मानले जाते. काही मंडळींनी देवळातील गणेशाचा फोटो काढून तो घरी ठेवल्यावर त्यांच्यावर संकटे आली. ही संकटे का आली याचा शोध घेताना ''गणेशाचे चित्र घरी ठेवणे व त्याची पूजा करणे हे येथील परंपरेला धरून नसल्यामुळेच घडले आहे.'' असे येथील जाणकारांनी सांगितल्यावर त्यांनी ते चित्र गणपतीच्या चरणावर अर्पण केले. त्यानंतर त्यांच्यावरील संकटे दूर झालीत. अशा काही कथाही येथे ऐकायला मिळतात. गणेशोत्सवात घराघरात उत्साहाला कमतरता नसते; पण गणेशमूर्ती मात्र हृदयात जपली जाते, असा हा अनोखा गणेशोत्सव इतरत्र कोठेही दिसून येत नाही. कोकणात हे असे अनोखे रूढी-परंपरेने जाणारे गणेशोत्सव इतर भागातील गणेशभक्तांनाही उत्साहवर्धक आणि भक्तिभावनेने भारलेले वाटतात.

(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)

-----------------