
साहित्य
निर्मितीसह वितरण व्यवस्था उत्तम हवी
प्रा. आनंद देवडेकर ; चिपळुणात चर्चासत्र
चिपळूण, ता. १० ः साहित्य व्यवहारांमध्ये नियतकालिके, अनियतकालिके, पुस्तके, मासिके यांची निर्मिती करणे सोपे असते; मात्र त्यांना वाचकांच्या मनात स्थान निर्माण करणे आणि अविरतपणे ती चालवणे फार कठीण असते. त्याकरिता दर्जेदार साहित्य निर्मिती आणि वितरण व्यवस्थेसह व्यवहार उत्तमपणे सांभाळता आला पाहिजे, असे प्रतिपादन मासिक सद्धम्म पत्रिकेचे संपादक प्रा. आनंद देवडेकर यांनी येथे केले.
सम्यक संवादतर्फे ६ व ७ मे रोजी पहिल्या सम्यक साहित्य कला संगीताचे चिपळूण येथील चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते ‘नियतकालिके व पुस्तके निर्मितीची प्रक्रिया, छपाई वितरण व आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. त्यांच्यासमवेत प्रकाशन संस्थेचे प्रमुख रमाकांत जाधव, सृजन प्रकाशन संस्थेचे प्रमुख विजय जाधव, अस्तित्व नियतकालिकाचे संपादक प्रदीप नाईक उपस्थित होते.
प्रा. देवडेकर म्हणाले, मासिक सद्धम्म पत्रिकेने २० वर्षे अविरतपणे आंबेडकरी चळवळीत बौद्ध साहित्य व वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार अत्यंत दर्जेदारपणे केला. या पत्रिकेची निर्मिती, त्यातील साहित्य व मांडणी अतिशय उत्तमप्रकारे होती तशाप्रकारे जर रचना सांभाळली तर आपणास यश मिळू शकते; मात्र या सर्व प्रक्रियेत आर्थिक व्यवहार व त्याचे गणित जमणे आवश्यक आहे. सृजन प्रकाशनचे प्रमुख विजय जाधव यांनी आपल्या मनोगतात पुस्तके निर्मितीची प्रक्रिया उलगडून सांगितले.