27 टक्के रिक्त पदे, तरीही पुन्हा आंतरजिल्हा बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

27 टक्के रिक्त पदे, तरीही पुन्हा आंतरजिल्हा बदल्या
27 टक्के रिक्त पदे, तरीही पुन्हा आंतरजिल्हा बदल्या

27 टक्के रिक्त पदे, तरीही पुन्हा आंतरजिल्हा बदल्या

sakal_logo
By

rat१०p७.jpg-
०१८२१
जिल्हा परिषद इमारत
-----------
पदे रिक्त, तरीही आंतरजिल्हा बदल्या
शासनाचे जिल्हा परिषदेला पत्र; प्रशासनाला करावी लागणार कसरत, दोन हजारावर पदे रिक्त
रत्नागिरी, ता. १०ः जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या मागील वर्षातील आंतरजिल्हा बदल्यांमुळे २७ टक्के पदे रिक्त झाली असतानाच पुढील वर्षांसाठीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षकभरतीचा पत्ता नसताना नव्याने या आदेशामुळे प्रशासनापुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळांमध्ये सुमारे ६ हजाराहून अधिक शिक्षक आहेत. त्यामधील ११०० पदे रिक्त होती. नुकत्याच झालेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेनंतर ७२५ शिक्षकांना परजिल्ह्यात कार्यमुक्त करण्यात आले होते. तसेच नवीन शैक्षणिक वर्षापर्यंत सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षकांची संख्या लक्षात घेता शिक्षकांच्या रिक्त पदांचा आकडा २ हजारांच्या वर जाणार आहे. राज्यात शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल कामगिरी करणार्‍या रत्नागिरी जिल्ह्याला पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षकांअभावी पिछाडीवर जावे लागणार आहे. शिक्षकभरती नव्याने करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात येणार होते; परंतु अजूनही त्याची कार्यवाही झालेली नाही. प्रत्यक्ष भरतीप्रक्रिया होईपर्यंत पुढील शैक्षणिक वर्ष पूर्ण होईल. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षकांची वानवा असेल. नवीन शिक्षक मिळेपर्यंत आंतरजिल्हा बदल्या करू नका, असे रत्नागिरीतून सांगितले जात होते. प्रशासनाकडूनही वारंवार याबाबत पत्रही दिले गेले; परंतु बदल्या झालेल्यांना कार्यमुक्त करा, असे आदेश शासनाकडून आल्याने जिल्हा परिषद प्रशासनाला कार्यवाही करावी लागली. शिक्षकांच्या रिक्त पदाचा खड्डा पडलेला असतानाच पुढील शैक्षणिक वर्षासाठी आंतरजिल्हा बदलीने जाणार्‍यांचे प्रस्ताव मागवा आणि त्याचा कार्यक्रम राबवा, अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत.
ही प्रक्रिया जूनपासून सुरू होईल. रत्नागिरी जिल्ह्यात परजिल्ह्यातील शिक्षकांचा अधिक भरणा आहे. त्यातील बरेचसे शिक्षक हे परजिल्ह्यात जाण्यास इच्छुक आहेत. नवीन भरती होण्यापूर्वी या प्रस्ताव सादर करणार्‍या शिक्षकांना कार्यमुक्त केले तर रत्नागिरीतील प्राथमिक शिक्षणाची दुरवस्था होणार आहे.

चौकट
...तर रोषाला सामोरे जावे लागेल
रिक्त पदांचा टक्का वाढल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचा समतोल साधण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे. २० पटांच्या शाळांवर एक शिक्षक आणि त्यापुढील पटाच्या शाळांवर दोन शिक्षक, असे नियोजन शिक्षण विभाग करत आहे. ज्या शाळांमध्ये ३ किंवा ४ शिक्षक आहेत त्यांना कामगिरीवर काढून शिक्षक नसलेल्या शाळांमध्ये नियुक्त करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी नियोजन झाले नाही तर ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जाऊ शकते.