महिलांना पासमध्ये आणखी सवलत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांना पासमध्ये आणखी सवलत नाही
महिलांना पासमध्ये आणखी सवलत नाही

महिलांना पासमध्ये आणखी सवलत नाही

sakal_logo
By

महिलांना पासमध्ये आणखी सवलत नाही

पुर्वीप्रमाणेच प्रक्रिया; अर्ध्या तिकिटाच्या निर्णयानंतरची स्थिती

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः एसटीमध्ये महिलांसाठी तिकिटामध्ये थेट पन्नास टक्के सवलत मिळत असली तरी एसटीच्या चार आणि सात दिवसांच्या सवलत पास रक्कमेमध्ये काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे महिलांना पासासाठी पूर्वीप्रमाणेच दराची आकारणी होत असून त्यामध्ये पन्नास टक्के सवलतीचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र आहे. आधीच पास सवलतीमध्ये दिले जात असल्याने त्यामध्ये आणखी सवलत मिळणार नाही, असे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेमध्ये राज्यभरातील महिलांना प्रवास करताना थेट पन्नास टक्के सवलत राज्य सरकारने जाहीर केली आहे. यामुळे एसटीकडील प्रवाशांचा ओढा वाढला. तिकीटातील या सवलतीमधील फरकाची रक्कम राज्य शासन एसटी महामंडळाला अदा करते; मात्र, महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये थेट पन्नास टक्के सवलत जाहीर केल्यामुळे एसटीला महिलांचा प्रतिसाद वाढला आहे. महिला एसटीची वाट पहात मार्गावर थांबून असतात. महिलांबरोबरच त्यांच्या कुटुंबातील पुरूष मंडळीही एसटीलाच पसंती देत असल्याचे दिसते. महिलांचा एसटीकडे ओढा वाढल्याने याचा थेट परिणाम खासगी प्रवाशी वाहतुकीबरोबरच सहा आसनी रिक्षा व्यावसायिकांना बसला असल्याचे प्राथमिक चित्र आहे. लांब पल्याच्या प्रवासामध्ये पन्नास टक्के तिकिटामध्ये बचत होत असल्याने महिलांकडून एसटीला अधिक पसंती वाढल्याचे दिसते. एका तिकीटाच्या रक्कमेमध्ये महिलांचा दुहेरी प्रवास भागत असल्याने आपोआपच आर्थिक बचतही होत असल्याचे चित्र आहे. यामुळे गरीब, गरजू तसेच कष्टकरी कुटुंबातील महिलांना याचा आर्थिक लाभ झाला आहे.
याआधी एसटीने प्रवाशांना एसटी सेवेकडे आकर्षित करण्यासाठी चार आणि सात दिवसांची सवलत पास योजना सुरू केली होती. यामध्ये रात्री बारापासून अखेरच्या दिवसाच्या रात्री बारा वाजेपर्यंत पासावर प्रवास करण्याची मुभा आहे. यामध्ये तीन दिवसांसाठी प्रौढांसाठी साध्या गाडीसाठी ११७० रूपये तर शिवशाही गाडीसाठी १५२० रूपये तसेच सात दिवसांसाठी २०४० साध्या गाडीसाठी तर शिवशाही गाडीसाठी ३०३० रूपये प्रवास भाडे आकारले जात आहे. या सवलत पासाच्या कालावधीमध्ये कितीही प्रवास करण्याची संधी पासधारकांना असते. मात्र, असे असले तरीही महिलांना पन्नास टक्के सवलतीचा लाभ येथे मिळणार नाही. त्यांना पासाची पूर्ण रक्कम भरूनच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे या सवलत पासामध्ये आणखी पन्नास टक्के सवलत मिळण्याची शक्यता नाही, असे सांगण्यात येत आहे.
.............
चौकट
एसटी प्रशासन म्हणते...
चार किंवा सात दिवसांच्या पासामध्ये प्रवाशांना आधीच सवलत दिलेली असते. एसटी एका प्रवाशाला कोणतीही एकच सवलत देऊ शकते. त्यामुळे एसटी तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत आहे तशीच ती पासामध्येही मिळण्याची सध्यातरी तरतुद नाही. त्यामुळे महिलांनी एकतर पास सवलत घ्यावी किंवा पन्नास टक्के तिकिट सवलतीचा लाभ घ्यावा.