सीईटी परीक्षेची केंद्रे फुल्ल

सीईटी परीक्षेची केंद्रे फुल्ल

१९१४


सीटीईटी परीक्षेची राज्‍यातील केंद्रे फुल्‍ल
परशुराम उपरकर : शिक्षणमंत्री सिंधुदुर्गात केंद्र का सुरू करू शकत नाहीत?
कणकवली, ता. १० : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देणाऱ्या उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी रत्‍नागिरी किंवा सिंधुदुर्गात या परीक्षेचे केंद्र का सुरू करू शकत नाहीत, असा सवाल मनसे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज उपस्थित केला. श्री. उपरकर यांनी येथील मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
ते म्‍हणाले, ‘‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै २०२३ मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र निवडण्यासाठी २६ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. महाराष्‍ट्रातील २१ ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. यात सिंधुदुर्ग लगत असणारे कोल्‍हापूर, मुंबईसह राज्‍यातील सर्व परीक्षा केंद्रे फुल्‍ल झाली आहेत. आता परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना गुजरात येथील अहमदाबाद, कर्नाटकातील बेंगलोर आदी परीक्षा केंद्रांचा पर्याय दाखवला जात आहे. सिंधुदुर्गातील उमेदवारांना शिक्षक भरती परीक्षा देण्यासाठी एवढ्या लांब जाणे गैरसोयीचे ठरत आहे. त्‍यामुळे सिंधुदुर्गचे सुपूत्र आणि राज्‍याचे शिक्षणमंत्री असणारे दीपक केसरकर यांच्याकडून अपेक्षा होती. शिक्षणमंत्री या नात्‍याने ते कोकणातील उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी रत्‍नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात या परीक्षेचे केंद्र सुरू करू शकले असते. मात्र त्‍यांनी याबाबत अनास्था दाखवली आहे.’’
श्री. उपरकर म्‍हणाले, ‘‘शिक्षणमंत्र्यांनी राज्‍यात शिक्षकांची पदे भरण्यात येणार असल्‍याची घोषणा नुकतीच केली होती. शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मात्र या परीक्षेचे केंद्रच उपलब्‍ध नसेल तर सिंधुदुर्ग तसेच कोकणातील उमेदवारांची मोठी गैरसोय होणार आहे. केंद्रीय शिक्षक भरतीसाठी राज्‍यात निवडक ठिकाणीच केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सिंधुदुर्गलगत कोल्‍हापूर हे एकमेव केंद्र आहे. त्‍यामुळे रत्‍नागिरी किंवा सिंधुदुर्गात हे केंद्र सुरू होणे आवश्‍यक होते. परंतु सिंधुदुर्गचे सुपूत्र असून देखील शिक्षणमंत्री रत्‍नागिरी किंवा सिंधुदुर्गात केंद्र सुरू करू शकलेले नाहीत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com