मोपा विमानतळामुळे बांदा तहानलेले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोपा विमानतळामुळे बांदा तहानलेले
मोपा विमानतळामुळे बांदा तहानलेले

मोपा विमानतळामुळे बांदा तहानलेले

sakal_logo
By

1983
बांदा ः येथे कोरड्या पडलेल्या तिलारीच्या शाखा कालव्याची पाहणी बुधवारी करताना जावेद खतीब, प्रशांत बांदेकर व शैलेश केसरकर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

मोपा विमानतळामुळे बांदा तहानलेले
तिलारीचा विसर्ग; शाखा कालव्यातील पाणी अचानक बंद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० ः पाण्याच्या वाढत्या मागणीनुसार मोपा (गोवा) येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तिलारी शाखा कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आले. त्यासाठी बांदा शाखा कालव्यात सोडलेले पाणी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करण्यात आले. याचा परिणाम बांदा शहर ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेवर झाला असून, शहरातील खासगी विहिरींच्या पाणीपातळीत देखील मोठी घट झाली आहे. परिणामी परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. उपसरपंच जावेद खतीब यांनी आज कालव्याची पाहणी करत तिलारी कालवा विभागाने तत्काळ पाणी न सोडल्यास कालव्यात बसून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तिलारीच्या बांदा शाखा कालव्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यात नेतर्डे येथे पाणी सोडण्यात आले होते. पाण्याचा वेग अत्यंत कमी होता; मात्र कालव्याच्या ४२ किलोमीटर क्षेत्रात पाणी वेळेत न पोहोचल्याने इन्सुली व रोणापाल ग्रामस्थांनी देखील आंदोलन केले होते. रोणापाल ग्रामस्थांनी सावंतवाडी कार्यालयासमोर अनोखे गळफास आंदोलन केले होते. याची दखल घेत कालवा विभागाने गोव्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत पाण्याचा विसर्ग दुप्पट केला होता. पाणी जमिनीत मुरल्याने बांदा शहर व लाभ क्षेत्रातील विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली होती.
बांदा ग्रामपंचायतीची नळपाणी योजनेची विंधन विहीर सटमटवाडी येथे कालव्यालगत आहे. कालव्यात सोडलेल्या पाण्यामुळे विहीर देखील तुडुंब भरून वाहत होती. त्यानंतर कालव्यात सोडलेले पाणी पूर्वसूचना न देता बंद केल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पाण्याअभावी बांद्याला टंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील बागायती देखील करपून गेली आहे.
याबाबत शहरातील अनेकांच्या तक्रारी आल्याने उपसरपंच जावेद खतीब यांनी आज सदस्य प्रशांत बांदेकर, शैलेश केसरकर यांच्यासह तिलारी कालव्याची पाहणी केली. अनेकांच्या घरातील खासगी विहिरींची देखील पाहणी करत तीव्र संताप व्यक्त केला.
तिलारी शाखा कालव्यावर नेतर्डे, डिंगणे, बांदा, इन्सुली, ओटवणे, सरमळे, निगुडे, पाडलोस, रोणापाल गावातील शेतकरी व स्थानिक अवलंबून आहेत. अनेक गावांत शेतकरी या पाण्यावरच उन्हाळी शेती करतात. नगदी पिके घेतात. मात्र, पाणीच बंद झाल्याने शेती व बागायती संकटात आहे.

दरवर्षी कालव्यातील पाणी मेच्या अखेरपर्यंत सुरू ठेवण्यात येते. पाऊस सुरू झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाला कल्पना देऊन पाणी बंद करण्यात येते; मात्र तिलारी कालवा विभागाने मोपा विमानतळाच्या नावाखाली येथील पाणी बंद केल्यास स्थानिकांसह कालव्यात बसून आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी कालवा विभागाची राहील.
- जावेद खतीब, उपसरपंच, बांदा

बांदा शाखा कालव्यातील विसर्ग दुप्पट केल्याने ठिकठिकाणी पाणी झिरपून स्थानिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे विसर्ग वेग कमी केला. मोपा विमानतळासाठी नियमित पाणीपुरवठा सुरू आहे; मात्र यासाठी पाणी बंद केलेले नाही. कालव्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसांत पाणी पूर्ववत कालव्यात सोडण्यात येईल.
- रोहित कोरे, कार्यकारी अभियंता, तिलारी कालवा विभाग