
धावत्या मोटारीत पत्नीचा गळा आवळून खून
02006 - विशिता नाईक
0200७
दोडामार्ग ः खून प्रकरणातील संशयित आणि कारवाई करणारे पोलिस पथक.
(छायाचित्र ः संदेश देसाई)
धावत्या मोटारीत पत्नीचा गळा आवळून खून
दाम्पत्य वास्कोचे; घोटगेवाडीत चेहराही ठेचला, पतीसह दोघे ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १० ः चारित्र्याच्या संशयावरून पतीने साथीदाराच्या मदतीने दोडामार्ग ते घोटगेवाडी दरम्यानच्या प्रवासात मोटारीत पत्नीचा ओढणीने गळा आवळत खून केला. यानंतर ओळख पटू नये म्हणून दगडाने ठेचून तिचा चेहरा विद्रूप करीत मृतदेह घोटगेवाडी-भटवाडीतील पुलाखाली टाकला. हा प्रकार सोमवारी (ता. ८) रात्री घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीसह दोघांना अटक केली.
दोडामार्ग पोलिसांनी सांगितले, की पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याच्या व याबाबत वारंवार समजावूनही ती ऐकत नसल्याच्या रागातून संशयिताने कृत्य केले. विशिता विनोद नाईक (वय ३०, रा. वास्को-गोवा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती विनोद मनोहर नाईक (४०, मूळ रा. बेलबाय, वास्को व सध्या रा. पिंटो अपार्टमेंट, म्हापसा-गोवा) व त्याचा साथीदार ऋतुराज श्रावण इंगवले (२५, मूळ रा. चंदगड, जि. कोल्हापूर व सध्या रा. चारीवाडी-म्हापसा) यांना अटक केली. विशिता यांचा मृतदेह काल (ता. ९) रात्री सापडल्यावर या प्रकाराला वाचा फुटली. दोडामार्ग पोलिसांनी अवघ्या पाच तासांतच संशयितांना जेरबंद केले.
घोटगेवाडी-भटवाडी येथील एक पुरोहित काल उशिरा त्यांच्या जनावरांना घेऊन नदीवर पाणी पाजण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांना कळविले. पोलिसपाटील रामचंद्र नाईक यांनी वर्दी देताच दोडामार्ग पोलिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी, सहायक निरीक्षक जयेश ठाकूर, रामचंद्र मळगावकर, अनिल पाटील, संजय गवस, बाबी देसाई, दीपक सुतार, तनुजा हरमलकर, होमगार्ड बाळकृष्ण जाधव रात्री नऊला घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा केला. मृतदेहाच्या अंगावर लाल कुर्ता होता. हातात सोन्याची बांगडी, तर दुसऱ्या हाताच्या बोटात अंगठी होती. तेथे चपलाही आढळून आल्या. गळ्याभोवती ओढणी गुंडाळलेल्या अवस्थेत होती. चेहराही दगडाने ठेचून विद्रूप केलेला होता. पोलिसांनी प्रथम जवळील ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार आहे का, याची चौकशी केली. मृत महिलेच्या पेहरावावरून ती गोव्यातील असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. तातडीने गोव्यात जात शहरी पोलिस ठाण्यांमध्ये चौकशी सुरू केली. म्हापसा (गोवा) येथील पोलिस ठाण्यात विशिता नाईक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. पोलिसांनी तिचे छायाचित्र व कपडे याची पडताळणी केली असता ते मृतदेहाशी मिळते-जुळते होते. त्यानंतर त्यांनी पती विनोदला चौकशीसाठी बोलावले. विनोदच्या माहितीत विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याने आपणच खून केल्याची कबुली दिली व यात ऋतुराज इंगवलेने मदत केल्याचे पोलिसांना सांगितले.
त्याने दिलेल्या जबाबानुसार विनोद व विशिता यांचे २०१५ मध्ये लग्न झाले होते. मात्र, विशिताच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आली. ती २०२० पासून त्याच्यासोबत राहायची. असे असतानाही ती अधूनमधून पती विनोदला एका हॉटेलमध्ये भेटायची. तीन वर्षे असेच सुरू होते. विनोद विशिताची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचा; मात्र तिने दुर्लक्ष केले. सोमवारी त्यांच्यात पुन्हा भेटण्याचे ठरले आणि ठरल्याप्रमाणे ते एका हॉटेलमध्ये भेटले. या वेळी विनोदने बाहेर जेवायला जाऊया, असे सांगितले. विशितानेही होकार दिला आणि दोघेही मोटारीने दोडामार्गमधील एका हॉटेलमध्ये जेवायला आले. मोटारचालक म्हणून विनोदचा साथीदार ऋतुराज होता. जेवणानंतर विनोदने तिला ‘माझा एक मित्र मला पैसे देणार आहे, त्यामुळे ते आणायला जाऊया’ असे सांगितले. या प्रवासादरम्यान विनोदने तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने दोघांत जोरदार भांडण झाले. यातच त्याने ओढणीने गळा आवळत तिचा खून केला. यानंतर ऋतुराजच्या मदतीने भटवाडी येथील पुलाच्या खाली डाव्या बाजूला आणून मृतदेह फेकण्याचा प्रयत्न केला. विशिताची शरीरयष्टी सुदृढ असल्याने त्यांनी मृतदेह ओढत नेऊन पुलाच्या उजव्या बाजूला नेऊन टाकला. मृतदेह ओढत नेण्याच्या खुणा घटनास्थळावर आढळून आल्या. शिवाय, त्या मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी चेहरा दगडाने ठेचला आणि रक्ताचे शिंतोडे उडालेला दगड तेथेच टाकून त्यांनी पलायन केले.
सावंतवाडी पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंकी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही दाखल झाले. निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक महेंद्र घाग यांच्यासह रवी इंगळे, केसरकर आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. निरीक्षक ऋषीकेश अधिकारी, सहायक निरीक्षक जयेश ठाकूर, रामचंद्र मळगावकर, अनिल पाटील, संजय गवस यांनी तपास केला. ऋषीकेश अधिकारी तपास करीत आहेत.