भाजप जिल्हाध्यक्ष निवड लवकरच

भाजप जिल्हाध्यक्ष निवड लवकरच

02015
सिंधुदुर्गनगरी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर. शेजारी सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रदेश सदस्य संध्या तेरसे, बंड्या सावंत.

भाजप जिल्हाध्यक्ष निवड लवकरच

अतुल काळसेकर; जिल्हांतर्गत चाचपणी सुरू, सोमवारपर्यंत प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा अध्यक्षपदासाठी १५ मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कोल्हापूर येथील प्रदेश सरचिटणीस महेश जाधव यांची निवड केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्या पक्षांतर्गत मत जाणून घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.
येथील भाजप कार्यालयात काळसेकर यांच्यासह प्रदेश सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संध्या तेरसे, बंड्या सावंत यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. यानंतर काळसेकर यांनी आपल्या जिल्हा बँक उपाध्यक्ष दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षांतर्गत निवडणुकीची माहिती दिली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, राजू राऊळ, महिला जिल्हाध्यक्षा तेरसे, बंड्या सावंत आदी उपस्थित होते. यावेळी सरचिटणीस सावंत यांनी पक्षात गेली ३० वर्षे सतत कार्यरत असलेले श्री. काळसेकर यांना राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी ही संधी माधव भंडारी यांना मिळाली होती, असे सांगितले.
यावेळी श्री. काळसेकर म्हणाले, ‘‘माझ्यासाठी ३ मे सर्वात मोठा आनंदाचा ठरला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे पद दिले. याच दिवशी खावटी कर्ज माफीसाठी ५४ कोटी रुपयांची तरतूद केली. यासाठी माझे पहिल्यापासून प्रयत्न राहिले होते. एका दिवशी दोन गोष्टी घडल्या होत्या. कोकणातील तीन जिल्ह्यांसाठी एक उपाध्यक्ष निवडण्यात आले आहेत. तो सिंधुदुर्ग जिल्ह्याला सन्मान मिळाला आहे. ही मोठी जबाबदारी आहे. कोकणात भाजपचे नितेश राणेंच्या रुपाने एकच आमदार आहेत. त्यामुळे मला तीन जिल्ह्यात फिरावे लागणार आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ जिंकू शकता, असा विश्वास आता निर्माण झालेला आहे. त्यासाठी गेले अनेक महिने आम्ही परिश्रम घेत आहोत. २०२४ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक होणार असून यानिमित्त तीन जिल्ह्यात मला फिरावे लागणार आहे. भाजप सिस्टीममुळे जिंकत आहे. पैशाच्या जीवावर जिंकत नाही. यावेळी सुद्धा तीच परिस्थिती आहे. भाजप कोकणातील या तीन जिल्ह्यातील सर्व १५ जागा जिंकेल. तशी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. १५ जागा भाजप तयारी करीत आहोत. गेले १४ महिने ही तयारी करीत आहोत. आमची तयारी सुरू आहे. जो चांगली तयारी करतो तोच यश प्राप्त करतो, असे भाजपचे धोरण आहे.’’ प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रत्येकाला कार्यकर्त्यांने दिवसाला एक तास पक्षासाठी द्या, असे आदेश दिले असून यामध्ये केंद्र व राज्य शासन योजना सांगा. युवा कार्यकर्त्याला भेटा. नव मतदाराला भेटा, असे त्यांनी सांगितले आहे. लाभार्थी हीच भाजपची ताकद आहे. जल जीवन मिशन यासाठी ४६५ कोटी जिल्ह्यात आले आहेत. ५८ हजार कुटुंबांना याचा फायदा मिळत आहेत. पंतप्रधान देत असलेले सहा हजार रुपये जिल्ह्यातील लाखाच्यावर शेतकऱ्यांना मिळत आहेत. आतापर्यंत ८२ कोटी रुपये वितरीत झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
-----------
चौकट
पूर्वतयारी आवश्यक
सावंतवाडी विधानसभा मतदार संघात मंत्री दीपक केसरकर व जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यात सुरू असलेल्या कलगीतुरा याबाबत काळसेकर यांना विचारले असता दोन राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत. दोघांनाही पक्ष वाढवायचा आहे. तेथील आमदार केसरकर असले तरी केंद्र सरकार, पालकमंत्री यांच्या माध्यमातून झालेली कामे सांगायची नाही, असे होऊ शकत नाही. आम्ही सध्या कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहत नाही तर पूर्वतयारी करीत आहोत. नंतर तयारी करण्यापेक्षा आतापासून तयारी करणे, केव्हाही योग्यच, असे काळसेकर म्हणाले. यावेळी त्यांनी केसरकर यांच्यासोबत कार्यकर्ता किती आहे, हे पाहणे गरजेचे असल्याची खोचक टीपणी केली.
-------------
चौकट
...म्हणून रिफायनरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले पाच आमदार होते. आता तीन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आठ होते. आता पाच झाले आहे. अन्य जिल्ह्यांत ही संख्या वाढत असताना या दोन जिल्ह्यातील संख्या कमी झाली, ही बाब अभिमानास्पद नाही. यामागे येथील तरुण परजिल्ह्यातील रोजगारासाठी जात आहे, हे आहे. यावर उपाय म्हणजे बारसू रिफायनरी असल्याचे काळसेकर म्हणाले.
--
चौकट
एकत्रित नगरपंचायत होईल
काळसेकर यांनी सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत लवकरच होणार; पण, अधिकारी म्हणतात त्याप्रमाणे प्राधिकरण वगळून न होता प्राधिकरण यासह एकत्रित नगरपंचायत होईल. नगरपंचायत होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com