दूषित रक्तपुरवठ्याने एचआयव्ही?

दूषित रक्तपुरवठ्याने एचआयव्ही?

दूषित रक्तपुरवठ्याने एचआयव्ही?

माहिती अधिकारातून धक्कादायक उघड

मुंबई, ता. १० ः सदोष रक्तपुरवठ्यामुळे राज्यात गेल्या पाच वर्षांत १,०१० जणांना एचआयव्ही बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जात ही माहिती उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु दूषित रक्तपुरवठा झाल्याने एचआयव्हीची बाधा झाल्याचा समज पूर्णपणे चुकीचा असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शरीरात अशुद्ध रक्त चढवल्याने एचआयव्ही-एड्सची लागण झाल्याची चुकीची माहिती ‘ॲण्टी रेट्रोव्हायरल थेरपी’ (एआरटी) केंद्रांना देत अनेक रुग्ण पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगण्यात आले.
माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत भारतात ७,६७० जणांना दूषित रक्तामुळे एचआयव्ही बाधा झाली आहे. राज्यात ही आकडेवारी १,०१० एवढी आहे; तर उत्तर प्रदेश राज्यात दूषित रक्त पुरवठ्यामुळे १,४९४ जणांना एड्सची बाधा झाली होती. दिल्ली ४८४ आणि गुजरातमध्ये १९९ जणांना एड्सची लागण झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. अशुद्ध रक्त पुरवठ्यामुळे एचआयव्हीची लागण झालेल्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील आकडेवारीनुसार २०१७ या वर्षी दूषित रक्ताने सर्वाधिक म्हणजे १९० जणांना एचआयव्ही बाधा झाली आहे. सर्वाधिक कमी म्हणजे ९१ जणांना २०२० या वर्षात झाली आहे.

नॅट टेस्ट पर्याय
दात्याने रक्तदान केल्यानंतर विविध रक्त घटकांसोबतच एचआयव्ही तपासणीसाठी जी ‘एलायझा’ टेस्ट केली जाते, ती १०० टक्के पुरेशी नाही. ही यंत्रणा जुनाट झाली आहे, असे बोलले जाते. ‘एलायझा’ऐवजी अत्याधुनिक नॅट (न्यूक्लिअर ॲसिड टेस्ट) केली पाहिजे, असा आग्रह धरला जात आहे. नॅटची टेस्ट खर्चिक आहे. एक युनिट रक्त तपासायचे असेल, तर त्यासाठी हजार ते १२०० रुपयांपर्यंत खर्च येतो. मुंबईत काही खासगी रक्तपेढ्यांकडे ही टेस्ट उपलब्ध आहे. राज्यभरातील सरकारी इस्पितळांमध्ये जर नॅटची यंत्रणा बसवायचे म्हटले, तर त्यासाठी काही हजार कोटींपेक्षा अधिकचा खर्च येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com