सायनच्या अंडरपासमध्ये ‘थिम बेस’ रोषणाई

सायनच्या अंडरपासमध्ये ‘थिम बेस’ रोषणाई

सायनच्या अंडरपासमध्ये
‘थिम बेस’ विद्युत रोषणाई
मुंबई : मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत एफ उत्तर विभागातील नानालाल डी. मेहता उड्डाणपुलाचा अंडरपास झगमगून उठणार आहे. पालिकेकडून या अंडरपासमध्ये थिम बेस एलईडी विद्युत रोषणाई केली जाणार असून यासाठी पालिका साधारणतः तीन कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत प्रस्तुतप्रकरणी एफ उत्तर विभागातील नानालाल डी. मेहता उड्डाणपुलाच्या अंडरपासचे विद्युत रोषणाईने सुशोभीकरण करण्याचे काम या विभागामार्फत प्रस्तावित करण्यात आहे आहे. या कामामध्ये नानालाल डी. मेहता उड्डाणपुलाचे एलईडी रोषणाईकरणाचे काम डिझाईन, पुरवठा उभारणी, चाचणी, कार्यान्वितीकरण व दोन वर्षांच्या हमी कालावधी पश्‍चात तीन वर्षे दोष दायित्वाच्या कंत्राटासह करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. दरम्‍यान पालिकेच्या या कामाचे स्‍थानिकांनी स्‍वागत केले आहे. सौंदर्यीकरणाच्या कामामुळे या परिसराचे रूप पालटणार आहे.
---
डांबरीकरण रखडल्‍याने रस्‍ता धोकादायक
चेंबूर ः गोवंडी येथील देवनार डम्पिंग मार्गावरील कमला रमणनगरजवळील मार्गाचे डांबरीकरण रखडले आहे. यामुळे हा रस्‍ता वाहनचालकांसह नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे. पालिकेने त्‍वरित हे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कमला रमणनगर डम्पिंग मार्गाचे पालिका सेंट्रल एजन्सी मार्फत डांबरीकरण करण्यात येत आहे. हे काम एम. एस. विशाल कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत सुरू आहे. सहा महिने होऊनही हे काम पूर्ण झालेले नाही. येथे मार्गाच्या मधून केबल टाकण्याकरिता खड्डा ठेवण्यात आलेला असल्‍याने येथून वाहन चालवणे अवघड जात आहे. तसेच अनेक ठिकाणी बॅरिकेड्स नसल्‍याने नागरिकांना येथून चालणेही धोक्‍याचे ठरत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम न झाल्‍यास अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.
---
स्‍वच्छतागृहाची दुरुस्ती सुरू
मालाड ः कांदिवली पूर्वेतील हनुमान नगर नरसीपाडा मधील सरस्वती गृहनिर्माण संस्था येथील सार्वजनिक स्‍वच्छतागृहाचे घाण पाणी रस्त्यावर येत होते. या बाबत ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच अवघ्या काही तासांत स्‍वच्छतागृहाच्या पाईपाची दुरुस्ती पालिकेने सुरू केली आहे. स्‍वच्छतागृहाचे घाण पाणी रस्‍त्‍यावर वाहत असल्‍यामुळे स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. तसेच सर्व परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबत येथील रहिवासी राज लुयीस, दीपक रासकर, दीपक गवई यांनी पालिकेचे आर दक्षिण विभागीय सहाय्यक आयुक्त यांना या समस्येबाबत पत्र लिहून तक्रार केली होती. तसेच खासदार गोपाळ शेट्टी यांनीही या समस्येबाबत पालिकेला पत्र लिहिले होते. या संदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्‍यानंतर पालिकेने त्‍वरीत येथे कार्यवाही सुरू केली आहे.
---
मार्वे रोडवर जलवाहिनीला गळती
मालाड ः मालाड पश्चिमेतील मार्वे रोडवर मालवणी पोसरी तलावाच्या लगत जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी होत आहे. मार्वे रोडवरील जलवाहिनी फुटल्याने पिण्याचे पाणी वाया जात आहे. स्थानिक रहिवाशांनी पाण्याची गळती थांबवण्यासाठी पेव्हर ब्लॉक लावले आहेत. दरम्‍यान या गळतीमुळे परिसरातील घरात पाणी कमी दाबाने येत असल्‍याचे स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे. या जलगळतीबाबत स्थानिकांनी पालिकेच्या हेल्पलाईनवर कळवले आहे. पालिकेने त्‍वरित कार्यवाही करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
--
मुलुंडमध्ये अर्थ प्रबोधन व्याख्यानमाला
मुलुंड ः महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांच्या अर्थ विभागातर्फे अर्थप्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कंपन्यांच्या आर्थिक ताळेबंदीमधील धोक्याच्या खुणा कशा ओळखाव्यात? हा या व्याख्यानमालेचा प्रमुख विषय आहे. सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आणि प्रमुख वक्ते सीए हेमंत पेठे हे उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. आपण अकाउंट्स मधले तज्ज्ञ नसलो तरी ताळेबंदात काही गडबड तर नाही ना; हे कसे ओळखावे, हजारो शेयर्स मधील नासके आंबे कसे ओळखावे, आदी विषयांवर या व्याख्यानमालेमध्ये उहापोह करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. १२) संध्याकाळी सहा वाजता सेवा संघाच्या सुविधा शंकर गोखले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम मोफत असून सर्व नागरिकांनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
--
पृथ्वीराज चौकालगत डेब्रिजचे ढीग
मालाड ः मालाड पश्चिमेतील मार्वे रोडवर असलेल्या पृथ्वीराज चौहान चौकालगत डेब्रिज टाकले जात आहे. मार्वे रोडवरील अस्मिता ज्योती कॉम्प्लेक्सलगतच्या सिग्नलजवळ पृथ्वीराज चौहान चौक आहे. या चौकाच्या फलकासमोर येथील काही नागरिक दुकान व घराच्या दुरुस्तीत निघणारे डेब्रिज आणून ठेवत असल्याचा आरोप स्‍थानिकांनी केला आहे. या भागाज या डेब्रिजमुळे पदपथावरून चालणे अशक्‍य झाले आहे. तसेच या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असल्‍याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्‍यामुळे पालिकेने हे ड्रब्रिज त्‍वरित हटवावे व येथे डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्‍थानिकांनी केली आहे. दरम्‍यान मालाड परिसरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्‍या बांधकामांतून निघणारे डेब्रिज अनेकदा रस्‍त्‍याच्या कडेला टाकले जात असून पालिकेने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्‍त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com