सिंधुदुर्गाचा कृषी विभाग दुबळा

सिंधुदुर्गाचा कृषी विभाग दुबळा

सिंधुदुर्गाचा कृषी विभाग दुबळा
प्रमुख अधिकारी पदेच रिक्तः ५६८ पैकी २८१ जणच कार्यरत
नंदकुमार आयरेः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः कृषी क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल करीत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हा अधीक्षक कृषी विभाग कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे दुबळा बनला आहे. या विभागातील मंजूर ५६८ पदांपैकी २८१ कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून तब्बल २९७ पदे रिक्त आहेत. याचा कृषी क्षेत्राच्या प्रगतीवर परिणाम जाणवत आहे. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. नवनवीन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करत तरुण पिढी कृषी क्षेत्राकडे वळताना दिसत आहे; मात्र त्यांना मार्गदर्शन करणारा व सुविधा पुरवणारा जिल्ह्याचा कृषी विभागच प्रमुख अधिकाऱ्यांच्या रिक्त पदामुळे दुबळा बनल्याचे चित्र आहे. नैसर्गिक आपत्ती, हवामानातील वारंवार होणारे बदल आणि जंगली जनावरांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरीही जिल्ह्यातील शेतकरी कर्ज घेऊन या क्षेत्रात प्रगती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शेतकरी आणि शासनाच्या विविध योजना यामध्ये महत्त्वाचा घटक हा शासकीय अधिकारी व कर्मचारी असतो. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे प्रमुख कार्य हे अधिकारी, कर्मचारी करीत असतात. प्रामुख्याने कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी अशा पदांवर कार्यरत असलेले अधिकारी यात प्रामुख्याने जबाबदारी पार पाडतात. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह तब्बल २९७ रिक्त पदे शासनाकडून भरली जात नसल्याने या विभागातील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे. परिणामी जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीला ब्रेक लागला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करणे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळवून देणे ही जबाबदारी पार पाडताना रिक्त पदांमुळे दिरंगाई होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काही वेळा वेळेत नुकसानीचे पंचनामे झाले नाही तर शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे कृषीसारख्या महत्त्वाच्या विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. मात्र, शासनाकडून ही पदे भरली जात नसल्याने जिल्ह्याचा कृषी विभाग अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दुबळा बनत चालला आहे.
--------------
चौकट
कृषी क्षेत्राची प्रगती मंदावतेय
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही तालुक्यात कृषी क्षेत्राला अनुकूलता असूनही त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने कृषी विकासाला खीळ बसली आहे. वातावरणातील बदल आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे येथील सर्वच पिकांना धोका संभवतो व त्यामुळे नुकसानीची भीती कायम राहते. अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी वाडी-वस्त्यांवर पोहोचणे आवश्यक असते. मात्र, मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने आणि कार्यरत कर्मचाऱ्यांकडे अनेक पदांची जबाबदारी असल्याने शेतीचे पंचनामे करणे, अतिवृष्टी तसेच दुष्काळी काळात मार्गदर्शन ,शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिके, कीड नियंत्रण मार्गदर्शन यांसारखे विविध कार्यक्रम राबवणे शक्य होत नाही. यामुळे कृषी क्षेत्राची प्रगती मंदावल्याचे दिसून येत आहे.
-----------
चौकट
कृषि विभागातील मार्च २०२३ अखेर रिक्त पदे
पदाचे नाव*रिक्त पदे
कृषी उपसंचालक*१
उपविभागीय कृषी अधिकारी*२
तंत्र अधिकारी*५
तालुका कृषी अधिकारी*४
कृषी अधिकारी*१३
अधीक्षक*२
सहाय्यक अधीक्षक*३
वरिष्ठ लिपिक*१
लिपिक*३१
लघुलेखक निम्मस्तर*१
लघु टंकलेखक*२
आरेखक*१
अनुरेखक*४३
कृषी पर्यवेक्षक*२०
कृषी सहाय्यक*१०३
वाहन चालक*९
टिलर ऑपरेटर*१
शिपाई*३८
रोपमळा मदतनीस*१६
प्रथम श्रेणी मजूर*१
----------------
कोट
जिल्हा अधीक्षक कृषी विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाच्या विविध योजना राबवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रिक्त पदांचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. कृषी विभागाकडील कामाचा व्याप लक्षात घेता या विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- विजयकुमार राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग
---------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com