
सांगवे कनेडी येथे मिरग महोत्सव
सांगवे कनेडी येथे मिरग महोत्सव
शनिवारी उद्घाटनः महीला बचत गटातील उत्पादीत माल बाजारपेठ
कनेडी,ता. ११ः भिरवंडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावातील बचत गट महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मिरग महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा मिरग महोत्सव सांगवे कनेडी बाजारपेठेतील समाधी पुरुष हॉल येथे १३ आणि १४ मे रोजी भरविण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन शनिवारी १३ मे रोजी सकाळी आठ वाजता आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत आणि सांगवे, भिरवंडे,गांधीनगरचे सरपंच उपस्थितीत राहणार आहेत.
या मिरग महोत्सवामध्ये गावातील विविध बचत गटाच्या महिलांनी सहभाग घेतला आहे. या बचत गटांसाठी १२ स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सहकारातून समृद्धीचा मंत्र अंगीकारत, भिरवंडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळांने बचत गटातील महिलांना आर्थिक समृद्धी यावी या दृष्टिकोनातून व सोसायटीच्या माध्यमातून दोन दिवसाच्या कालावधीत बचत गटांचा मिरग महोत्सव आयोजित केला आहे. कनेडी बाजार पेठेतील समाधी पुरुष सभागृह, मैदान आणि रस्त्यालगतीच्या जागेमध्ये हा ‘मिरग महोत्सव’ होत आहे.
भिरवंडे गावातील प्रगती, जागृती, महापुरुष,शक्ती, गाडेश्वर, स्वामी समर्थ, उन्नती, संस्कृती, ओमकार असे बचत गट आणि त्यातील महिला यात सहभागी होत आहेत. याचबरोबर सोसायटीच्या माध्यमातून बी - बियाणे विक्री, सुखी मच्छी विक्री तसेच रोपवाटिका आणि कृषी अवजारे प्रदर्शन- विक्री असा हा आपला उपक्रम आहे. मुंबई तसेच बाहेरगावातून आलेल्या चाकरमान्यासाठी गावठी तांदुळ, मालवणी मसाला, विविध प्रकारचे पापड, हळद, गावठी चवळी, सुखे मासे, विविध प्रकारातील लाडू आणि मालवणी मेजवनीची चव चाखता येणार आहे. या उपक्रमात आपण सर्वांनी सहभाग नोंदवून सहकारातून समृद्धीचा मंत्र यशस्वी करूया, असे आवाहन भिरवंडे चेअरमन बेनी डिसोजा आणि संचालक मंडळाने केले आहे.