
रत्नागिरी-अभंगवाणीने दै. सकाळचा वर्धापनदिन भक्तीमय
फोटो ओळी
- rat११p४.jpg ः KOP२३M०२०५६ - रत्नागिरी ः दै. सकाळ रत्नागिरी कार्यालयाच्या वर्धापनदिनी सप्तसूर म्युझिकल्स प्रस्तूत अभंगवाणी कार्यक्रम सादर करताना कलाकार. (छायाचित्र ः हर्षल कुळकर्णी, रत्नागिरी)
अभंगवाणीत रत्नागिरीवासित मंत्रमुग्ध
‘सकाळ’च्या वर्धापनदिनानित्त आयोजन, ''सकाळ''च्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः दै. सकाळच्या रत्नागिरीतील विभागिय कार्यालयाच्या ३४ व्या वर्धापनदिनी येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात आयोजित स्नेहमेळाव्याला उपस्थित राहत रत्नागिरीकरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी आयोजित ''अभंगवाणी''ने वर्धापनदिन कार्यक्रमाची संध्याकाळ भक्तीमय झाली.
''सकाळ''तर्फे जयस्तंभ येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सभागृहात येथील सप्तसूर म्युझिकल्स प्रस्तुत ''अभंगवाणी'' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात ''सकाळ''चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी श्री. पंडितराव यांनी ''सकाळ''च्या वाटचालीचा आढावा घेतला. या प्रसंगी काही वाचकांनी गरजू मुलांसाठी आवश्यक शालोपयोगी साहित्य सकाळच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केले. नगरवाचनायात आयोजित स्नेहमेळाव्यातील कार्यक्रमाला ‘सकाळचे सहायक सरव्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, वरिष्ठ व्यवस्थापक वितरण महेश डाकरे, उपसंपादक शिरीष दामले, राजेश कळंबटे, बातमीदार राजेश शेळके, नरेश पांचाळ, राजेंद्र बाईत, मुझ्झफर खान, सुधीर विश्वासराव, जाहिरात प्रतिनिधी दत्तप्रसन्न कुळकर्णी, वितरण प्रतिनिधी चिनार नार्वेकर, पांडुरंग साळवी, ऑपरेटर मंगेश मोरे, श्री. मजगावकर, वैष्णवी आडविलकर उपस्थित होते. रत्नागिरीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी स्नेहमेळाव्याला उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.
‘अभंगवाणी’ हा कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक उद्योजक सौरभ मलुष्टे होते. या कार्यक्रमामध्ये गायक नरेंद्र रानडे यांनी ‘सर्वांग सुंदरू कासे पितांबरू’, या अभंगाने सुरवात केली. त्यानंतर खड्या आवाजाचे गायक हेमंत देशमुख यांनी ''थोराहूनीही थोर श्रीहरी गोकूळचा चोर'' हा अभंग सादर केला. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात या अभंगाला दाद दिली. ओघवत्या शौलीत रंगकर्मी वामन जोग यांनी निवेदन केले. त्यानंतर गायन विशारद करूणा पटवर्धन यांनी ''नाम गाऊ नाम घेऊ'' हा अभंग सादर करून लयतालाच्या सुरातील भक्तीमय रसाची अनुभूती रसिकांना दिली. श्रीदत्त अवतारातील अकराशे वर्षापूर्वीच्या काळात घेऊन जाताना निवेदकांनी अक्कलकोट स्वामींची महती कथित केली. त्याला स्वामी समर्थ या अभंगाने रानडे यांनी सूस्वर स्वर दिला.
संताची मांदियाळीतील सांस्कृतिक संतश्रेष्ठ संत तुकारामाची, जनाबाईचे त्याग आणि समर्पणाची वृत्ती यांची महती विषद करताना निवेदकांनी वारकरी संप्रदायाचे दर्शन उभे केले. त्याला हेमंत देशमुख यांच्या ‘संत भार पंढरीत.’. या अभंगाने उत्तम साथ दिली. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्यानंतर अभंगवाणी कार्यक्रमात सांगतेकडे वळताना निवेदक जोग यांनी संत तुकाराम हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक पुरूष असून १३४ देशांमध्ये त्यांचे काव्य अभ्यासले जात असल्याचे सूचित केले. गायक रानडे यांनी ''बाजे मुरलीया बाजे'' तर त्याला जोडून करुणा पटवर्धन यांनी ''राम का गुणगान करिये.. ''हा हिंदी अभंग सादर केला. अभंगवाणी कार्यक्रम सांगतेकडे वळताना हेमंत देशमुख यांनी ''अगा वैकुंठीचा राया.. ''या अभंगाने कार्यक्रमाची सांगता केली. उत्तरोत्तर रंगत जाणारा हा कार्यक्रम भक्तीमय झाला. त्याला तबलासाथ किरण लिंगायत, संवादिनी ः निरंजन गोडबोले, तालवाद्य सुहास सोहोनी यांनी केली तर ध्वनीसाथ प्रसिद्ध ध्वनीसंयोजन उदयराज सावंत यांनी केली.
चौकट
सकाळशी नाते दृढ होतेय ः पालकमंत्री सामंत
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा देताना ‘सकाळ’शी असलेले नाते कायम दृढ होत असल्याचे सांगितले. राजकीय वलय नसताना मला सकाळने साथ दिली. ती आजही कायम आहे, असे सांगत आतापर्यंत राबवलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. शहरप्रमूख बिपिन बंदरकर, माजी उपनगराध्यक्ष बाळू साळवी, दिशा साळवी, शिल्पा सुर्वे, पप्पू सुर्वे, मनोज साळवी, उद्योजक सौरभ मलुष्टे आदी उपस्थित होते.